टांगा

टांगा

टांगा, बग्गी, व्हिक्‍टोरिया... नावं वेगवेगळी. समाजातील व्यक्तीच्या आर्थिक स्थितीची कल्पना देणारी... पण त्यातून फिरण्याची मजाही तितकीच न्यारी.

टांगा या शब्दाचा उच्चार जरी केला तरी मन लगेच भूतकाळात जाते. लहानपणी आम्हाला रस्त्यावर पादचारी, सायकलस्वार आणि टांगेवालेच दिसायचे. कधीतरी मधूनच एखादी श्रीमंताची पांढरी ऍम्बेसिडर गाडी दिसायची. आमच्यासारख्या शाळकरी मुलांसाठी टांग्यामधून शाळेत जायची पर्वणीच असायची. टांगेवाले काकांशेजारी म्हणजे टांग्याच्या पुढच्या भागात बसायचा वेगळाच आनंद असे. अधूनमधून काकांच्या हातातील लगाम आपल्या हातात घ्यायचा आणि "सारी दुनिया मुठ्ठीमें' असं वाटायचं. त्या घोड्याशी संवाद साधायचा आणि प्रेमाने हातही फिरवायचा. कधी वळणावर, चढ-उतारावर काका काही वेगळेच आवाज, शब्द तोंडातून काढायचे. ते आमच्या इतके तोंडवळणी पडले होते की, त्या-त्या ठिकाणी आम्हीसुद्धा नकळत काकांसारखे आवाज काढायचो.

टांगा म्हटले की... डोळ्यांसमोर येतो तो लाल टांगा, त्यावर काळे ताडपत्रीचे छप्पर, लाकडी चाके. त्याला लावलेलं वंगण. त्या टांग्याच्या पुढ्यातला रूबाबदार घोडा, त्याच्या मानेवर रूळलेले केस, त्याला बांधलेला लगाम. या लगामाचं एक टोक टांगेवाल्याच्या हातात. टांगेवालासुद्धा धष्टपुष्ट, भारदस्त नजरेसमोर येतो. त्याच्या एका हातात लगाम, तर दुसऱ्या हातात चाबूक! टांगेवाला हा या टांग्याचे सारथ्य करणारा...

टांगेवाल्याचे आपल्या टांग्यावर आणि घोड्यावर किती प्रेम आहे, ते घोड्याच्या प्रकृतीवर आणि टांग्याच्या बाह्य रूपावरून समजत असे. टांग्यांच्या टपावर किंवा बाजूला टांगा नंबर लिहिलेला असे. म्हणजे तो गावात कितव्या नंबरवर आहे, हे समजले जाई. मग आम्हाला एक नंबर टांगा कसा दिसतो, हे पाहायची उत्सुकता असे. गावातल्या पेठांपाशी, स्टेशन, एसटी स्टॅंडजवळ टांग्याच्या रांगा असायच्या. टांगा स्टॅन्ड असायचा.

आता आपल्या शाळांसमोर रिक्षा, व्हॅन यांच्या रांगा दिसतात तशा आमच्या शाळांच्या समोर टांग्याच्या रांगा दिसत. शाळा सुटायच्या आधी सगळे टांगेवाले दिसायचे. घोड्यांच्या पुढ्यात कधी ओला हरभरा, तर कधी गवत असे. त्याचे संथपणे खाणे चालू असे. शाळा सुटल्याची घंटा म्हणजे घोड्यांची खाण्याची सुटी संपायची आणि आमच्या तैनातीला तयार!

किती वेगळा काळ होता तो... ना प्रदूषण, ना हॉर्नचा आवाज. ना वाहनांचा गोंगट. सारे कसे शांत शांत! टांगा प्रवासात आमच्या शब्दसंग्रहात बरीच वाढ झाली होती. लगाम, घुंगरांची माळ, खोगीर, चाबूक, नाल, तबेला, खुराक, तुमान, सदरा अशा कितीतरी शब्दांचा अर्थ समजून, अनुभवायला मिळाला. घोड्यांशी संवाद कसा साधायचा, त्यांचा आहार, त्यांच्या नालेची काळजी. नाल बदलताना होणाऱ्या वेदना हे सगळे काका आम्हाला अगदी सहज सांगून जायचे.

