समईच्या शुभ्र कळा

समईच्या शुभ्र कळा

समईच्या शुभ्र कळा उमलतात तिन्ही सांजेला अन्‌ सरत्या तेलाचं भय मनातून दूर सारत उजेड फुलवतात सर्वत्र. ही सांजवात उजळत जाते मनातलीही काळोखी वाट अन्‌ उजळते आयुष्य.

संध्याकाळी देवासमोर तेलवात लावून "शुभं करोती' म्हणताना, "तिळाचं तेल, कापसाची वात' यामध्ये दिव्याचा उल्लेख आला अन्‌ सहजच विचार आला... सरत्या तेलाचे भय मनात असूनही ती दिव्याची वात नित्यनेमाने आपले काम करते. प्रकाश सुखसमृद्धी देते. रोज प्रकाशमान होऊन प्रकाशाचे सामर्थ्य पसरवते, ही तिन्ही सांजेची सांजवात. माणसाच्या आयुष्याचेही असेच असते का, असा क्षणभर विचार आला. काय शिकू शकतो आपण या सांजवातीकडून? आयुष्याच्या अथांग क्षणरूपी पाण्यात मधोमध तरंगत, तेवत असते आपले हे आयुष्य, या सांजवातीसारखेच. त्या क्षणांचा आधार घेऊन ते तरळते, बहरते. अगदी या सरत्या तेलाचे भय असूनही कर्म, कर्तव्य, विश्‍वास, प्रेम या सगळ्या पैलतटांवर थांबत, स्वतःला सिद्ध करत, माणूस या सांजवातीसारखा तेवत, कुणाला न दुखावता, प्रकाश देत राहतो. हरणाऱ्या प्रत्येक क्षणांना जिंकण्याची ओढ लावणारे हे तेज पसरवत तो जगत राहतो. मग भूतकाळाच्या त्या तरल, रम्य आठवणी प्रत्येक तटांवर थांबत उधळून टाकत जातो. आपला वर्तमान सुसह्य करण्यासाठी भविष्यात त्याला अपेक्षा उरते, ती फक्त या सरत्या तेलाच्या भयातून, कुणीतरी प्रेमाची वात लावून त्याची ही नौका तटपार करून मायेची फुंकर घालण्याची आणि विझणाऱ्या सांजवातेला आधार देण्याची...

सांजवात... बघा ना शब्दातच केवढा अर्थ. "सांज', आयुष्यातील कृतार्थतेचे क्षण अनुभवायची, आठवायची वेळ. वातीप्रमाणे या शरीराला, देहाला सावरत. मायेचा आधार शोधण्याची वेळ. प्रत्येक दिवसाला रात्रीचा शाप आहे. सुखाला दुःखाचा, सावलीला उन्हाचा, मंद वाऱ्याला वादळाचा, आनंदाला उदासीनतेचा, बहराला पानझडीचा, तसेच बालपणाला वार्धक्‍याचा, तशी ही सांजवात त्या वार्धक्‍याचे प्रतिनिधीत्व करत नसेल ना.... ऐन बहरात असताना कुठेतरी नतमस्तक होण्याची गरज आहे. हे रोज नित्यनेमाने, आठवणीने आठवण करून देणारी ही सांजवात. मग उजळणी करताना बालपणातील जिंकलेल्या क्षणांचा आधार घेऊन तरुणपणातील उधळलेल्या क्षणांची जाणीव देत, वार्धक्‍याची चाहूल कधी लागते, खरे तर कळतच नाही. आपलेही जीवन या सांजवातीसारखेच तर नाही, असा विचार येऊन थोडे स्वतःकडे बघावसे वाटते. काय साधले, किती हरपले... वेध लागले पैलतीरीचे... अशी काहीशी अवस्था. हातात काही मिळाले नाही, गवसले नाही, हरपले हे सगळे आठवून हळवे करायला लावणारी ही सांजवेळ आणि ही सांजवात.

तरुणपण भोगताना वार्धक्‍याचे हाल बघून माझे भविष्य मला दिसले, अशी भावना सांजवातीकडे बघताना येऊन जाते. पराधीन शैशवासारख्या वार्धक्‍यात, स्पर्श मात्र ममतेचा मिळावा, एवढीच काहीशी प्रार्थना वृद्ध आसवे गाळत करत असावीत का? तशी वेळ येऊ नये म्हणून भूतकाळ, वर्तमान हा सुकर समृद्ध करणे आपल्याच हातात असते. "बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले। वृद्धपणी देवा आता, दिसे पैलतीर।।' ही व्यथा मनातून बाहेर पडणार नाही, याचा विचार करायला हवा. शेवटी तेच होणार, ही पळवाट काढणारा विचारच बेधुंद जगायला भाग पाडतो आणि तेथेच थांबायला शिकवते ती सांजवात. सांजवात संपूर्ण आयुष्याचा एका क्षणात गाभा उलगडत असते, तेव्हा आपली दृष्टी तिथवर पोचणे गरजेचे असते. प्रत्येकाने ज्येष्ठांचा सन्मान करणे, आपल्यालाही याच पाऊलवाटेने जावे लागणार, हे नकळत लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. तरच वृद्धाश्रमांची संख्या कमी होईल. कृतार्थ क्षणांचे आपण साक्षीदार होऊन आयुष्याची उजवण होताना तो कृतार्थतेचा क्षण अनुभवू. हे करताना भावना प्रेमाची, ओलावा देणारी असावी, कर्तव्याची नव्हे. कर्तव्याची भावना अशा अनुभूती देत नाहीत.
विचारांच्या गोंधळात निरांजनातील त्या वातीचे तेवणे हळूहळू मंद होत चालले आहे. नजर त्याकडे गेली. मन मुठीत घेऊन सरत्या तेलाला थोपविण्याचा जीवघेणा प्रयत्न करत ती सांजवात स्वतःचे अस्तित्व टिकवू पाहत होती... तसेच काहीसे वार्धक्‍याच्या पैलतीरावर उभे राहताना होत असेल. त्या तेलाला आधार मागणारी ती सांजवात जणू म्हणते, "दे मला आधार तू।' हीच वेदना वार्धक्‍यात असते. गरज असते ती मायेच्या आधाराची. ज्याची जाणीव प्रत्येकाला हवी. आयुष्य कालचक्र समजून चालणे योग्य ठरेल.

आयुष्याची ही सांजवात वार्धक्‍यातही तेवढ्याच प्रकाशाने प्रकाशमान करणे ही जबाबदारी खरे तर तरुणांची ठरेल. मग वार्धक्‍य ही व्यथा न राहता एक नवीन आशा, सुरवात पुन्हा नव्याने, अशी जाणीव ठरेल. सांजवात जशी पुन्हा नवीन संध्याकाळी तेवण्यास तेवढ्याच उत्साहाने तयार असते, तसे काहीसे आयुष्याचेही तर नसेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com