उभारी

उभारी

आयुष्यात कठीण प्रसंगांत उभे राहता आले पाहिजे. संसार सावरण्यासाठी प्रसंगी कठोर व्हावेच लागते.

पावसाची मोठी सर नुकतीच येऊन गेली होती. चहा घ्यावासा वाटत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बघितले तर सुनीता दारात उभी! तिला पाहून मला खूप आनंद झाला. तिचे स्वागत केले. "बस चहा टाकते' असे मी म्हणताच तिने मोठ्या उत्साहाने सांगितले, ""काकू मी केटरिंगचा नवा कोर्स जॉइन केला आहे. मीच तुम्हाला ग्रीन टी करून देते.''

सुनीता अत्यंत उत्साही, जिद्दी आणि सडेतोड आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला ती सामोरे जाते. तिचे हे गुण मला फार आवडतात. माझे पती खरेतर तिच्या पतीचे गुरू-टीचर. याच गुरू-शिष्याच्या नात्यातून जिव्हाळा निर्माण झाला.

सुनीताचे माहेर आणि सासर खेडेगावातच. पतीच्या नोकरीमुळे ती पुण्यात आली आणि दोन छोट्या खोल्यांमध्ये त्यांनी संसार मांडला. तिचे पती येथील एका विद्यालयात शिक्षक आणि मुख्याध्यापक होते. त्यांचा संसार सुरळीत चालला होता. संसारवेलीवर दोन फुले फुलली; पण अचानक या वेलीचा आधारच तुटला. पतीचे अचानक निधन झाले. छत्र हरपले आणि तिघे जण पोरके झाले. ती म्हणते, ""तो दिवस मी कधीच विसरणार नाही. पदरी दोन लहान मुले. यांचे पुढे कसे होणार ही चिंता मनाला लागली होती.''

तिला सावरायला दोन-तीन महिने गेले; पण ती बसून राहिली नाही. ती दहावी पास होती. मी कशीबशी तिची समजूत घातली. तिला मी म्हटले, ""पुढे शिकून तुला आई-बाबांची दुहेरी भूमिका पार पाडायची आहे.'' मलाही काळजी वाटू लागली. ज्या विद्यालयात तिचे पती मुख्याध्यापक होते, तेथे तिला मदतनीस म्हणून नोकरी मिळाली. ती नोकरी तिने आनंदाने स्वीकारली खरी; पण त्या वेळी तिला झालेल्या यातना मला आजही आठवतात.

तेवढ्यावरच ती थांबली नाही. त्यानंतर तिने मुक्त विद्यापीठातून एफवाय बीए केले. गत आयुष्यात तिने बचत गटाचे काम केले होते. तोच बचत गट तिने पुढे सुरू ठेवला. शिवणाचा डिप्लोमा केला. सासर-माहेरची जबाबदारी पेलली. शेतीच्या कामात घरच्यांना मदत केली. त्यातही ती मागे नाही. काही काळ मेसचा व्यवसाय केला. दीड वर्षानंतर पतीचे निवृत्तिवेतन सुरू झाले. तोपर्यंत तिचा काळ खडतर होता. शिवणाची कला तिच्याकडेच होतीच. मदतनिसाची नोकरी तिने सोडली. तिला शिवणाचा व्यवसाय करायचा होता; पण त्यासाठी भांडवल कोठून आणायचे? मी तिला म्हटले, ""भांडवल नाही, तरी तुझ्यात कष्ट करण्याची ताकद व कल्पकता आहे. त्याचा उपयोग करून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार कर. मशिनवर रजया शिव. तिने ते कार्य मनापासून सुरू केले. ती कला जोपासली. बटवे शिवले. तिच्या रजया आजूबाजूस प्रसिद्ध झाल्या. बटवे, बॅगा तयार करण्याचे आता ती क्‍लासेस घेते आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून ती पतीच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी दरवर्षी एका गरीब विद्यार्थ्याला शैक्षणिक साह्य करत असते. त्या वेळी ती अन्नदानही करते.
मला ती म्हणाली, ""माझे एवढे शिक्षण पुरे; मात्र मुलांना मी खूप शिकवणार.'' तिचे म्हणणे तिने खरे केले. मुलगा बीएस्सी (ऍग्री) होऊन पुढील अभ्यास करत आहे आणि मुलगी इंग्रजी विषय घेऊन बीए करत करता जर्मन भाषा शिकत आहे. तिला मुलांच्या शिक्षणाचा अभिमान आहे. त्यांच्यावर चांगले संस्कारही तिने घडविले.

तिला जर मी म्हटले, ""सुनीता, तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.'' त्या वेळी ती म्हणते, ""काकू आयुष्याच्या अवघड वळणावर देव रूपाने भेटून मला जी उभारी दिली, मार्गदर्शन केले, त्यामुळेच मी उभी राहिले. तुमचे आशीर्वाद पाठीशी आहेतच.''
एका क्षणात तिचा हा जीवनपट माझ्या डोळ्यांसमोर तरळला. ""काकू चहा'' या हाकेने मी भानावर आले. "ग्रीन टी'चा कप हातात होता. तिच्या गळ्यातील तुळशीमाळ मला दिसली. त्या वेळी मनात विचार आला, देवा-पांडुरंगा माझ्या सुनीताला जीवन जगण्याचे सामर्थ्य दे आणि तिला सुखी ठेव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com