बोर्डिंग पास

डॉ. समीता सुहास टिल्लू
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

बोर्डिंग पास. कागदाचा एक तुकडा. विमानतळावरची आसपासची गंमत पाहण्याच्या नादात या कागदाच्या तुकड्याकडे दुर्लक्ष होते. पण एखाद्या परदेशातील विमानतळावर विमानात बसण्याची वेळ संपत चाललेली असताना बोर्डिंग पास सापडत नसेल तर...!

बोर्डिंग पास. कागदाचा एक तुकडा. विमानतळावरची आसपासची गंमत पाहण्याच्या नादात या कागदाच्या तुकड्याकडे दुर्लक्ष होते. पण एखाद्या परदेशातील विमानतळावर विमानात बसण्याची वेळ संपत चाललेली असताना बोर्डिंग पास सापडत नसेल तर...!

एवढ्याशा कागदाच्या तुकड्याला कधी आणि किती महत्त्व प्राप्त होईल, हे काही सांगता येत नाही. आता हेच पाहा ना काय झाले ते. महाविद्यालयातील कामाच्या निवृत्तीनंतर आम्ही आठ जणांनी भरपूर भटकायचे ठरविले. अनेक देशांचा विचार केल्यावर मलेशिया, बाली इकडे जायचे ठरले. कारण बालीतील मनोहर निसर्ग, भारतीयांना जवळची अशी तेथील संस्कृती आणि तेथील नितळ, सुंदर समुद्रकिनारा याला सर्वांनी पसंती दिली. हॉटेलचे आरक्षण, विमानाची तिकिटे आरक्षित झाली. मुंबईहून निघण्याची तारीखही पक्की झाली. मोठ्या उत्साहाने तेथील चलन बरोबर घेतले. कपडे खरेदी, प्रवासातील दोन टप्प्यांत लागणारा खाऊ या सर्वांचे पॅकिंग करून मुंबई येथील छत्रपती शिवाजी विमानतळावर आम्ही दाखल झालो.

तेथे गेल्यावर "चेक इन'चे सोपस्कार सुरू झाले. आमच्या पहिल्या प्रवासाचा टप्पा मुंबई ते कुआलालम्पूर. सुमारे पाच-साडेपाच तासांचा प्रवास आणि त्यानंतर कुआलालम्पूर ते बाली असा तीन-साडेतीन तासांचा प्रवास. या प्रवासासाठी सामान चेक करून गेले आणि दोन बोर्डिंग पास आधीच दिले गेले. मुंबईतून उत्सुकतेने प्रवास सुरू झाला. पहिल्या टप्प्यातील विमान प्रवास सुखद झाला. विमान प्रवास संपवून कुआलालम्पूरला आम्ही उतरलो. विमानतळ अगदी प्रशस्त. सगळीकडे लखलखाट. माणसांची गर्दी. आता बालीला जाण्यासाठी कोणत्या मार्गाने जायचे हे ठरवत असताना माझी मैत्रीण मला म्हणाली, ""दुसरा बोर्डिंग पास बाहेर काढ व पुढे चल.'' मी माझ्या पर्समधील बोर्डिंग पास शोधू लागले. पाहते तो काय? पर्सच्या एकाही कप्प्यात बोर्डिंग पास नाही.

हा पास शोधण्याच्या गडबडीत आमच्याबरोबरचे चारही पुरुष पुढे निघून गेले. येतीलच आपल्या मागून बायका, अशी त्यांची समजूत झाली असावी. इकडे मी पर्स धुंडाळून थकून गेले. प्रत्येक कप्पा शोधला. सर्व वस्तू बाहेर काढून पर्स धुंडाळली. पण बोर्डिंग पास काही सापडेना. आता कुआलालम्पूरच्या कोणत्या गेटजवळ आमचे बालीला जायचे विमान लागणार हे आम्ही चौघी शोधू लागलो. "जी-एक' या गेटजवळ आम्हाला जायचे आहे, असे इंडिकेटर सुचवत होता. तेवढ्यात सरकत्या जिन्याने आम्ही चौघी वर गेलो आणि एका परदेशी माणसाने समोर असलेल्या "ट्रेन'मध्ये बसा म्हणजे तुम्ही जी-एक गेटजवळ जाल असा सल्ला दिला. आम्ही ट्रेनमध्ये शिरलो असता दुसरा माणूस म्हणाला, "ही गाडी जी-एक गेटजवळ जात नाही. तुम्ही लगेच उतरा.' मी, माझी बहीण व एक मैत्रीण पटकन बाहेर आलो. तेवढ्यात गाडी सुरू झाली व दार बंद झाल्याने एक मैत्रीण आतच राहिली. आमची चुकामूक झाली. इकडे या चार पुरुषांचा पत्ताच नव्हता. आता मात्र आम्ही पार गोंधळून गेलो.

इकडे गाडीने गेलेली मैत्रीण परत आली व पुन्हा आमचा प्रवास जी-एक गेट शोधण्याकडे सुरू झाला. एकीकडे मी सतत बोर्डिंग पास पर्समध्ये शोधत होते आणि तो काही केल्या मिळतच नव्हता. पहिला विमानप्रवास व दुसरा विमानप्रवास यात दोन तासांचे अंतर होते. म्हणजे आम्ही कुआलालम्पूर विमानतळावर दोन तास निवांत असणार होतो. पण आधीचे विमान एक तास कुआलालम्पूरला उशिरा पोचले आणि जी-एक गेट शोधण्यात आमचा अर्धा-पाऊण तास वाया गेला होता. महत्प्रयासाने आम्ही चार-चौघी जी-एक गेटजवळ पोचलो. तिथली माणसे माझ्याकडे बोर्डिंग पास मागू लागली. विमानात बसण्यासाठी असलेली मुदत अवघी पंधरा मिनिटे उरली होती. मी गेटजवळ होते, पण मला आत जाता येईना. कारण माझ्याकडे बोर्डिंग पास नाही. मी मनातल्या मनात परमेश्‍वराचा धावा करू लागले. कारण माझ्यामुळे सगळ्यांची फ्लाइट चुकणार होती. अशा अस्वस्थ अवस्थेत असताना लांबून मला आमचे चार-चौघे येताना दिसले. त्यांनी सगळा विमानतळ आम्हाला शोधण्यासाठी पालथा घातला होता. धावत पुढे जाऊन मी मिस्टरांना माझ्या बोर्डिंग पासबद्दल विचारले. ते म्हणाले, "माझ्याकडे नाही'. शेवटचा आधारही तुटावा असे झाले. माझी पाचावर धारण बसली. "नीट बघा ना' असे म्हणून मी मिस्टरांना परत काकुळुतीस येऊन सांगितले आणि आश्‍चर्य म्हणजे त्यांच्या सॅकमधील एका कप्प्याला चिकटलेला तो बोर्डिंग पास सापडला. माझा आनंद गगनात मावेना. "कुआलालम्पूर ते बाली फ्लाइट ओडी-306 सीट नंबर 33 एफ' ही अक्षरे सुवर्णमय वाटू लागली. आम्ही सर्व जण विमानात बसलो. सुटकेचा निःश्वास टाकला. विमान ज्या वेळी आकाशात बालीच्या दिशेने झेपावू लागले. तेव्हा माझ्या मनातील व पुढील प्रवासातील बोर्डिंग पासची जागा किती महत्त्वाची हे सांगणे नकोच.

Web Title: dr samita tillu write article in muktapeeth