सूर्य चालवितो रिक्षा

सूर्य चालवितो रिक्षा

सूर्य सात अश्वांच्या रथातून पृथ्वीप्रदक्षिणा करताना दिसतो. या सूर्यापासूनच सारी सृष्टी ऊर्जा मिळवते आहे. आपली रिक्षाही सूर्याकडूनच चालवली गेली तर? मनात आले आणि ते कामाला लागले. त्यांनी रिक्षेत काही बदल केले आणि त्यांची रिक्षा सूर्य चालवू लागला.

आधुनिक काळानुसार माणसाच्या गरजा वाढत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असल्या, तरी तंत्रज्ञानाने मानवाच्या गरजा उंचावत आहेत. आधुनिक काळात सर्व गरजा शक्‍य आहेत. आपल्याला सूर्यापासून मिळणारा ऊर्जास्रोत कायम आहे. तो आपल्याला अनंत काळापासून मिळत आहे आणि मिळत राहणार. त्याकरिता आपण या उर्जास्रोताकडे लक्ष दिले पाहिजे.

माझे सासरे प्रा. मधुकर मोतीराम चौधरी यांना आधीपासूनच इलेक्‍ट्रिक व सौरऊर्जेवर प्रयोग करण्याची विशेष आवड होती. ही आवड त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही जोपासायची ठरविले. सर्वांत आधी सायकल इलेक्‍ट्रिकवर चार्ज करून चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तो यशस्वी झाला. त्यानंतर घरातील विजेचे दिवे, अन्य घरगुती उपकरणे त्यांनी सौरऊर्जेवर सुरू केली. असे प्रयोग ते नेहमी करत असत. त्यानंतर प्रवासासाठी खर्च न करता कायमस्वरूपी वाहन वापरण्याची कल्पना बाबांच्या डोक्‍यात आली. त्यांनी त्यासाठी तीनचाकी वाहनावर, रिक्षेवर प्रयोग सुरू केला.

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व निसर्गाचे संतुलन राहण्यासाठी, राखण्यासाठी सौररिक्षा बनवणे ही आजच्या काळाची गरज आहे, हे त्यांना जाणवले. त्यांनी सर्व बाबींचा अभ्यास करून सौररिक्षेवर काम सुरू केले, त्यासाठी सावद्याच्या विक्रेत्याने 750 वॉट क्षमतेची रिक्षा दिल्लीवरून मागवून आणून दिली.

आता बाबांचे काम सुरू झाले. त्यांनी त्या रिक्षेवर 960 वॉटचे सौर पॅनेल बसवण्याच्या दृष्टीने त्या रिक्षेच्या छताची लांबी, रुंदी बदलून घेतली. त्यावर 48 व्होल्ट विद्युत दाबाचे व 20 ऍम्पियर प्रवाहाचे सौर पॅनेल बसवून घेतले. बाबांचा मोठा मुलगा कुशल हे इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअर असल्यामुळे त्यांनी आवश्‍यक तंत्रज्ञानासाठी खूप मदत केली. गावातल्या लोकांचीच मदत घेत हवे तसे बदल केले आणि सौररिक्षा तयार झाली.

रिक्षाची कार्यपद्धती अशी, की सौरशक्तीचे सौर पॅनेलच्या मदतीने विद्युत प्रवाहात रूपांतर होते. त्यावर विद्युत मोटार चालवली जाते. रिक्षाचा ताशी वेग वीस किलोमीटर असतो, त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याचा धोका नाही, तसेच प्रदूषण होणार नाही. सौररिक्षेचा फायदा असा, की यांत्रिक मेकॅनिझम कमी असल्यामुळे रिक्षेचा देखभाल- दुरुस्ती खर्च फारच कमी असतो. दुसरा फायदा असा, की रिक्षेला कुठल्याही प्रकारचा आवाज नसल्यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही. रिक्षेचा आवाज नसल्यामुळे लोक कुतूहलाने बघतात आणि विचारणा करतात. त्यांनाही आवड निर्माण होते. इंधनाचा वापर नाही, त्यामुळे हवेचेही प्रदूषण नाही. आमची रिक्षा प्रत्यक्ष सूर्य चालवतो याचा बाबांना आणि आम्हालाही अभिमान आहे.

सहा हजार लोकवस्ती असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खिरोदा येथील प्रा. मधुकर चौधरी म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या अथक प्रयत्नांतून हा प्रयोग यशस्वी झाला. आज ही सौर-रिक्षा खिरोदा- सावदा, खिरोदा- भुसावळ, खिरोदा- रावेर, खिरोदा- यावल या रस्त्यांवर धावताना दिसते. या रिक्षेचा प्रवास निःशुल्क आहे. कुठलाही खर्च येत नाही. या प्रयोगात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने मदत केली. आमचा सर्व परिवार या सौररिक्षेतून आनंदाने व मजेने प्रवास करतो. आता ही सौररिक्षा शहरी भागात चालवण्याचा बाबांचा मानस आहे. त्यामुळे शहरातील वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण कमी करता येईल. त्यादृष्टीने परवानग्या मिळवल्या जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com