चांदीचे ताट अन्‌ जेवणाचा थाट

डॉ. माधवी खरात
बुधवार, 26 एप्रिल 2017

अनेक नाती असतात, पण त्यातही मैत्रीचं नातं अधिक घट्ट असतं. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्ष प्रेम करणारं मैत्र तुमच्या संघर्षाच्या दुखऱ्या काळात तुमच्यासंगे खडे असतं, आधारकाठीसारखं. निबोलकं.

"मॅडम नमस्कार करते, पास होण्यासाठी आशीर्वाद द्या...'' परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थिनीने खाली वाकून नमस्कार करताना म्हटलं.

अनेक नाती असतात, पण त्यातही मैत्रीचं नातं अधिक घट्ट असतं. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्ष प्रेम करणारं मैत्र तुमच्या संघर्षाच्या दुखऱ्या काळात तुमच्यासंगे खडे असतं, आधारकाठीसारखं. निबोलकं.

"मॅडम नमस्कार करते, पास होण्यासाठी आशीर्वाद द्या...'' परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थिनीने खाली वाकून नमस्कार करताना म्हटलं.

"अगं अभ्यास केलास ना... नक्की चांगल्या मार्कांनी पास होशील...'' मी मनापासून सदिच्छा दिल्या. भावी उज्ज्वल आयुष्याची, उत्तम करिअरची, समृद्ध जीवनाची सुंदर स्वप्नं पाहणाऱ्या या विद्यार्थिनींची धडपड मी पाहात होते. तिला अभ्यासाला मदत करीत होते. उमेद जागवत होते. तिला आणि अर्थातच इतरही विद्यार्थ्यांना एम.ए. नंतरच्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित करीत होते. या परीक्षेच्या यशासाठी धडपड चालू होती. थोडीशी अस्वस्थता तिच्याप्रमाणेच मलाही वाटत होती. तरीही मी आशावादी होते. निरोप घेऊन ती गेली आणि नकळत मी अंतर्मुख झाले. माझे मन भूतकाळात गेले. माझी एम.ए. नंतरची धडपड. "नेट' या नव्यानेच सुरू झालेल्या, नेमका अभ्यासक्रम नसणाऱ्या परीक्षेच्या वेळची पळापळ, अस्वस्थता आठवली. केवढा अटीतटीचा, संघर्षाचा दुखरा काळ होता तो!

या साऱ्या काळात आई-वडील, नवऱ्याप्रमाणेच माझ्या मैत्रिणींनी खूप खूप आधार दिला. दिवसाला पेलून धरण्याचे सामर्थ्य निरपेक्षपणे प्रेम करणाऱ्या मैत्रिणीमुळे शक्‍य झाले. माझ्या या मैत्रिणी गुणी आहेत. आमच्या वयातील दहा-बारा वर्षांचे अंतर वाचनप्रेमामुळेच नष्ट झाले होते. वयाने मोठ्या असणाऱ्या मैत्रिणींच्या अनुभवाचा, ज्ञानाचा मला नेहमीच आधार मिळत गेला. संस्कृतचे उत्तम ज्ञान असणाऱ्या रमा जोशी, इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या जयश्री नामजोशी, मराठीच्या उत्तम अध्यापनाबरोबर खेळात प्रावीण्य असणाऱ्या, उत्तम पाककृती, विणकाम, भरतकामात पारंगत, अतिशय स्नेहमयी असणाऱ्या स्नेहल सहस्रबुद्धे, कधीही सवाई न चुकविणाऱ्या, समंजस, जिद्दीने संसार चालविणाऱ्या अनुराधा कुलकर्णी, मला नेहमीच समजून घेणाऱ्या हेमलता फडके... अशा संपन्न मैत्रिणी, माझ्या नेट व पीएच.डी.च्या काळातील खऱ्या साथीदार होत्या. कला-साहित्यशास्त्र यामध्ये रुची असणाऱ्या मला या ज्ञानसंपन्न मैत्रिणींमुळे अधिकच उत्तम वळण मिळालं आणि जीवनाचे सुरेल गाणं गाण्यासाठी मी सज्ज झाले.

