अवलंबित्व कमी करूया

अवलंबित्व कमी करूया

अरे, आम्ही सर्वजण एन्जॉय करतोय आणि तू कोपऱ्यात बसून रडतोयस काय..? तो कबीर बघ इतका लहान असूनही किती फ्रेश, हसतमुख आहे. उत्साह आणि भारावलेल्या शिबिरातील मुलं आई-बाबांच्या आठवणीने कोमेजून गेलेल्या हर्षला समजून सांगत होती. याउलट प्रथमच घर सोडून लांब राहणारा केदार. नेहमी हसतमुख चेहरा, सर्वांमध्ये सहजपणे मिसळणारा, त्याच्या मिळतंजुळतं घेणाऱ्या स्वभावामुळे शिबिरामध्ये तो सर्वांचाच आवडता. त्याच्या खेळकर स्वभावाबरोबरच स्वतःची कामे स्वतः करतो, गरजेनुसार नि:संकोच मदत मागतो आणि इतरांच्या गरजेलाही लगेच धावून येतो, म्हणून त्याचं साऱ्यांनाच कौतुक वाटत होतं.

काही मुलं शारीरिक, बौद्धिक सक्षम असूनही भावनिकदृष्ट्या एखाद्या व्यक्तीवर पराकोटीची अवलंबून असतात. आधारासाठी पकडलेल्या माणसाशिवाय आपण एकटे राहू शकतो, अशी कल्पनादेखील त्यांना मान्य होत नाही. अशा विचारानेदेखील त्यांचं अवसान गळून जातं. ‘सारं संपलं’ अशा भावनेने पोटात भीतीचा गोळा येतो आणि अंग थरथरायला लागतं. सभोवताली इतर कितीही प्रेमळ माणसं असली तरी आधारवड म्हणून निवडलेल्या व्यक्तीशिवाय त्यांना एकटं राहणं अशक्‍य होतं. खरं तर जन्मापासून प्रत्येक माणूस आधार शोधतच असतो; पण वाढत्या वयाबरोबर आई-वडिलांचे बोट सोडून स्वतंत्रपणे काहीच करता न येणे याला ‘डिपेंडंट पर्सनॅलिटी’ असं म्हणतात. आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून आहोत ती दुरावेल, आपल्यापासून लांब जाईल याची या मुलांच्या मनात सतत चिंता असते, त्यामुळे आपली कोणीतरी काळजी घ्यावी, अशी त्याची टोकाची अपेक्षा असते. मित्र, शाळा, समारंभ अशा ठिकाणी दिवसभर ही मुलं एन्जॉय करतात; पण आपला आधार तुटतोय, अशी जाणीव होताच गळून पडतात. विशिष्ट व्यक्तीच्या आधाराशिवाय एकटे राहणं त्यांना अशक्‍य होतं. मग आधारापर्यंत पोचण्यासाठी ते कोणत्याही मार्गाचा अवलंब करायला तयार होतात. अनेक युक्तिवाद करतात. प्रसंगी रागाने बेभान होऊन पुढच्या व्यक्तीचा अपमान करणं, मारणं, धमकी देणं, रूसून बसणं, खाणेपिणे नाकारणे अशा गोष्टींतून अपरिहार्यपणे आधार व्यक्तीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात.

दैनंदिन जीवनात रोजची साधी साधी कामंसुद्धा कोणाच्यातरी मदतीशिवाय करणं त्यांना जमत नाही. स्वतःजवळ चांगल्या क्षमता असूनही आत्मविश्‍वासाचा अभाव असल्यामुळे ही मुलं मागे पडतात. आपण एकटं पडू या भीतीनं सुरक्षितता शोधू लागतात. मुळूमुळू रडू लागतात आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अनेक कुटुंबांमध्ये आज एकच मूल असते, त्यामुळे त्याचे कळत-नकळतपणे अतिसंरक्षण होते. मूल एकटं बाहेर गेले तर हरवेल, सायकल चालविली तर पडेल, मित्रामध्ये गेले तर वाईट संगत लागेल या पालकांमधील असुरक्षिततेच्या विचारामुळे मुलाला कक्षेबाहेरचा विचार करता येत नाही, त्यामुळे आत्मविश्‍वासाच्या अभावामुळे त्याला बाह्य जगामध्ये नेहमी असुरक्षितता वाटते. पालकांच्या इकडे जाऊ नको तिकडे पाहू नको अशा इशाऱ्यांमुळे मुलांमध्ये द्विधा अवस्था निर्माण होते. आई-वडिलांपासून वेगळं होण्याची ही चिंता मुलांच्या अपुऱ्या भावनिक विकासाचेच लक्षण आहे. काही कुटुंबांत छोट्या-छोट्या गोष्टींवरून मुलांना रागावले जाते. घरातील कडक शिस्त, सततचा धाक यामुळेही मुलांच्या मनावर मानसिक दडपण असते. बाहेर गेल्यानंतर आपले काहीतरी चुकेल, कुणीतरी रागवेल या भीतीनेही अनेकदा मुलांना असुरक्षित वाटते तर काही मुलांचे बालपणी अतिलाड, अतिसंरक्षण यामुळे आत्मकेंद्री वृत्ती वाढीस लागते. हे मूल प्रत्येक गोष्टीत स्वतःचाच विचार करते, इतरांच्या भावनेला महत्त्व देत नाही. मात्र कुटुंबापासून दूर गेल्यानंतर स्वतःच्या इच्छापूर्ती होणार नाहीत या भीतीने पालकांचे बोट सोडत नाहीत. भविष्यातील मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी भौतिक स्वावलंबनासाठी आपण प्रयत्नशील असतोच, त्यामुळे आपण हरलोच तर, आई-बाबाच आपणाला भक्कम आधार ठरतील, हा आत्मविश्‍वासही मुलांमध्ये येतो; पण स्वतःचं विश्‍व पाहताना, नवा आनंद शोधताना मुलांनी आपलं बोट सोडलंच नाही तर...? असं होऊ नये म्हणून...

  •  मुलांचे अतिसंरक्षण करणे टाळूया.
  •  मुलांना योग्यवेळी स्वातंत्र्य देऊया.
  •  मुलांना स्वतःची कामे स्वतः करण्यास प्रोत्साहन देऊया.
  •  परिस्थितीनुरूप येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देऊया.
  •  मुलांना यशाइतकाच अपयशाचाही स्वीकार करायला शिकवूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com