ओकायामाचे सौंदर्य

डॉ. विलीना इनामदार
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

हे उद्यान पुण्यातच आहे. गजबजलेल्या रस्त्यावर. तरीही निसर्गातला एकांत सहवास मिळवून देणारे. हे उद्यान म्हणजे जणू जपानी उद्यान शैलीच्या नजाकतीचा एक नमुनाच आपल्यासमोर उलगडला आहे.

हे उद्यान पुण्यातच आहे. गजबजलेल्या रस्त्यावर. तरीही निसर्गातला एकांत सहवास मिळवून देणारे. हे उद्यान म्हणजे जणू जपानी उद्यान शैलीच्या नजाकतीचा एक नमुनाच आपल्यासमोर उलगडला आहे.

पाऊस नुकताच संपला होता. आसमंतात अजून मृद्‌गंध दरवळतो आहे. वृक्ष, वेलींचा पर्णसंभार कोवळ्या उन्हात ताजातवाना खुलून दिसत आहे. पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडतो आहे. नजर ठरणार नाही अशा गुबगुबीत गवतावर जलबिंदूरुपी हिरकण्या उधळल्या गेल्यात असा भास होतोय, धबधब्यातील तुषाराच्या शिडकाव्याने मन प्रफुल्लित झालेय, छोट्याशा तळ्यात मोजकीच चार-पाचूची बेटे हिरवाईने लुकलुकत आहेत. पक्षी निर्झरच्या बाजूला जलस्नान आटोपून पंख पसरवून सामूहिक सौरस्नान घेत आहेत.

बेंजामिनाची आखीव, रेखीव नयनरम्य वृक्षशिल्पे टोपिअरी स्तब्ध उभी आहेत. देखण्या पाषाण शिल्पावरून ओघळलेले टपोरे जलबिंदू मोत्याची लड सुटावी तसे घरंगळत आहेत. लाकडी शिल्पकृतींची गजेबो सौंदर्यवतींनी भरून गेली आहेत. केशरी कोई-कार्प मासे व पांढऱ्याशुभ्र बदकांचा डौलदार थवा तळ्यात विहार करत आहेत. तळ्यातील बेटावर निरव शांततेत बकध्यान चालू आहे. रंगीबेरंगी फुलांवरून फुलपाखरांच्या झुंडीच्या झुंडी लहरत आहेत. झाडा-झुडपातून येऊन तळ्यातील सावजावर न्याहरी करणाऱ्या खंड्याची एखादी भरारी मनाला उभारी आणत आहे. हिरवळीने लपेटलेल्या उंच डगरींवरून सुवर्ण कोंदणातील टपोरे हिरे सूर्यप्रकाशात चमचम करीत आहेत. हिरव्यागार गालिचातून अडवीतिडवी गेलेली पायवाट अन्‌ पायवाटेला सोबत करीत निघालेले झुळूझुळू पाणी. सगळे वातावरणच धुंद, आल्हाददायक, नेत्रसुखद वाटत आहे. हे वर्णन अतिशयोक्ती नसून वास्तवातील आहे, तेही पुणे-ओकायामा उद्यानातील एका रम्य सकाळचे. जपानी लोकांच्या अभिजात उद्यान शैलीचा एक नमुना पुण्यात सिंहगड रस्त्यावर साकारला आहे, अगदी मेहनतीने.

