फिरून एकदा...

girish shah write article in muktapeeth
girish shah write article in muktapeeth

पहिल्या नोकरीचे गाव अजूनही मनात वसले आहे. कोकणातील निसर्ग, अंगाला शेतीतल्या कामाचा गंध येणारे विद्यार्थी पुन्हा आठवले आणि पावले त्या गावाकडे वळली.

मुंबई-गोवा महामार्गावरचे खारेपाटण हे एक छोटे गाव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. पदवी मिळाल्यावर दोन वर्षं तिथल्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले आणि माझे आयुष्यच बदलून गेले. स्वातंत्र्यसैनिक शंकरराव पेंढारकरांनी स्थापन करून नावारूपास आणलेली शाळा म्हणजे शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय. या संस्थेत दहावी-अकरावीच्या वर्गांना शास्त्र शिकविण्याची संधी मिळाली.

कोल्हापूरसारख्या शहरातून आणि घरच्या आरामशीर वातावरणातून अचानक खारेपाटणला नोकरीसाठी जायचा निर्णय थोडासा वादग्रस्तच होता. पण तो अनुभव घ्यायचाच असा वडिलांचा आग्रह होता. शाळा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी एसटीच्या टपावर गादी आणि इतर सामान टाकून निघालो. तेव्हा कोल्हापुरात कडकडीत ऊन होते. पण गाडी फोंडा घाटात शिरली तसा पाऊस सुरू झाला. सारे सामान भिजून गेले. माझी आणि इतर नवीन शिक्षकांची सोय पहिल्या दिवशी वसतिगृहात केली होती. संध्याकाळी अंधार पडल्यावर पाय मोकळे करायला बाहेर पडलो आणि पुढच्याच वळणावर लखलखत्या काजव्यांनी प्रकाशमान झालेले चमचमणारे झाड समोर आले. ते विलक्षण दृश्‍य पाहून डोळे दिपून गेले. कितीतरी वेळ दृष्टी बाजूला न करता त्या अनुपम दृश्‍याचा आनंद घेत होतो. मनःपटलावर ठसलेले ते सुंदर दृश्‍य त्यानंतर कितीतरी वेळा आठवले आणि त्याने प्रत्येक वेळी अपार आनंदच दिला.

खारेपाटणच्या शाळेतील ग्रंथालय म्हणजे माझ्या दृष्टीने एक खजिनाच सापडल्यासारखे झाले. आधीच वाचनाची आवड, त्यात हवी तेवढी पुस्तके वाचायला मिळाली. जी. ए. कुलकर्णी, ह. मो. मराठे आदींच्या पुस्तकांची आवड त्याच वेळी निर्माण झाली. "सत्यकथा' मासिक केव्हा येते याची वाट पाहायची आतुरता त्याच काळात निर्माण झाली. नवीन काहीतरी वाचायचे आणि काळे सरांबरोबर त्यावर चर्चा करायची सवय लागली. ते ज्येष्ठ शिक्षक आणि लेखकही होते. त्यांचे आणि माझे खूप छान जमायचे.

रोज उशिरा येणाऱ्या मुलाला मी शिक्षा केली, पण तो दररोज कित्येक मैल चालून कसाबसा शाळेत पोचतो हे समजल्यावर मनाची झालेली घालमेल आठवते. कोकणातले प्रचंड दारिद्य्र पाहून येणारी अगतिकता अनुभवली. पाचशे मुलांपैकी पन्नास मुलांच्याही पायांत चप्पल नसायची. रोज भाताच्या पेजेशिवाय काही खायला मिळायचे नाही. पोळी म्हणजे चपातीची चैन वर्षातून सणासुदीलाच शक्‍य व्हायची. वीस वर्षांचा मी सरासरी सतरा-अठरा वय असलेल्या वर्गाला शिकवायचो. अनंत अडचणींतून शिक्षण घ्यायची त्यांची दुर्दम्य इच्छा पाहून पोटात गलबलून यायचे.
चुकीचे वागल्यावर एका मोठ्या विद्यार्थ्याला पट्टी तुटेपर्यंत आणि हात दुखेपर्यंत मारल्याची आठवण कधीच विसरणार नाही. कारण मी खारेपाटण सोडताना तोच मुलगा हमसून हमसून रडला होता.

ज्योतिष्याची गोडी लागली आणि शिक्षणही तिथेच झाले. पुढच्या आयुष्यात हजारो लहानमोठ्या व्यक्तींच्या पत्रिका पाहाण्याचे बीज खारेपाटणमध्येच रोवले गेले. या छंदाने मला आयुष्यभर खूप मान आणि समाधान दिले.
प्रौढ शिक्षक-शिक्षिकांना मॅट्रिकच्या परीक्षेत पास होता यावे म्हणून घेतलेले वर्ग आठवतात आणि पन्नास-बावन्न वर्षांचे हे "विद्यार्थी' मला "सर' म्हणून संबोधत तेव्हा वाटलेला संकोचही आठवतो. मॅट्रिक पास झाल्यावर मला ते सांगताना उजळलेले त्यांचे कृतज्ञ डोळेही आठवतात. स्वातंत्र्यसैनिक म्हणून पारतंत्र्यात अनेक वेळा तुरुंगवास भोगलेल्या पेंढारकर सरांनी निर्माण केलेली राष्ट्रीय एकात्मतेची ओढ कधी कमी झाली नाही. अनेक उच्च विचार त्यांनी दिले आणि ते आयुष्याचा भागच झाले. आज सर नाहीत, पण त्यांची आठवण चिरंतन आहे.

खारेपाटणचा नितांत सुंदर निसर्ग आणि त्या निसर्गात रोज वावरायची झालेली सवय. शाळेतून गावात जात असताना उजवीकडे सप्टेंबर महिन्यात चालू असणारी भाताची लावणी, त्या शेतात पावसातही काम करणारे स्त्री-पुरुष, उंच उंच माडांची गर्दी, सारेकाही आजही डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे आहे.

या खारेपाटण गावाला आणि शाळेला भेट देण्याचा योग सत्तेचाळीस वर्षांनी आला. शाळेची इमारत पाहिली. सध्याच्या संस्थाचालकांनी स्वागत केले. काळे सर भेटले. खूप आठवणी निघाल्या. सारे शिक्षक बदलले आहेत, पण आपुलकी तशीच आहे. पेंढारकर सरांच्या आठव्या स्मृतिदिनी गेलो होतो. त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना अनेक स्मृती जाग्या झाल्या. आता साठीही ओलांडलेले अनेक विद्यार्थी मुद्दाम भेटायला आले, खूप गप्पा झाल्या. मी त्या वेळी एकटाच रामेश्‍वरनगरात राहत होतो. तिथे आता काळे सर राहतात. इतकी वर्षे उलटल्यानंतरही मधला काळ गडप झाल्यासारखे वाटले. तिथल्या निसर्गाशी पुन्हा एकदा तादात्म्य पावलो. पुढच्या आयुष्यासाठी बळ घेऊन आलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com