किल्लीपुराण

किल्लीपुराण

आदिमानवाची जसजशी प्रगती होत गेली, तसतसा तो स्थायिक होऊन एका जागी राहू लागला. कालांतराने पंचमहाभूते व जंगली श्वापदे यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी त्याने घर बांधण्याची कला शिकून घेतली. घरापाठोपाठ दारही आले. मानवाच्या काही दुर्गुणांना दूर ठेवण्यासाठी दाराला कुलूप लावण्याची गरज भासू लागली. कुलपाबरोबरच किल्लीचाही जन्म झाला.


आजमितीला तर कुलूप-किल्लीशिवाय आपले पान हालत नाही. किल्ली नसेल तर एकट्या कुलपाचा काय उपयोग? म्हणूनच किल्ली अत्यंत जपून ठेवावी लागते. किल्ली हरवल्यास कुलपाची विश्वासार्हता निघून जाते. बाहेर जाताना घराच्या दाराला कुलूप लावावेच लागते, परंतु दुचाकी आणि चारचाकी वाहने (अगदी सायकलीही) कडीकुलपात ठेवावी लागतात. पैशांचे व्यवहार करण्यासाठी बॅंकेत जा, विमान अथवा आगगाडीने प्रवास करीत असा, फार काय पण स्वत:च्याच घरात अथवा हॉटेल रूममध्ये प्रवेश करीत असा, अनेक ठिकाणी इलेक्‍ट्रोनिक चावी मागितली जाते.

माझ्या बालपणी आम्ही शेतामध्ये घर बांधून राहत होतो. घराच्या भिंती, खिडक्‍या आणि छत वगैरे बांधून झाले. वडिलांची सर्व पुंजी संपून गेली. घराला दार बसविण्यासाठी पैसेच उरले नाहीत. कुटुंबातील आम्ही सर्वजण एकाच वेळी गावाला जाण्याचा योग कधीच येत नव्हता. त्यामुळे त्या बिनकुलपाच्या राजवाड्यात आम्ही अत्यंत निर्धास्तपणे जवळजवळ पंधरा वर्षे राहत होतो. या ठिकाणी अमेरिकेत घडलेली एक घटना मला आठवते. मी व माझे बंधू श्रीनिवास पिट्‌सबर्गला माझ्या पुतणीकडे तीनचार दिवसांसाठी गेलो होतो. माघारी येऊन पाहतो, तर बंगल्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावायला माझा भाऊ सपशेल विसरला होता. पैसाअडका व इतर मौल्यवान वस्तू जागच्या जागी होत्या, हे सांगायलाच नकोच!

अलीकडच्या काळात दाराला अंगचे कुलूप (लॅच) लावण्याची प्रथा दिसून येते. मात्र अशी कुलपे वापरण्यात एक धोका असतो. आपण बाहेर असताना अनवधानाने अथवा वारा आल्यामुळे दाराचे स्प्रिंग असलेले कुलूप आपोआप बंद होते आणि आपण रस्त्यावर येतो. मुंबईला महलक्ष्मीच्या सरकारी निवासामध्ये राहायला गेल्यावर पहिल्याच दिवशी आम्हाला याची प्रचिती आली. सुदैवाने बाल्कनीचे दार उघडे होते. दोन धाडसी तरुणांनी टेरेसवरून जाऊन पुढचे दार उघडले. अगदी अशीच घटना सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे झाली. मी मुलीला भेटण्यासाठी तेथे गेलो होतो. एकदा सुटीच्या दिवशी समोरच्या गाळ्यात राहणारी एक गोरी म्हातारी आमच्याकडे रडतरडत आली आणि हातवारे करून काहीतरी सांगू लागली. ती रशियन भाषेत बोलत होती; परंतु ती भाषा सर्वांनाच अगम्य होती. मला मात्र थोडीफार रशियन कळत असल्यामुळे एकूण परिस्थितीचे गांभीर्य लगेचच समजले. बाल्कनीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे घराचे प्रवेशद्वार बंद झाले होते. माझ्या जावयाने पोलिस चौकीला फोन केला. दहा मिनिटांत भली मोठी शिडी घेऊन दोन पोलिस हजर. बाल्कनीतून जाऊन त्यांनी घराचा दरवाजा उघडून दिला. आजीबाईंनी बक्षीस म्हणून पोलिसांना काही नोटा देऊ केल्या. पोलिसांनी उत्तर दिले : "आजी, बक्षीस नको. हे आमचे कामच आहे. काम केल्याबद्दल सरकार आम्हाला पगार देते.‘ आम्ही आश्‍चर्यचकित होऊन बघतच राहिलो.

सर्वच "किल्ल्यां‘ना हरवण्याची वाईट सवय असते. (म्हणूनच पूर्वी लोक महत्त्वाची किल्ली जानव्याला अडकवीत अथवा मंगळसूत्राप्रमाणे गळ्यात घालीत.) किल्ली हरवल्यावर नेहमीच किल्लीच्या डॉक्‍टरला बोलवावे लागते. त्या वैदूचा हातगुण अगदी विस्मयकारक असतो. कुलूप कितीही आडमुठे आणि जुनाट असो, ते अल्पावधीतच तोंड उघडते. डॉक्‍टर आपली दक्षिणा घेऊन अंतर्धान पावतात. अशा प्रसंगांवर उतारा म्हणून काही लोक मूळ किल्लीची "डुप्लिकेट‘ किल्ली तयार करून ठेवतात. मालकाला कळू न देता जेव्हा अशी डुप्लिकेट किल्ली बनवायची असते, तेव्हा साबणाच्या वडीच्या पृष्ठभागावर मूळ किल्लीचा ठसा घेतात, हे मी (सिनेमात) बघितलेले आहे.

