कावळ्यांची शाळा

डॉ. रविकिरण कल्याण माळी
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कावळ्यांची शाळा पाहात पोरवय संपले. वाढत्या वयात पिंपळ, लिंब वठले आणि कावळ्यांची शाळाही सुटली. आता नाही कोवळ्या मुलांच्या डोळ्यांत पिंपळाची गर्द सावली आणि कावळ्यांची शाळाही.

कावळ्यांची शाळा पाहात पोरवय संपले. वाढत्या वयात पिंपळ, लिंब वठले आणि कावळ्यांची शाळाही सुटली. आता नाही कोवळ्या मुलांच्या डोळ्यांत पिंपळाची गर्द सावली आणि कावळ्यांची शाळाही.

बालाघाटच्या डोंगररांगेतील माझ्या गावामधूनच गेलेल्या दोन ओढ्यांमुळे नैसर्गिकरीत्याच गाव तीन टप्प्यांत विभागलेला आहे. असे असूनही सूर्याआड आलेल्या एकाच ढगाने शिराळ धरावे, भरून आलेल्या एकाच ढगाने पाणी पाणी करावे आणि धुक्‍याच्या एकाच चादरीत लपेटून जावे एवढाच त्याचा आकार आहे. गावाच्या पूर्वेला चिंचेची उंच उंच झाडे होती. त्यावर उलटे लटकणाऱ्या वटवाघळांना पाहण्याची नवलाई कधीही संपली नाही. गावाची कूस धरून असलेली आमराई तर दिवसाही भीती वाटावी अशी. दिवसा पक्षी होऊन किलबिलणारी आमराई रात्री भुताखेतांच्या गोष्टीही कुजबुजत असायची. सर्व मनुष्य व्यवहारावर या अरण्याची सावली पडलेली असायची. गावातील जुण्याजाणत्या, प्रौढ स्त्री-पुरुषांच्या भावविश्‍वाचा ही वनराई अविभाज्य भाग होती. परंतु चिमुकल्यांच्या भावविश्‍वाचा भाग असणारे काही वृक्ष गावाच्या मधोमधच उभे होते.

आज ठळक आठवणारे व माझ्याही भावविश्‍वाचा भाग असणारे अतिशय पुरातन असणारे पिंपळाचे झाड मारुती मंदिराशेजारी उभे होते. या प्रचंड वृक्षराजाच्या शाखांवर भरणारी कावळ्यांची शाळा मला खेचून न्यायची. या अतिविशाल वृक्षाचा बुंधा दोन व्यक्तींच्याही कवळ्यात मावत नसायचा. त्याला चिकटूनच असणाऱ्या विहिरीच्या पाण्यावरच हिरवागार बहरलेला हा वृक्ष नक्षीदार पानांनी सळसळत असायचा. त्याचा समुद्राच्या लाटेसारखा आवाज ऐकू यायचा. भव्यतेसमोर नतमस्तक होणे ही मानवाची आदिम प्रेरणाच आहे. या वृक्षाच्या पूज्यभावातूनच कोणीतरी तिथे पायाशी मारुतीची प्रतिष्ठापना केली असावी. दिवसभर हा वृक्ष बगळे, साळुंख्या, चिमण्या, पोपट आदींच्या थव्यांनी गजबजलेला असायचा. वादळात तुटून पडलेल्या फांदीच्या ढोलीत पोपट राहायचे. मधेच धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखे एका रेषेत सूं सूं उडायचे. मोजण्याच्या आतच नजरेआडही व्हायचे. पण या सार्वजनिक वृक्षावर सर्वात जास्त हक्क होता तो कावळ्यांचाच. दिवस मावळतीला असंख्य कावळे झाडाच्या शेंड्याशेंड्यांवर जमलेले असायचे. तेव्हा नुकतेच शाळेत जाऊ लागलेल्या आम्हाला वडीलधारी मंडळी सांगायची, आमच्यासारखीच कावळ्यांची शाळा पिंपळावर भरलेली आहे. ते खरे वाटण्याचेच ते वय होते. नेमकी पाच वाजता आमची शाळा सुटायच्या वेळेलाच कावळ्यांची शाळा भरायची. लगबग सुरू व्हायची आणि थोड्याच वेळात कावळ्यांनी वृक्ष लखडून जायचा. फक्त कावळ्यांची काव काव आसमंत भारून टाकत असे. मधेच एखादा कावळा कर्कश ओरडत असे. कावळ्यांचे ते एकत्र येणे आमच्या प्रचंड कुतूहलाचा भाग होते. अंधार पडताच सगळे चिडीचूप. तेवढाच तास दोन तासांचा कालावधी एका वेगळ्याच चैतन्याने भारलेला असायचा. दिवसा चैतन्यमय वाटणारी पानांची सळसळ अंधार पडताच भयकारी वाटत असे. वारा नसेल तेव्हा पिंपळ मौन पाळत उभा राहात असे.