आमच्या घराजवळ एका ठिकाणी घोड्यांच्या पायांची नाल बसवून मिळायची. खूप टांगेवाले तिकडे यायचे. तेव्हा घोड्यांच्या त्या वेदना पाहायला मिळाल्या, पण त्या सोसल्यावर त्यांना खडकाळ, कठीण रस्त्यावर चपळ चाल करता येत असे, हे कारणंही समजलं. टांगा सजवणे हा पण टांगेवाल्यांचा शौक असे. विविधरंगी पिसांचे पंखे, फुगे टांग्यावर लटकवायचे. नवीन नवीन हॉर्न लावायचे.

दिवेलागणीवेळी टांग्यावर बत्ती लावायची सोय. काय थाट असे. आम्हीपण फिदा होऊन या टांग्यांमधून चक्कर मारायचा हट्ट करत असू. टांगा प्रवास हा सामान्याच्या खिशाला परवडणारा होता. टांग्याला भीमथडी तट्टू जोडलेले असायचे. टांग्याच्या पुढच्या भागात पायाजवळच घोड्यांचे खाद्य असायचे. टांगेवाल्याजवळच त्या अडचणीतसुद्धा दोघे-तिघे सुखाने बसायचे. मागच्या सीटवर बायकापोरं, ट्रंका, वळकट्या असे दृश्‍य गावातल्या स्टॅंन्डजवळ नेहमी पाहायला मिळायचे.
टांग्याच्या पुढचा टप्पा म्हणजे बग्गी काही प्रतिष्ठित लोकांची खासगी बग्गी असे. त्याला काहीवेळा दोन घोडे जुंपलेले असायचे. अशा बग्गीतून ते गावात फेरफटका मारायचे. त्यांच्या चेहऱ्यावर तो प्रतिष्ठेचा बडेजाव दिसे. आमच्या टांग्यात मात्र तो कधीही जाणवला नाही.

त्या काळी लहान मोठ्या गावांमध्ये टांगाच दिसे. बग्गी एखादी-दुसरी नजरेस पडे. मुंबईत मात्र व्हिक्‍टोरिया नजरेस पडे. या व्हिक्‍टोरियाची खासियत म्हणजे ती खूप ऐसपैस होती. रूबाबदार अरबी घोडे तिच्या दिमतीला असायचे. बिटिश लोकांना टांगेवाल्याजवळ बसणे जमायचे नाही. त्यांच्या प्रतिष्ठेच्या आड होते. म्हणून ही नवीन घोडागाडी अस्तित्वात आली. त्या व्हिक्‍टोरियाला दोन भाग असायचे. अतिशय लक्षवेधी, आलिशान.

व्हिक्‍टोरिया मुंबईची जान होती. आता ती नजरेआड गेली असली तरी अशी ही व्हिक्‍टोरिया आणि तिचे कंदील आपल्याला बॉलिवूडच्या 'व्हिक्‍टोरिया नं.203'मुळे चांगलीच लक्षात आहे. "जाल' सिनेमातील जॉनी वॉकरच्या "ऐ दिल है मुश्‍किल जीना यहा...' या प्रसिद्ध गाण्यामधली अतिभव्य व्हिक्‍टोरिया नजरेसमोर येते. "शोले'मधील बसंती-धन्नो आणि तिचा टांगा खूपच गाजला. तसेच टांगाच्या, घोड्यांच्या टापांचा हुबेहूब आवाज ऐकवणारे ओ. पी. नय्यरांचे "नया दौर'मधील "मांग के साथ तुम्हारा, मैने मांग लिया संसार' हे गाणे आठवले. या काही बॉलिवूडच्या 'टांग्या'शी निगडित आठवणी.

तसेच एका मराठी गीताची आठवण येते. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं, शांताराम नांदगावकरांच, शकुंतला जाधवांच्या आवाजातील "बाबू टांगेवाला माज्या जीवाचा मैतर झाला'... टांगेवाल्याबरोबर जीवाचं नात जोडणारं हे गीत!
आता तो टांगा नाही. टांगेवाला नाही, पण माझिया मनाच्या कोंदणी दडल्या अशा अनेक आठवणी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com