नातं निभावताना...

नातं निभावतांना
नातं निभावतांना

सामिलकी आणि बांधीलकी कृतिमधुन व्यक्त होतात, पंण व्यक्त होता होता नात्यांमधला अव्यक्ताचा प्रदेश निर्माण करणारी गोष्ट म्हणजे आपुलकी,स्नेह,जिव्हाळा. माणसाला माणूस हवं असतं; याची आतंरिक आणि बाह्य खूण.कोणतंही नातं आधी भावतं. बघितल्याशिवाय चैन पड़त नाही. एकदा भेटावसं वाटतं. एखादा स्पर्श, एखादा शब्द, विसरु म्हणता विसरता येत नाही.माणसाला माणूस लागतं हे लक्षात येतं, ते अशा मूर्त तपशिलातूनच,तात्विक रूपात नव्हे.

पुढं लक्षात येतं की,माणसाच्या सहवासाबद्दलंच असं काहीतरी हवंसं वाटतं.परक्‍या ठिकाणी आपल्यापैकी कुणीही भेटलं की किती बरं वाटतं. त्यामुळेच अनेकवेळा माणसं म्हणतात,कां कुणास ठाऊक पंण या व्यक्तिबद्दल मला फार प्रेम आहे.यात कां हे शब्दात सांगता येत नाही, कारण त्याचं मूळ कदाचित एका निःशब्द प्रदेशात पोचलेलं असतं. याचा अर्थ असा की , माणसाच्या विकासासाठी आवश्‍यक तो दिलासा देणारा भावकोष माणसं एकमेकांसाठी निर्माण करु शकतात. त्यामधे माणूस बहरण्याची शक्‍यता असते.कधी तीच माणसं हा कोष फाडून हळवं ,जिव्हाळ रणरणत्या उन्हातही टाकू शकतात.अशानं माणूस करपतों.आपल्याभोवती काय दिसतं आपल्याला? जिथं हा प्राणवायु खेळता असतो, तिथं माणूस ओढ घेतं. सहवासानं ही ओढ घड़वताना खुप संधी दिलेल्या असतात.एकदा नातं पक्क झालं की सहवासात खंड पडला तरी अडत नाही...!!! जे नातं निभवायचं त्यात एकमेकांना वाढण्यासाठी असा कोष निर्माण केला की नाही,हा प्रश्न फार महत्वाचा आहे.हा कोष अलवार असला तरी त्याच्यात ताकदही तशीच असते.एवढ्या तेवढ्या कारणांनी तो नाहीसा होत नाही,पंण जपावा लागतो...!!! नातं तुटायला नको हे खरं . त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणंही गरजेचं आहे.पंण त्याहीनंतर जर एक किंवा दोघं सतत अतिशय दुःखी असतील तर काय करायला हवे? दोघांनी बदलायला हवे आणि एकमेकांची काळजी घ्यायला हवी. नातं घट्ट करून त्यासाठी त्या व्यक्तीला आणि परमेश्वराला धन्यवाद देवुन आयुष्यात पुढे जावे, यातंच दोघांचं कल्याण आहे...!! नाती आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी असतात.त्या प्रगतीला मदत होईल अशा व्यक्ति आपल्या आयुष्य्यात येतात. कधी कधी नाती जुळतात,पंण जमत नाही.ते नातं निभावण्यासाठी एकमेकांना सांभाळून जगायचा प्रयत्न करावा...!!!

निखळ नात्यातली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता. त्या सहजतेमधूनच सुरक्षितपणाची साय आपोआप धरते. साय दुधातूनच तयार होते आणि दुधावर छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्हे. सायीखालच्या दुधाला सायीचं दडपण वाटत नाही. नातं तसं असावं, दुधापेक्षा स्निग्ध. सायीची नंतरची सगळी स्थित्यंतरे - दही, ताक, लोणी,तूप - ही जास्त जास्त पौष्टिकच असतात. तसं नात्याचं घडावं. नात्याचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कर्षबिंदू ठरावा..

(संजय भक्ते, कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी, नागपूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com