पुढे त्या वृक्षाशेजारी एक अंगणवाडी बांधली गेली. शाळेत जाणारी मुले विहिरीकडे जातील म्हणून पाणी असणारी विहीरही बुजवण्यात आली. वृक्षाला जीवन पुरवणारी जीवनदायिनी विहीर बुजवल्यावर वृक्ष जगेलच कसा? विहीर बुजवल्यामुळे असेल, पाऊस कमी कमी होत गेल्यामुळे असेल किंवा वय झाल्यामुळे अथवा जागतिकीकरणाच्या आगमनानंतर मानवी स्वभावातले आक्रमक परिवर्तन वृक्षालाही जाणवले असावे. त्यानंतर दोन वर्षांत पिंपळ वठून गेला. एक चैतन्य संपले आणि कावळ्यांची शाळाही संपली. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या आणि तासाभरात मोठ्या मोठ्या वृक्षांना कापून काढणाऱ्या करवतींचा नव्वदच्या दशकात शोध लागलेला नव्हता. वठलेल्या पिंपळाने पुढची दहा वर्षं कुऱ्हाडीला दाद दिली नाही. तो मोठा बुंधा उन्हा-पावसात एक दशकभर तरी उभा होता. आता फक्त मंदिर उरले आहे.
कावळ्यांची शाळा नंतर एका लिंबाच्या झाडावर भरायला सुरवात झाली. हे झाड मातीच्या मोठ्या ढिगाऱ्यावर होते आणि आमच्या अंगणातून स्पष्ट दिसणारे होते. हा एक मध्यम आकाराचा वृक्ष होता, परंतु टेकडीवर असल्यामुळे तोही भव्य वाटत असे. लिंबाच्या झाडाखाली "मदारसाहेब' म्हणून कुणा सुफी संताची समाधी होती. आम्ही गुरुवारी तेल आणि उदबत्ती घेऊन जात असू. आम्ही मोठे झालो तरी कावळ्यांच्या शाळेचे आकर्षण कमी झालेले नव्हते. गावातील लोकांनी आणि कुंभारांनी लिंब उभी असलेली टेकडी मातीसाठी टोकरली व मोठ्या प्रमाणावर माती नेली. परिणामी लिंबाच्या मुळ्या उघड्या पडल्या आणि लिंबही वठला. निष्पर्ण सांगाडा तेवढा उरला. वाऱ्या वादळात एक एक फांदी तुटत गेली. त्या फांदीनेही कुणाची तरी चूल पेटवली. शेवटी फक्त बुंधा तेवढा राहिला. कावळ्यांची तिथली शाळाही संपली.

आता चिमुकल्यांच्या भावविश्‍वात कावळ्यांची शाळा नाही. बालवाडी आणि पहिली-दुसरीच्या वर्गातील चष्मा लावून बसलेल्या कोवळ्या मुलांच्या डोळ्यांत पिंपळाची गर्द सावलीही नाही आणि कावळ्यांची शाळाही नाही. मी मात्र हल्ली ऐकतो, आताशा कावळ्यांची शाळा पोलिस स्टेशनजवळ असलेल्या एका वडाच्या झाडावर भरते आहे.

Web Title: dr ravikiran mali write article in muktapeeth