या उद्यानाला आता जवळपास अकरा वर्षे झाली. येथील पाईन, ज्युनिपर, चिनार सारख्या समशीतोष्ण हवामानातील वृक्षांनी बागेला आपलेसे केले आहे. कालवा आणि सिंहगड रस्ता यांच्या दरम्यानच्या दहा एकर जागेवर पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने डबर टाकून भरावाच्या डगरी उभारल्या. त्यावर चांगल्या मातीचा फूटभर थर चढवण्यात आला. त्यावर लुसलुशीत हिरवळ वाढवली आहे. त्यावेळचे उद्यान अधीक्षक य. शि. खैरे यांनी या बागेसाठी खूप मेहनत घेतली होती. यशवंतराव खैरे हे मनापासून बागांवर प्रेम करणारे अधिकारी होते. त्यांनी शहरातील मोकळ्या जागांवर, ओढ्याकाठीही सुंदर उद्याने उभी केली. वेगवेगळ्या कल्पना राबवल्या. त्यापैकीच ही एक. शुभा भोपटकरांच्या "टीम'ने रस्त्यावरील वर्दळीच्या ध्वनीप्रदूषणापासून झाडांच्या भिंतीने बागेचे संरक्षण केले आहे. तर स्थापत्यशास्त्रज्ञ पंडितांनी कागदावरील मापे जशीच्या तशी इंच-न-इंच जमिनीवर साकार करून भिंतींची तटबंदी साकारली आहे. त्रिकोणी घडीव चिऱ्यांनी. बागेत प्रवेश करताच समोर येते जपानी उद्यान शैलीची नजाकत अन्‌ उत्कंठा लागते - पुढे काय?
जपानी लोकांची शिस्तप्रियतेची, निसर्गप्रेमाची पावला-पावलावर पाहणाऱ्याला प्रचिती येते.

मूळ होन्शू बेटावरील ओकायामा शहरात कोराक्वेन उद्यान आहे, त्याची प्रतिकृती येथे सादर करण्यासाठी आपल्या कामगारांच्या हातात होते टॅब, दुभाषक, तेथील बागेची छायाचित्रे आणि सोबत जपानी तज्ज्ञ. आजही मार्गदर्शनासाठी ही "टीम' येथे येऊन आपल्या कामगारांचे कौतुक करते. "कोराक्वेन'चा जपानी भाषेत अर्थ आहे "नंतर बांधलेली बाग.' तीनशे वर्षांपूर्वी राजेरजवाड्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने उद्यान उभारलेले होते. येथे पुण्यात निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त आनंद लुटा, हा संदेश देणारी ही बाग पाहताना आपण जपान देशातच फिरत आहोत अशी अनुभूती येते.

जपानी मूळ बागेने 1932 मध्ये "अशी' नदीच्या पुराचे व 1945 च्या अणुबॉंबमुळे झालेल्या संहाराचे संकट झेलूनही आपले सौंदर्य अबाधित ठेवले आहे. येथे या बागेत शहरातील इतर भागातील रस्ता रुंदीकरणात हलवावे लागणारे वृक्ष मुळासकट आणून त्यांनी या बागेशी आपली नाळ जोडलेली दिसते. या बागेत फ्लॅकुर्शिया, बॅटिंग्टोनिया, समुद्र शौक अशी शे-सव्वाशे झाडांचे संमेलन भरलेले आहे. झाडांबरोबर येथे निवास करणाऱ्या सुमारे चारशे प्रकारच्या पक्ष्यांची किलबिल येथे ऐकायला मिळते.
जशी ही बाग मनाला आल्हाद देते, तशी सकाळच्या वेळी येणाऱ्या "वॉकर्स'च्या आरोग्याचे रक्षण करते. अगदी नाममात्र शुल्कात खूप काही गवसल्याचा आनंद आपल्याला होतो. या बागेच्या रूपाने पुण्याचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये पुणे महानगरपालिका, उद्यान विभाग सदस्य, कर्मचारी या सर्वांचा मोलाचा वाटा आहेच. पुण्याचे लाडके हरहुन्नरी लेखक, वक्ते, गायक, वादक, कलाकार म्हणून ज्यांचे नाव अजरामर झाले ते पु. ल. देशपांडे यांच्या नावाने ही बाग प्रसिद्ध आहे.

शिस्त व नियमांचे पालन केल्यास पुण्यामधेही जपानचा एक कोपरा तयार होऊ शकतो, हा आत्मविश्‍वास जपानी तज्ज्ञांनी आपल्याला दिला हे या बागेचे सौभाग्य!