घडवताना घडले मी

डॉ. सुनीता पोखरणा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते; पण शिक्षकही कुणाकडून तरी शिकत असतात. त्यांच्यातील विद्यार्थी सतत जागा असावा लागतो. मग ते विद्यार्थी घडवताना स्वतःही घडत जातात.

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते; पण शिक्षकही कुणाकडून तरी शिकत असतात. त्यांच्यातील विद्यार्थी सतत जागा असावा लागतो. मग ते विद्यार्थी घडवताना स्वतःही घडत जातात.

शिक्षक दिनाची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांशी चर्चा चालू होती. मधेच मागील शिक्षक दिनांना काय- काय केले याचा आढावा घेणे चालू होते. मागोवा घेता- घेता मी तब्बल सत्तावीस वर्षे मागे गेले. म्हणजे 1990 मध्ये पोचले अन्‌ भूतकाळ डोळ्यांसमोर तरळू लागला. त्या वेळी नव्याने सुरू झालेल्या मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. पूर्वानुभव गाठीशी होता. मन आनंदाने भरून गेले. मुलाखतीच्या निमित्ताने संस्थेचे तत्कालीन प्राचार्य बी. जी. जाधव सरांशी परिचय झाला. त्यांच्या मृदू व शांत स्वभावाने मनात विश्‍वास निर्माण झाला.

विद्येच्या माहेरघरी, डेक्कन जिमखान्यावर नामांकित महाविद्यालयांच्या शेजारी शिक्षण संस्थेच्या रूपाने एक रोपटे लावणे हे त्याकाळी शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. अर्थातच, या कार्यासाठी संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष (कै.) शंकरराव चव्हाण व कार्याध्यक्ष (कै.) विलासराव देशमुख यांचा भक्कम पाठिंबा होता. समाजकोशकार (कै.) स. मा. गर्गे प्रेमाने; पण बारकाईने लक्ष ठेवून होते. अतिशय कमी कालावधीत या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात झालेले रूपांतर बघण्याचे भाग्य मला मिळाले. संस्थेचा विस्तार होताना प्रत्येक घटना जवळून अनुभवल्या. एक- एक अनुभव म्हणजे माझ्या आयुष्यातील संस्कार शिदोरीचा भाग आहे. शिक्षक म्हणून संस्थेत दाखल झाले होते; परंतु आज मागे वळून पाहताना असे वाटते, की केवळ शिक्षक न राहता व्यासंगी कधी बनून गेले ते कळलेच नाही.

पहिला संस्कार माझ्यावर झाला तो जाधवसरांच्या रूपाने. ध्यास व प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास कोणतीही अवघड बाब सहज साध्य करता येते, हा आदर्श त्यांनी घालून दिला. शैक्षणिक शाखाविस्तार करायचा तर सामूहिक योगदान महत्त्वाचे असते, हे नकळत मनावर बिंबवले गेले. अध्यापनाचे काम करताना सहअध्यापकांबरोबरच्या चर्चेतून शैक्षणिक मूल्ये रुजली गेली. अवघड संकल्पना प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत मांडण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग होत गेला. श्रवण, संभाषण, लेखन, चिंतन आदी अध्यापन कौशल्ये विकसित केली पाहिजेत, हे मनात ठसले गेले. त्यातून एखादा विषय विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असायला हवे, हे भाषेच्या शिक्षकांबरोबरच्या चर्चांमधून उमगत गेले. प्राचार्य डॉ. एम. डी. लॉरेन्स याचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, उत्तम लेखन पाहून भाषेसाठी ते आमचे गुरू झाले.

अध्यापनाबरोबरच शिक्षकांच्या ठायी संशोधनवृत्ती असायला हवी. एखाद्या विषयावर सखोल माहितीच्या आधारे चिंतन, विश्‍लेषण करून, पद्धतशीर मांडणी करीत, निष्कर्षाप्रत येणे हे माझ्या पीएच.डी.चे मार्गदर्शक डॉ. राम कुलकर्णी यांच्याकडून शिकायला मिळाले. वेगवेगळ्या विषयांवरील संशोधनपर लेखनामुळे संशोधनाची रुची निर्माण झाली. अनेक विषयांवरील संदर्भग्रंथ व अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली. ती वृद्धिंगत ठेवण्याचे काम ग्रंथालयाने केले. सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमातून गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादी कलांबद्दलची अभिरुची होत गेली. उत्तम अध्यापनासाठी बौद्धिक संपदेबरोबरच निरोगी आरोग्याचा मूलमंत्र शारीरिक शिक्षकांकडून मिळाला. "शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्‌' हे ब्रीद मनावर कोरले गेले, ते कायमचेच!

महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांतून वेगवेगळ्या संस्थांशी जोडले गेले. विविध क्षेत्रभेटीच्या निमित्ताने जाणिवा विस्तृत होत गेल्या. अनाथ, अपंग, वृद्ध, मूक- बधिर अशा कितीतरी वंचितांच्या सान्निध्यात आले. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून सकारात्मकतेने जीवनाकडे बघण्याची दृष्टी मिळाली. एनएसएसच्या उपक्रमांतून श्रमसंस्कार झाले. बरीच वर्षे विद्यार्थ्यांच्या सहवासात घालविल्यामुळे विद्यार्थ्यांची देहबोली व चेहऱ्याच्या हावभावांवरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जाण व्हायला मदत झाली. त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांपर्यंत थेट पोचत गेले. त्यातूनच समुपदेशनाची वृत्ती अंगी बाणवली गेली. याचा उपयोग वैयक्तिक व प्रापंचिक समस्या सोडविण्यासही होत आहे.

शारीरिक न्यूनगंडाने विमनस्क न होता आनंदाने कसे जगावे हे आमच्या दिव्यांग सुधा, नीलेश, अंजू या विद्यार्थ्यांनी शिकवले. जन्मतः कमरेपासून पंगू असलेल्या सुधाने जिद्दीने एम.कॉम. पूर्ण केले. बारावीत असताना रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेला नीलेश बी.कॉम. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला, तर जन्मतः अंध असलेली अंजू संगणक क्षेत्रात कार्यरत आहे. आमच्यातील एका सहअध्यापिकेला अपघात झाला. त्यातून स्वतःला सावरत तिने पीएच.डी. पूर्ण केली. या सर्वांचा खूप अभिमान वाटतो. खरेच प्रश्‍न पडतो आहे, की कोण शिक्षक व कोण विद्यार्थी? आयुष्यभर विद्यार्थिदशा संपू नये, असे म्हणतात. आज विचार करताना जाणवते, खरेच की आपण या सगळ्यांकडून किती किती शिकत असतो!

आज निवृत्तीच्या वळणावर भरून पावले आहे. सातत्याने चिरतरुण व ऊर्जा पुरविणाऱ्या या शैक्षणिक क्षेत्रात निवृत्तीनंतरही स्वान्त सुखाय काम करण्याची अनावर इच्छा आहे; हेच याचे फलित म्हणावे लागेल.

Web Title: dr sunita pokhrana write article in muktapeeth