माणूसपण जपूया (मुक्तपीठ)

माणूसपण जपूया (मुक्तपीठ)

उपजीविकेसाठी कोणताही व्यवसाय स्वीकारावा; परंतु जीवन जगण्यासाठी "माणूस‘ मात्र अवश्‍य होता आलं पाहिजे! माणूस बनणं म्हणजे माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं! साध्या भाषेत सांगायचं, तर इतरांनी आपल्याशी जसं वागावंसं वाटतं, तसंच आपण इतरांशी वागावं! माणूसपण जपण्याच्या प्रवासातील या काही छोट्या-मोठ्या बाबी...

जीवनात आपण कुणीतरी मोठी व्यक्ती व्हावं, ही प्रत्येकाची मनीषा असते. शाळेत "मी कोण होणार‘ या विषयावरील निबंध लिहिताना डॉक्‍टर, इंजिनिअर, उद्योजक, वैज्ञानिक या पलीकडे सहसा कुणाची झेप जात नाही! समाजसेवक, दीनदलितांचा तारणहार होणार, असं कुणी म्हणताना सहसा ऐकिवात येत नाही. मला वाटतं, की उपजीविकेसाठी कोणताही व्यवसाय स्वीकारावा; परंतु जीवन जगण्यासाठी "माणूस‘ मात्र अवश्‍य होता आलं पाहिजे! माणूस बनणं म्हणजे माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं! दुसऱ्याचं दुःख जाणून घेऊन ते हलकं करण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे माणूसपण जपणं. साध्या भाषेत सांगायचं, तर इतरांनी आपल्याशी जसं वागावंसं वाटतं, तसंच आपण इतरांशी वागावं!

जीवनात पावलोपावली अनेक प्रसंग येतात, ज्यात आपण माणूस म्हणून जगू शकतो. शॉपिंग सेंटरमधे कोणतीही घासाघीस न करता आकारलेली किंमत आपण गुमान देतो. अगदी कॅरिबॅगचेही पैसे मोजतो! परंतु बाहेर पडताच एखाद्या गरीब फेरीवाल्या विक्रेत्याकडे घासाघीस करून भाव कमी करण्यास भाग पडतो. दारावर भाजीची टोपली घेऊन येणाऱ्या बाईकडून भाजी खरेदी करताना आपण असा विचार करीत नाही, की ती महिला दिवस-रात्र उन्हातान्हात मेहनत करून उपजीविकेसाठी प्रामाणिकपणे कष्ट करीत आहे, तर त्या भाजीची खरेदी दोन पैसे जास्त दरानं का करू नये? मी स्वत: घरासाठी लागणारा भाजीपाला आवर्जून अशा छोट्या व्यावसायिकांकडून घेतो, दराबाबत खळखळ न करता!

परवाचाच प्रसंग. नातीबरोबर स्कूटरवरून चाललो होतो. रस्त्यात एक गरीब भैय्या जिवाच्या आकांतानं गुऱ्हाळाचा दांडा ओढून उसाचा रस काढत होता. मी थांबलो. म्हटलं, "पाच ग्लास रस पार्सल द्या‘. त्यानं ताजा रस काढून दिला. मी शंभरची नोट दिली. त्यानं उरलेले पन्नास रुपये परत दिले. मग मी त्याला दहा रुपये आपुलकीनं दिले. त्यानं आढेवेढे घेत ते ठेवून घेतले. त्याच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य होते आणि समाधानदेखील!

परदेशी कंपन्यांच्या रसायनयुक्त शीतपेयांसाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यात आपण धन्यता मानतो. त्याऐवजी आरोग्यदायी उसाचा किंवा फळांचा रस प्यायलो, तर आपल्या शेतकरी बांधवांच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि बेरोजगारांना रोजगार मिळून परकी चलनही वाचेल. एका छोट्या कृतीद्वारे आपण बरेच काही साध्य करू शकतो. माणूस असाच असतो ना?

लग्नकार्यात अलीकडे बुफे पद्धत रूढ झाली आहे. यात पदार्थांची संख्या इतकी जास्त असते, की जेवण मोठ्या प्रमाणात उरते आणि वायाही जाते. आपल्याला पाहिजे तेवढेच वाढून घेण्याची सवय लोकांच्या अंगवळणी पडायला हवी. शिल्लक राहिलेले अन्न कचऱ्यात न फेकता एखाद्या सेवाभावी संस्थेची मदत घेऊन गरजूंपर्यंत पोचविणे ही यजमानांनी स्वत:ची जबाबदारी मानली पाहिजे. ही मानसिकता निर्माण होणे म्हणजेच माणूसपण निर्माण होणे; नव्हे का?
लग्नात वधू-वराच्या डोक्‍यावर अक्षता टाकल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तांदूळ वाया जातो. एकीकडे कुपोषण, उपासमारीमुळे होणारे मृत्यू आणि दुसरीकडे काही टन धान्याची नासाडी, असे विपर्यस्त चित्र दिसते. त्याऐवजी फुलांच्या पाकळ्या वधू-वराच्या डोक्‍यावर टाकल्या, तर किती छान होईल! यामुळे तांदळाची नासाडी वाचेल आणि फुलांना मागणी येऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. वाढदिवसासारख्या कार्यक्रमांसाठी व्यर्थ खर्च करण्याऐवजी सामाजिक उपक्रम राबविण्याचा पायंडा मी स्वत: पाडला आहे.

रस्त्यानं जाताना एखादा अपघात झाला असता, आपण घाईचं आणि "लेटमार्क‘चं कारण पुढे करून निघून जातो. निदान अपघातग्रस्त कोण आहे, ओळखीचा तर नाही ना, नसला तरी पोलिसांना कळविणं, रुग्णवाहिका बोलाविणं अथवा ओळखपत्राच्या आधारे संबंधिताच्या नातेवाइकांना कळविणं सहजशक्‍य असतं... माणसाचा जीव बहुमोल असतो, हे आपल्यावर संकट कोसळल्यानंतरच माणसाला समजणार का?
माणूसपण जपण्याच्या प्रवासातील या काही छोट्या-मोठ्या बाबी... बघा, पटतंय का!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com