प्रेरणादायी इस्राईल

प्रेरणादायी इस्राईल

इस्राईल हा महाराष्ट्रापेक्षा लहान देश. लोकसंख्या पुण्यापेक्षा थोडी जास्त; पण प्रखर राष्ट्रभक्ती व मेहनत घेण्याची तयारी या जोरावर जगाच्या नकाशावरचे हे ठिपक्‍याएवढे राष्ट्र नजरेत भरते आहे.

गेली अनेक वर्षे इस्राईल भारताचा जवळचा मित्र आहे. पुण्यातील काही मराठी भाषक ज्यू कुटुंबे इस्राईलला जाऊन स्थायिक झाली आहेत. शेतीतील प्रयोगांसाठी कितीतरी मराठी शेतकऱ्यांनी त्या देशाला भेट दिलेली आहे. या देशाला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्याने माझ्या काही आठवणी जाग्या झाल्या.

काही वर्षांपूर्वी कंपनीच्या कामानिमित्त मला इस्राईलला जाण्याची संधी मिळाली होती. छोट्या परंतु, लष्करीदृष्ट्या अत्यंत सामर्थ्यवान असलेल्या इस्राईलच्या त्या भेटीत तेथील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परंपरा अगदी जवळून पाहता आल्या. टर्किश एअरलाइनचे विमान मुंबईहून उशिरा निघाल्याने तेल अवीवकडे जाणारे पुढचे विमान चुकले. इस्तंबूल विमानतळावर मुक्काम वाढला. तेथे इस्राईलसाठी वेगळी रांग लागली होती. इस्राईली लोकांकडे पाहताना तेथील विमानतळ कर्मचाऱ्यांच्या नजरेत तिरस्कार जाणवला. इस्राईली लोक मात्र तटस्थपणे रांगेत उभे होते. कदाचित तो त्यांच्या धोरणाचाही भाग असावा.

तेल अवीव ते बीरशेबा (नेगेव) असे मोटारीतून जाताना तेथील वाहतूक अतिशय शिस्तबद्ध आणि सुनियंत्रित असल्याचे दिसले. तेथे प्रत्येक सिग्नलला चालक गाडी थांबवत होता. एखादा पादचारी रस्ता ओलांडत असल्यास प्रथम त्याला जाण्याची संधी देत होता. नेगेव हा इस्राईलच्या दक्षिणेकडील वाळवंटी भूभाग. इस्राईलमधील मुक्कामात कार्यालयीन कामानिमित्त तेल अवीव, नेगेव, जेरूसलेम व आजूबाजूची काही स्थळेही पाहण्यास मिळाली. इस्राईलची संस्कृती जवळून अभ्यासता आली. इथे अनेक भारतीय माणसेही भेटली, त्यात काही मराठीही होती. त्यामुळे आपण भारतातीलच एखाद्या भागात आहोत असे सतत वाटत राहिले.

तसा इस्राईली लोकांशी कामानिमित्त वर्षभर आधी संपर्क होता. आपल्या येथे मारवाड भागातील लोक जसे व्यापारात हुशार आहेत, तसेच तेथील ज्यू लोकांमध्येही तशीच व्यापारी वृत्ती आणि हुशारी आढळली. जगभर व्यापारात पाय पसरलेले. "फोर्बस्‌ मॅगेझिन'मधील जगातील पहिल्या अतिश्रीमंत व्यापाऱ्यांच्या यादीत पन्नास ज्यू आहेत. मात्र, स्वभावाने प्रचंड चिवट आहेत. त्यांच्यात नवनिर्मितीची व मूलभूत संशोधनाची खूप आवड दिसून येते. विशेषतः संगणक व माहिती क्षेत्रात हे लोक अग्रेसर आहेत. अत्याधुनिक शेतीतंत्र, जल व विद्युत संवर्धन आदी क्षेत्रांत इस्राईल जगात अव्वल क्रमांकावर आहे. येथे अगदी इंच इंच जागेचा (अगदी भिंतींचासुद्धा) विनियोग शेतीसाठी केलेला आढळला. जवळजवळ प्रत्येक घरावर सौरऊर्जेची पॅनेल उभारलेली दिसली. पाणीबचतीतही हा देश अग्रणी असून, समुद्राचे खारे पाणीही इथे गोडे करून वापरले जाते. येथील मॉलमध्ये ताज्या भाज्या व रसरशीत फळे दिसून येतात. हे पाहून वाळवंटी प्रदेशातही असे उत्पादन निघू शकते, यावर विश्वासच बसत नाही.

इथली लोकसंख्या पुण्याच्या साधारण दीडपट म्हणजे त्र्याऐंशी लाख आहे. संपूर्ण देशाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या अवघे दोनतृतीयांश असून त्यात अर्ध्याहून अधिक वाळवंट आहे. पूर्वेकडील जॉर्डन सोडून हा देश सर्व बाजूंनी शत्रू देशांनी वेढलेला आहे. देशाची शासकीय भाषा हिब्रू व अरबी असून, साक्षरता प्रमाण 97.08 टक्के आहे (भारत : 71 टक्के). लोक आनंदी व शिस्तप्रिय वाटले. आमच्या "टीम लीडर'च्या कमरेला भरलेले रिव्हॉल्व्हर असायचे. केव्हाही हातघाईचा प्रसंग येऊ शकतो, असे तो म्हणायचा. इथे प्रत्येकाला अगदी पंतप्रधानाच्या मुलांनासुद्धा किमान दोन वर्षे तरी लष्करी सेवा करावी लागते. महिलांनाही एक वर्ष रजा घेऊन सीमेवर जावे लागते. त्यामुळे येथील कंपनीतील प्रत्येक जण लष्करी सेवा करून आलेला होता. एक विशेष उल्लेखनीय व अभिमानास्पद गोष्ट म्हणजे आम्ही ज्या कंपनीत गेलो होतो, तेथे आम्ही भारतीय पाहुणे असल्याने त्यांनी त्यांच्या राष्ट्रध्वजाबरोबरच भारताचाही राष्ट्रध्वज उभारला होता. हा त्यांच्या स्वागत करण्याच्या पद्धतीचा एक भाग होता.
तेथे त्यांनी आम्हाला मसादाचा ऐतिहासिक किल्ला, मृत समुद्र, जगातील सर्वांत कमी पातळीचा म्हणजे समुद्रपातळीपेक्षाही सखल भूभाग, जेरुसलेम, एअरफोर्स म्युझियम आदी ठिकाणे दाखविली. इस्राईली टीम लीडरने भरपूर माहिती दिली. सतत तणावाचे वातावरण असूनही या लोकांमध्ये खूप विनोदबुद्धी आढळली. सर्वत्र मशिनगनधारी इस्राईली पोलिस तयार असतात. कोणी दगड मारायला उचलला, तरी गोळी झाडण्याचे आदेश असतात.

या एवढ्याशा छोट्या देशाने केलेली प्रचंड प्रगती पाहून आपण किती मेहनत घेतली पाहिजे. याचाच विचार भारतात परतताना मनात घोळत होता. या प्रगतीमागे आहे इस्राईलच्या नागरिकांमधील जाज्ज्वल्य राष्ट्रभक्ती. एक राष्ट्र म्हणून जगात ताठ मानेने उभे राहण्यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न. प्रत्येक भारतीय नागरिकात प्रखर राष्ट्रभक्ती रुजल्यास महासत्ता होण्याचे भारताचे स्वप्न साकार होण्यास फार काळ लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com