"गोदरेज‘सारख्या नावाजलेल्या कंपन्या मात्र डुप्लिकेट किल्ली बनविण्यापूर्वी मालकाकडून कोर्टपेपरवर हमीपत्र लिहून घेतात.  

माझ्या बालपणी घरात एखादेच कुलूप असायचे. आता मात्र कुलूप-किल्ल्यांचा नुसता सुळसुळाट झाला आहे. तसेच आता कुलपे बनविण्याचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिक प्रगत होत आहे. मझाजवळ एक रशियन बनावटीचे कुलूप आहे. ते बंद केल्याशिवाय किल्ली काढता येत नाही (व त्यामुळे किल्ली हरविण्याची शक्‍यता कमी होते) आणि किल्लीच्या पृष्ठभागावर अनेक उंचवटे असल्यामुळे डुप्लिकेट किल्ली बनविणे अशक्‍य होते. शिवाय आता अंकांच्या क्रमांकानुसार उघडझाप करणारी कुलपे (नंबर लॉकस्‌) वापरात आल्यापासून तर क्रांतीच झाली आहे. आता किल्ली हरवण्याचा प्रश्नच नाही. फक्त एक क्रमांक ध्यानात ठेवला, की बस. बहुतेक पंचतारांकित हॉटेलांमध्ये आता किल्ली देत नाहीत. एक प्लास्टिकची पट्टी दरवाज्यावरील खाचेत सरकवली की, तिळा! तिळा!! दार उघड.

माझ्या पहिल्या अमेरिका वारीतली घटना. हॉटेलात पोचलो तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता. हॉटेलच्या कर्मचाऱ्याने रूम उघडून दिली आणि तो नाहीसा झाला. मला दरवाजा आतून बंदच करता येईना. शेवटी प्रवासी बॅग दरवाज्याला आतून लावून ठेवली आणि चक्क झोपी गेलो. त्याच सफरीमध्ये एकदा न्यूयॉर्कच्या हवाईअड्ड्यावर स्वच्छतागृहामध्ये अडकलो. मला दार उघडून बाहेरच येता येईना. मला जायचे होते त्या उड्डाणाची घोषणा मात्र सारखी कानावर पडत होती. चांगलाच घाबरलो. काही वेळाने एक गोरा दार उघडून आत आला आणि मी दार बंद व्हायच्या आत बाहेर पडलो. सुटलो बिचारा.

मी सिंगापूरमध्ये काम करीत होतो, तेव्हा तिरुपती विद्यापीठाचे एक प्राध्यापक काही दिवसांकरिता माझा पाहुणचार घेऊन गेले. निघायच्या दिवशी त्यांनी नंबर लॉक असलेली एक सुंदर हॅंडबॅग खरेदी केली. मी त्यांना नंबर लॉक कसे "सेट‘ करायचे, त्याचे प्रात्यक्षिक दिले. त्यांनी स्वत: दुसरा नंबर सेट केला व पैसे आणि पासपोर्ट आत ठेऊन बॅग बंद केली. मात्र त्यांना बॅग उघडता येईना, कारण त्यांनी सेट केलेला नंबर त्यांना आठवेना! हवाईअड्ड्याकडे निघण्याची वेळ जवळ येत होती. टॅक्‍सी मागविलेली होती. प्रोफेसरसाहेबांना घाम फुटला. मी क्रमाने कुलूपावर अंक फिरवू लागलो आणि कर्मधर्म संयोगाने लवकरच बॅग उघडली. प्रोफेसरसाहेबांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू चमकले. 


प्रत्येकाच्या आयुष्यात कडीकुलपाशी संबंधित अनेक घटना घडत असतात. आता किल्लीशी निगडित एकच हलकाफुलका किस्सा सांगतो आणि हा लेख आवरता घेतो. एकदा लहान मुलांच्या शाळेत शिक्षणाधिकारी वार्षिक तापासणीकरिता आले. त्यांनी वर्गातील मुलांना एक प्रश्न विचारला : शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? बिचारी मुले गोंधळून गेली आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागली. गुरुजी हळूच साहेबांच्या मागे जाऊन उभे राहिले. त्यांनी खिशात हात घालून किल्ल्यांचा जुडगा बाहेर काढला आणि तो वर्गातील मुलांना दाखविला. अजूनही मुले गोंधळलेलीच दिसत होती. ती सर्व गुरुजींकडे नुसती बघत होती. एवढे झाल्यावर साहेब एकदम मागे फिरले, त्यांनी गुरुजींच्या हातातील किल्ल्या घेतल्या आणि त्या किल्ल्या विद्यार्थ्यांना दाखवीत ते म्हणाले : बाळांनो, शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. गुरुजींचा चेहरा बघण्यासारखा झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com