तो अजून आठवतो!

तो अजून आठवतो!

तो अचानकच एके सकाळी शाळेत माझ्यासमोर उभा राहिला. त्याची त्या वयातील समज, शाळेची ओढ यामुळे तो लवकरच शिक्षकांचा, मुलांचा लाडका झाला. तो आला तसा निघून गेला.. आठवणी मागे ठेवून.

ही घटना आहे तीन वर्षांपूर्वीची. नोव्हेंबरमधली. मी नेहमीप्रमाणे शाळेत सकाळी पोचले, तोच एक चुणचुणीत मुलगा माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मला मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, ""तुम्ही इथे टीचर आहात ना?'' मी त्याच्याकडे पाहून हसत "हो' म्हणाले. त्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. तो पटकन म्हणाला, ""टीचर, मी इथे शाळेत बसू शकतो का?''

अतिशय निरागस चेहऱ्याच्या त्या विद्यार्थ्याकडे असलेली धिटाई, नम्रता व हजरजबाबीपणा पाहून मला त्याचे खूप कौतुक वाटले. नकळत त्याच्या डोक्‍यावरून हात फिरवत म्हणाले, ""बस की! शिकू इच्छिणाऱ्या मुलांसाठीच तर शाळा आहे.'' मी त्या मुलाला बरोबर घेऊनच वर्गात आले. वर्गात आल्यावर त्याला जवळ घेऊन त्याची चौकशी केली. तो ऊसतोडणी कामगाराचा मुलगा होता.

आदल्या दिवशी रात्री उशिरा ऊसतोडणी कामगारांची एक टोळी आमच्या वस्तीशेजारी आली होती. ऊसतोडणी कामगारांबरोबर त्यांची मुलेही असतात. त्यांची कुठेतरी अर्धवट शाळा झालेली असते. थोडेफार ही मुले शिकतात, तोच त्यांना आईवडिलांबरोबर गाव सोडावे लागते. त्यांची शाळा सुटू नये यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून खरे तर ऊसटोळी आली की, आम्ही शिक्षक त्यांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या मुलांना शाळेत घेऊन येत असतो. आजही शाळेतून तिकडे जाणार होतो, पण त्याआधीच शाम शाळा शोधत आला होता. त्याचे हे वेगळेपण लगेच लक्षात आले. त्याला बरोबर घेऊनच मग त्या टोळीबरोबर आलेली इतर मुलेही शाळेत आणली.

शामची भाषा आमच्या शाळेतील मुलांपेक्षा वेगळीच होती. त्यामुळे तो बोलायला लागला की, सगळी मुले हसायची; पण मुलांना समजून सांगितल्यावर हसणे, त्याला भाषेवरून चिडवणे बंद झाले; पण शामनेही आपल्याकडे कमी असलेल्या गोष्टींचा कधीच न्यूनगंड बाळगला नाही. तर तो त्यावर स्वतः उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असे. हे त्याचे आणखी एक वेगळेपण. एरवी तिसरीतल्या मुलापेक्षा त्याची समज, शिकण्याची त्याला असलेली ओढ खूप वेगळी होती.

मी परिपाठानंतर त्याला त्याच्या तिसरी इयत्तेची पुस्तके दिली. त्याने ती त्याच्या कॅरिबॅगमध्ये ठेवली. दुसऱ्या दिवशी तीच पुस्तकाची कॅरिबॅग घेऊन तो शाळेत आला; परंतु शाळा सुटल्यावर ती गडबडीत घेताना फाटली आणि सर्व पुस्तके खाली पडली. मी त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्याचा चेहरा रडवेला झाला होता. मी त्याला समजावून धीर दिला अन्‌ दुसरी पिशवी दिली. दुसऱ्या दिवशी मी त्याला नवीन सॅक दिली, त्या वेळेस त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. तेव्हापासून की काय, पण त्याला माझ्याबद्दल व शाळेविषयी आणखीन आपुलकी निर्माण झाली. तो खूप मनमोकळेपणे गप्पा मारू लागला. अभ्यासातही चांगला तयार झाला. त्याच्यापाशी कुशलता होती. थोड्याच दिवसात अतिशय हुशार चुणचुणीत विद्यार्थी, एक चांगला मित्र म्हणून तो सर्वांच्याच कौतुकास पात्र झाला.

ऊसतोडणी संपल्यावर शाम येथून जाणार ही सल मात्र मनाला टोचत होती. शामलाही इथून जावेसे वाटत नव्हते. तो मला म्हणायचा, ""मॅडम, मला इथेच राहावेसे वाटते. ही शाळा सोडावीशी वाटत नाही; पण...'' आणि त्याचा येथून जाण्याचा दिवस जवळ आला. आम्ही सर्वांनी दुःखानेच, पण समारंभपूर्वक त्याला निरोप दिला. त्या वेळेस मात्र त्याच्या व आमच्या सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.
त्यानंतरही ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या आल्या आणि गेल्या. प्रत्येक वेळी मला शामची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पुन्हा दुसरा शाम अशा टोळीतून शाळेकडे आलेला नाही. गोकुळातील कृष्णाने जसे सर्व गोकूळवासीयांना आपल्या लीलांनी मोहित केले, तसाच हा शामसुंदर आम्हाला जीव लावून दुसऱ्या गावी निघून गेला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com