संसाराच्या सुरवातीच्या दिवसांतल्या अडचणी, मुलांच्या शाळा-आजारपण, सासर-माहेरच्या नात्यातील विविध छटा या कौटुंबिक गोष्टीबद्दल एकमेकींना समजावत उभारी देत असतानाच, सामाजिक गोष्टींबाबतही आम्ही चर्चा करीत असू. उत्तम ग्रंथांचं वाचन... नाटक-सिनेमा-संगीतावर चर्चा, लेखक-कवींशी संवाद, या साऱ्या गोष्टी पोषकच होत्या. स्वतःचं स्वतंत्र ग्रंथालय असावं, असं आम्हाला वाटे. यातूनच एका पुस्तकभिशी योजनेत आम्ही सामील झालो. दरमहा दहा रुपये गोळा करण्याचे काम मी करीत असे. पैसे भरण्याचे काम रमा जोशी करीत. एका वर्षी शंभर रुपयांचे बक्षीस मला मिळाले. त्या वेळी दोनशे तीस रुपयांची पुस्तके एकत्र खरेदी करताना आपण श्रीमंत असल्याची भावना झाली. मैत्रिणींनी उत्तम पुस्तके खरेदी करायला उत्साहाने मदत केली. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबरच पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, वि. स. खांडेकर, पु. ग. सहस्रबुद्धे, नारायण सुर्वे, शांता शेळके, गो. नि. दांडेकर, शिवाजी सावंत, शंकरराव खरात, बाबूराव बागूल, इंदिरा संत, आनंदीबाई शिर्के हे लेखक-कवी पुस्तकांच्या रूपाने हक्काने घरात आले. त्यांच्याशी मनसोक्त संवाद साधता आला.
माझ्या "नेट' परीक्षेच्या काळात हे साहित्यिक सांस्कृतिक वातावरण घरात आणि मैत्रिणींच्या रूपाने सभोवताली होते. छोटे मोठे संदर्भ गोळा करताना मैत्रिणी मदत करीत, चर्चा करीत. अर्थातच या साऱ्याचा परिणाम म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मी "नेट' परीक्षा फेलोशिपसह उत्तीर्ण झाले. माझा पीएच. डी.चा मार्ग मोकळा झाला. या गोष्टीचे मैत्रिणींना खूप अप्रूप वाटले. हा आनंदही तितक्‍याच थाटात साजरा करण्यात आला. स्नेहल सहस्रबुद्धेंच्या पुढाकाराने सगळ्याजणी प्रेमलता फाटक यांच्या घरी जमा झालो. उत्तम पक्वानांनी भरलेलं चांदीचं ताट माझ्यासमोर मांडण्यात आलं. उत्तम पुस्तकं मिळाली. त्या परीक्षेचं यश भरभरून साजरं केलं गेलं.

आज मागे वळून बघताना वाटतं, किती निरपेक्षपणे हे सारं केलं गेलं? मन नकळत हळूवार झालं, डोळे भरून आले. समोरचा आपल्याला कितपत उपयोगी पडेल? किंवा कुणापासून भविष्यात काही लाभ होईल काय? असे हिशेब करून अनेक जण आपलं बेगडी प्रेम व्यक्त करताना आपण पाहतो. या पार्श्‍वभूमीवर अगदी निर्मळ, निरागसपणे, निरपेक्षपणे प्रेम करणाऱ्या या मैत्रिणींनी किती सुंदर पेरणी माझ्या आयुष्यात केली! कायमचं "श्रीमंत' करून टाकलं मला. भरभरून कौतुक करणं, एकत्र येऊन हसणं, हसवणं इतकीच भावना जपणाऱ्या माझ्या या मैत्रिणींबद्दल मी किती लिहू?
आज आयुष्याच्या "संध्याछाया' ही त्यांना भिववीत नाही. कारण निरामय आयुष्याचे त्यांनी नेहमीच गाणं गायलं आहे. आयुष्याच्या कातरवेळी स्वागत करणाऱ्या या मैत्रिणींबद्दल मी कृतज्ञ आहे.

परीक्षेच्या यशासाठी आशीर्वाद मागणारी विद्यार्थिनी निघून गेली आणि मैत्रिणींच्या आठवणीने आर्द्र झालेली पापण्यांची कड मी हळूवारपणे निपटली!