आत वळणाऱ्या वाटा...

आत वळणाऱ्या वाटा...

ती विमुक्ता. भवतालातील प्रचंड कोलाहलातही स्वतःचा बेबंद एकांत अनुभवणारी. नदीच्या नितळ प्रवाहाप्रमाणे वाहणारी. रंगांमधून, शब्दांमधून स्वतःच्या आत वळणारी.

विमुक्ता मी अन्‌ माझी एकांतवासाची स्थानकं अनेक. "स्थानक'. मला या शब्दाबद्दल अपार जवळीक वाटते. "जागा', "स्थळ', "ठिकाण', "ठाणं' यापैकीही एखादा शब्द वापरू शकले असते मी, तरीही नाही वापरला त्यातील एकही. यापैकी कोणताही शब्द मला एकाच विशिष्ट भूखंडावर स्थिर करू पाहताना दिसतो. असं एकाच जागी बांधून घेणं मला शक्‍य नाही. "स्थानक' या शब्दात मला ती मोकळीक सापडते. यायचं, थोडा वेळ रेंगाळायचं अन्‌ पुढच्या प्रवासाला निघायचं. तर माझी अशी एकांतवासाची स्थानकं अनेक आहेत. मी या स्थानकांवर एकांतवास भोगत असते. हो, मी एकांतप्रिय आहे, एकेक नातं छानपैकी कापून काढत मी हा बेबंद एकांत मिळवला आहे खास आणि तरीही मी अजिबात एकाकी नाही. मी एकाकी नाही, पण म्हणून कुणी माझ्या एकांतावर आक्रमणही करू शकत नाही. कुणी माझ्या या बेटाकडे नुस्तं बोट रोखलं, तरी माझ्या एकांताचा फणा उफाणून येतो. एका लष्करी अधिकाऱ्याचं रक्त वाहतंय माझ्यातून माझ्या एकांताचं रक्षण करीत.

माझं एकांती असणं अन्‌ एकाकी नसणं एकमेकांत छानशी गुंफण करून आहे. या जगातली प्रत्येक स्वतंत्र वाटणारी गोष्टही एकमेकांत गुंतलेली असतेच. त्यामुळेच तर या जगाविषयीचं कुतूहल गुंतागुंतीचं बनतं. या जगाच्या ठशांचा माग घेत जाणं खूप औत्सुक्‍याचं असतं कलावंतासाठी. मी माग घेत जाते रंगांमधून, शब्दांमधून. कॅनव्हासवर, कागदावर. पांढरा अवकाश भरून टाकते भारावून गेल्यागत. एकांताचा अवकाश पांढराच असावा आणि आपणच असतो त्या अवकाशात ठिपक्‍याच्या सावलीसारखे. आपल्या आसपास कितीतरी चेहरे असतात. नीट निरखले तर लक्षात येतं की, ते बदलत आहेत. ढगांचे आकार बदलावेत, तसे. आतापर्यंत दिसणारं एखादं दृश्‍य त्यावरचा प्रकाश सरकून सावली आल्यावर वेगळाच रंग घेऊन समोर येतं, तसे. हे बदलणारे चेहरे ढगांसारखे उतरतात कॅनव्हासवर. देशा-परदेशातील अपरिचित स्थळं घालतात भुरळ. माझी बदलत गेलेली घरं, प्रत्येक टप्प्यावर कामाचे अवशेष मांडून आलेली ठिकाणं, प्रवासात भेटलेले चेहरे, आनंदाच्या क्षणी लागलेली ठेच, निसर्गात गोंदून ठेवलेल्या भावना... त्याचीही वास्तव बिंबं पडत नाहीत कॅनव्हासवर. तर त्या त्या रहस्यांचं बिंब स्मरणरंजनाच्या रंगात उजळून निघतं पांढऱ्या अवकाशात. उजळ रंग आणि एकमेकांत गुंतलेल्या कितीएक गोष्टी भराभर भरून टाकतात अवकाश मनातला आणि त्याचं बिंबुटलं रुप तेवढं अवतरतं कागदावर, कॅनव्हासवर.

माझी चित्रं एक प्रकारची बंडखोरी आहे माझ्यात वसलेली. आदीम. हंऽऽ, त्यात "रिग्रेट' नाही, पॅलेटच्या समोर "कन्फेशन' आहे. मग मी रंगानं भरलेली नाईफ मुलांच्या निरागसतेनं चित्रफलकावरून फिरवत राहते. मुलांना आवडतो तसा निसर्गातला हिरवा, उगवत्या सूर्याचा नारिंगी, फुलांचा गर्द लाल मलाही आवडतो. रंगजाणिवांचं व्यवस्थापन विनासायास घडतं माझी व्यवस्थापन शास्त्रातील "डॉक्‍टरेटीय' कौशल्य अजमावित. रंग मिसळत जातात एकमेकांत, माझ्या जगण्यात, कॅनव्हासवर कोणतीही बंधनं न पाळता एका लयीत. लय हा माझा स्थायीभाव आहे. आताशा माझ्या चित्रालाही चौकट उरत नाही. त्यातील कोणतीही चौकट पाहता पाहता अमूर्त होत जाते. माझ्यासाठी सगळीच बंधनं आभासी. कुणी जरा दाबण्याचा प्रयत्न केला तर मी उसळते चेंडूसारखी.

मी सकाळी उठते. खसखसा तोंड धुते. रात्रभर पडणाऱ्या स्वप्नांत चुकून एखादा मुखवटा चिकटलाच तर तो माझ्या दृष्टीस पडण्याआधीच धुवून निघावा, म्हणून. मला मुखवटे घेऊन नाही वावरता येत चारचौघात, एकांतातही. माझा चेहराच आरसा आहे. आत लयीत वावरणाऱ्या सगळ्या भावनांचं चित्र उमटतं माझ्या चेहऱ्यावर, कागदावर, कॅनव्हासवर. एखाद्या नितळ प्रवाहासारखं. माझ्याविषयीच्या कसल्याच कल्पना, समज-गैरसमज करू देत नाही माझा चेहरा जळत्या सूर्याखाली उभे असताना अथवा मोगर चांदण्यात गाणं ऐकताना. मी मुक्त वाहते आहे एखाद्या नदीसारखी. या नदीच्या पाण्यावरच्या रेषा निरखण्याचा, कॅनव्हासवरच्या रंगात शोधण्याचा, कागदावरच्या शब्दांत वाचण्याचा प्रयत्न करा, माझ्या आत वळणाऱ्या वाटा कदाचित सापडतील तुम्हालाही.

या वाटांवरून चालत याल माझ्या एकांतवासाच्या स्थानकापर्यंत, तेव्हा कराल माझ्या आत्म्याला स्पर्श!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com