अखंड दीप तेवता

muktapeeth
muktapeeth

अनोळखी प्रदेशातून येऊन त्या पुण्यातल्याच झाल्या. त्या बोलत तेव्हा एखादे विचारतत्त्वच सांगत. ऐकणाऱ्याची विचारप्रक्रिया बदलत असे. उत्तम विचारांच्या प्रकाशात तो कर्ममार्गी होत असे.

पुणे श्री सारदा मठाच्या अध्यक्षा योगप्राणा माताजींनी देह ठेवल्याची बातमी समजली आणि अनेकांचा मानसिक आधार नाहीसा झाल्याची जाणीव झाली. मन विषण्ण झाले; पण मी स्वतःला सावरू शकले, कारण त्यांचे नेहमीचे वाक्‍य "मॉं (जगज्जननी श्री सारदा माता) आहे ना! काळजी करायची नाही!' माझ्या कानात घुमू लागले. माझ्या मनाच्या डोळ्यांना काषायवस्त्रधारी सुदृढ देहयष्टी, नजरेतील करारीपणा, आत्मविश्‍वास, कडक शिस्त, टापटीप आणि तरीही मायेने जवळ घेणाऱ्या माताजी दिसू लागल्या.

माताजी पुणे सारदा मठाच्या कार्याची धुरा सांभाळण्यासाठी कोलकत्याहून पुण्यात 1978 मध्ये आल्या. त्याआधी दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 1976 मध्ये त्यांची संन्यास दीक्षा झाली होती. लगेचच त्यांच्यावर त्यांच्यासाठी संपूर्णपणे अपरिचित असलेल्या प्रांतात नव्याने सुरू झालेल्या मठाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली होती. मठाचे ठिकाण त्या वेळच्या पुणे शहरापासून बरेच दूर आणि निर्मनुष्य होते. माताजींसमवेत चार ब्रह्मचारिणी राहत होत्या. पाचही जणींना मराठी भाषेचा गंध नव्हता. दैनंदिन व्यवहाराचे साहित्य आणण्यासाठी त्यांना पायीच दूरवर जावे लागत असे.

त्यांना वाटचाल करायची होती ती स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या "आत्मनो मोक्षार्थं जगत्‌ हिताय च' (स्वतःचा मोक्ष आणि जगाचे कल्याण) या मार्गावरून. त्यामुळे त्यांना जनहिताच्या कार्यासाठी मठाबाहेर पडणे क्रमप्राप्तच होते.
त्यांच्या पहिल्या कार्याची सुरवात चोरी करणाऱ्या मुलांपासून झाली. देवासमोरील पैसे उचलणाऱ्या मुलांना प्रेमाने खायला घालून माताजींनी विश्‍वासात घेतले आणि त्यांच्या शिक्षणाची सुरवात करून दिली. काबाडकष्ट करणारी आई आणि दारू पिणारे वडील यामुळे भेदरलेली मुले माताजींच्या आश्रयाला येऊ लागली आणि चोरी करणारे हात लवकरच ग, म, भ, न काढू लागले आणि शिव्या देणाऱ्या मुखातून "मनाचे श्‍लोक' बाहेर पडू लागले. सध्या बालवाडी ते चौथीपर्यंतची ही शाळा दुमजली इमारतीत भरते. शाळेचे विद्यार्थी गीतापठण स्पर्धेत प्रथम पारितोषिके मिळवतात.

प्रसन्न हास्याने माताजी समोरच्या व्यक्तीच्या मनात स्थान मिळवीत. मन मोकळे करायला हक्काचे स्थान म्हणजे माताजी, असे अनेकांना वाटे. त्यांचे एक परवलीचे वाक्‍य होते, "मॉं आहे ना! काळजी करायची नाही! मंदिरात बसून जप करायचा.' असे सांगून भक्ताचे मन सारदा माताच्या पायी जडवून देत. पतिवियोग, पुत्रशोक यांसारख्या समस्या असतील, तर माताजी स्वतः जातीने त्या कुटुंबाच्या दुःखात सामील होऊन दुःखाचे निवारण करीत. शिवाय मठात छोटे-मोठे काम देऊन आर्थिक मदतही करीत.

महिलांचे मन सांसारिक गप्पांतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी ग्रंथालय, शास्त्रग्रंथ वाचनाचे वर्ग सुरू केले. भोगवादाकडे झपाट्याने वळत चाललेल्या आजच्या तरुण पिढीच्या भविष्याचा विचार करूनच स्वामी विवेकानंदांनी स्त्रियांसाठी मठ असावा, असे मत प्रकट केले होते. म्हणूनच योगप्राणा माताजींनी मठात युवती शिबिर घेण्यास सुरवात केली. त्यांच्या कलागुणांनाही माताजी प्रोत्साहन देऊ लागल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सौम्यता, सात्त्विकता, नम्रता दिसून येऊ लागली. त्या म्हणतात, ""समाजात आता आमची ओळख "सारदा मठातून येणारी युवती' अशी झाली आहे. या ओळखीला धक्का लागू न देण्याचं भान आम्ही ठेवतो. या परिवर्तनामागे परमपूज्य माताजींची शिकवण कारणीभूत आहे.''

असेच परिवर्तन समाजातील प्रत्येक व्यक्तीत निर्माण करण्यासाठी त्यांच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी भक्तांच्या साह्याने दोन मंदिरे उभी केली. एक मठाच्याच आवारात असलेले सारदा माताचे देखणे मंदिर आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला विवेकानंद विद्यामंदिर. हे विद्यामंदिर म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षणाची शाळा नसून, मुलांवर संस्कार करणारी भारतीय संस्कृतीची निदर्शक संस्था आहे.
याचेच एक बोलके उदाहरण - बसस्टॉपवर एक छोटा मुलगा उभा. शेजारून एक भिकारी हात पसरून भीक मागतोय. त्याच्या पसरलेल्या हातावर मुलगा शाळेत मिळालेली दोन बिस्किटे ठेवतोय. भिकारी म्हणतो, "अरे बाळा, तूच खा. लहान मुलांकडून मी भीक घेत नाही.' मुलगा म्हणतो, "तुम्हाला भूक लागली आहे, तुम्हीच खा. मला रोजच मिळतात.' भिकारी विचारतो, "तू कोणत्या शाळेचा?' मुलगा म्हणतो, "विवेकानंद विद्यामंदिर.' असाच माझ्या मनाचं उन्नयन करणारा हा प्रसंग - नवीन डायनिंग हॉलसाठी सारदा माताचं व्यक्तिचित्र काढण्याची इच्छा मी व्यक्त केली. माताजी म्हणाल्या, "त्या जगज्जननीला आजपर्यंत कोणी ओळखू शकलेलं नाही. तिला समजून घेशील, तर तुला ते काम जमेल.' माताजींचं ते वाक्‍य विजेसारखं माझ्या मनात घुसलं. माझी विचारप्रक्रियाच बदलली. कलानिर्मितीमागचं हे विचारतत्त्वच त्यांनी सांगितलं आणि माझ्या हृदयात उत्तम विचारांचा दीप अखंड तेवत ठेवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com