दोन अपघात

दोन अपघात

बहुतेकदा बेशिस्त व बेफिकिरी यामुळे अपघात होतात. असे अपघात करणाऱ्यांना शिक्षा काय करायची? अपघात करणाऱ्यांच्या बेपर्वा वृत्तीबरोबरच आसपासच्यांची असंवेदनशीलताही वाढत चाललेली दिसत आहे.

पुण्यात अपघात होणे नवीन राहिलेले नाही. वाढती रहदारी, ही वाहतूक सामावू न शकणारे रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, कुणी कसल्या कारणांनी बारमाही खोदून ठेवलेले रस्ते, कसल्या कुठल्या उत्सवांसाठी अडवलेले रस्ते या सगळ्या अडथळ्यांतून वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना जायचे असते. प्रत्येकालाच पुढे जायची घाई असते. इच्छित स्थळी पोचायला उशीर झालेला असतो. मग सुरक्षितता इतर सांभाळतीलच, मी फक्त पुढे निघतो असे प्रत्येकालाच होते आणि अपघात होतात. प्रत्येक अपघातात शरीरानेच जायबंदी व्हायला हवे असे नाही, पण छोट्याशा अपघातानेही मनावरचा ताण वाढलेला असतो. मन दुखावले गेलेले असते. हा ताण दिवसभर किंवा काही दिवसही पुरतो. आपली काहीही चूक नसताना दुसऱ्याच्या धसमुसळेपणाने अपघात झालेला आणि त्यामुळे आत्मविश्वास गमावून नंतर आयुष्यभर वाहन चालविण्याचा धसका घेतलेला आहे, अशी माणसे मी पाहिली आहेत. हे सगळे सांगतेय, कारण एकाच दिवशी झालेल्या दोन अपघातांत माणसे किती वेगवेगळी वागू शकतात, याचा अनुभव मी नुकताच घेतला.

सकाळची आठ-सव्वाआठची वेळ. नामदार गोखले चौकातून (हॉटेल "गुडलक'जवळ) हॉटेल "श्रेयस'कडे चिंतामणी चितळे पायी निघाले होते. तेवढ्यात चुकीच्या बाजूने एकेरी मार्गाचा भंग करीत वेगाने एक दुचाकीस्वार आला आणि काही कळण्याच्या आतच त्याने चितळे यांना धडक दिली. चितळे पायाला मार लागून खाली पडले. तरी लगेच सावरले. त्यांनी त्या तरुणाला पोलिस चौकीत नेले. दरम्यान, त्या महाविद्यालयीन तरुणाचे मित्र पोलिस ठाण्यात गोळा होऊ लागले.

पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर लक्षात आले, की त्या तरुणाकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. ती गाडीही त्याची नव्हती. गाडीसंबंधी कोणतीच कागदपत्रे नव्हती. अशा परिस्थितीत गाडी एकेरी मार्गाचा भंग करीत चालविली आणि एका पादचाऱ्याला अपघात केला. त्या तरुणाला अटक करावी लागणार होती. त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल होऊन काहीतरी शिक्षा झाली असती. तसे घडले तर त्या तरुणाच्या करियरवर वाईट परिणाम झाला असता. आपण एकाचवेळी किती गुन्हे केले आहेत, हे त्या तरुणाला कळले होते. अपराधीपणाची भावना चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
त्याला अटक झाली, त्याचे करियर बरबाद झाले तर त्या तरुणाला जन्माची अद्दल घडली असती हे खरे आहे; पण त्यामुळे ना चितळे यांचा फायदा झाला असता, ना समाजाचा. केवळ एका तरुणाच्या आयुष्याने विपरीत वळण घेतले असते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अद्दल घडविण्याचा विचार चितळे यांनी टाळला. पण त्या तरुणाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा तर व्हायलाच हवी होती. ही शिक्षा काहीतरी विधायक कृतीची हवी, असा विचार चितळे यांनी केला. त्या तरुणाने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या शंभर तरुणांना संदेश द्यायला हवा. "रॉंग साइडने वाहन चालवू नका. कोणताही नियम मोडू नका. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जिवाशी खेळू नका,' असा हा संदेश शंभर तरुणांना देऊन त्यांची छायाचित्रे व अहवाल पोलिसांकडे द्यायचा, हीच त्या तरुणासाठी शिक्षा.

000
त्याच दिवशी दुपारी माझी मुलगी दुचाकीवरून सेनापती बापट रस्त्यावरून चालली होती. अचानक तिच्या वाटेत एक रिक्षा आडवी आली. तिने ब्रेक दाबून रिक्षेला होणारी धडक टाळली. पण त्याचवेळी मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराला त्याची गाडी थांबवता न आल्याने त्याने तिच्या गाडीला धडक दिली. ती खाली पडली. तिचा पाय गाडीखाली अडकला होता. दुचाकीस्वार पुढे जाऊन थांबला. रिक्षावाला काहीच संबंध नसल्यासारखा पसार झाला होता. मागून येणाऱ्या गाड्या क्षणभरासाठी थबकल्या आणि पुन्हा गती घेत निघून गेल्या.

मुलीने गाडीखाली अडकलेला पाय सोडवला. ती उठली. तिने आपली गाडी उचलली. रस्त्याच्या बाजूला नेऊन उभी केली. पर्समध्ये पाणी होते ते प्याली. धडकेबरोबर वाढलेली धडधड आता थोडी कमी झाली होती. धडक देणारा दुचाकीस्वार गाडीवरून खालीही उतरला नाही. तेथूनच त्याने "सॉरी" म्हटले आणि तोही निघून गेला. या असल्या उन्हातली भर दुपारची वेळ. एक मुलगी दुसऱ्या गाडीची धडक बसून खाली पडते आणि तिला मदत करायला, तिला उठवायला, तिची गाडी बाजूला करायला, तिला पाणी द्यायला कोणीही पुढे येत नाही, ही आपल्या पुण्यातलीच स्थिती. वाटले, पुण्यात इतका उन्हाळा वाढलाय की इथली संवेदनशीलताही आटून गेली.

पुण्यात एकाच दिवशी झालेले दोन अपघात. एका ठिकाणी संवेदनशीलतेने विधायक दर्शन दिले, तर दुसऱ्या ठिकाणी असंवेदनशीलतेचे विदारक दर्शन घडले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत झालेल्या दोन अपघातांत दोन "कृती' दिसल्या ः एकीकडे संस्कृती, दुसरीकडे विकृती.
"पुणे तिथे नेमके काय उणे", हे अशावेळीच तर लक्षात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com