बचपन का घर

मंगल परांजपे
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

आपण मोठे होतो. पसारा वाढत जातो आपल्याबरोबर; पण एका क्षणी मनात भातुकली मांडली जाते आणि आठवते जुने बालपणीचे घर...

आपण मोठे होतो. पसारा वाढत जातो आपल्याबरोबर; पण एका क्षणी मनात भातुकली मांडली जाते आणि आठवते जुने बालपणीचे घर...

मंडईत लिंबावाल्यापुढे पसरलेली रसरशीत, पिवळीधमक लिंबे पाहताच अचानक माझ्या तोंडून गाणे फुटले- "एक लिंबू झेलू बाई'. बरोबर असलेली नात जरा आश्‍चर्यानेच माझ्याकडे पाहायला लागली. ""अगं, आमच्या लहानपणी भोंडला खेळत असू ना, त्यातले हे गाणे.'' पाठोपाठ भोंडला, मैत्रिणी, आमची गल्ली आणि आमचा वाडा सर्व माझे रेकॉर्ड नेहाला अनेक वेळा ऐकून पाठ झालेले. "एकदा तो वाडा मला दाखवच' हा नेहाचा हट्ट. माझे मामा डॉ. पद्माकर आलेगावकर प्रचंड उत्साही. त्यांचे या वाड्यातले वास्तव्य माझ्यापेक्षा जास्त आणि त्यांचा वाड्याशी संबंधही अजून असल्याने त्यांनाच घेऊन आमच्या स्वाऱ्या वाड्याच्या भेटीला!

जुन्या तपकीर गल्लीतला बुधवारातला हा वाडा. काळानुसार वाड्याच्या आजूबाजूचा परिसर बदललेला; पण मी मात्र कधी भूतकाळात शिरले कळलेच नाही. चौकोनी डब्यावरचे डाळ, तांदूळ वगैरे नावे वाचत वाचत वाचायला शिकलेले हे तर शेटजींचे वाण्याचे दुकान. बडीशोपच्या गोळ्या देणारे हे तर मिस्किल आजोबांचे छोटेसे दुकान. "कॅडबरी नव्हती का?' नेहा जरा मला वर्तमानात आणण्याच्या प्रयत्नात; पण मी तर गॅरेजच्या बाहेरच्या गाड्या मोजत बसलेले. गॅरेजच्या शेजारी सुंदर देव्हारे करणारे आजोबांचे वर्कशॉप. एका खोलीत तेथे सारे काही; पण माझे खरे आकर्षण तिथल्या रेडिओचे. "बालोद्यान' रविवारी ऐकले नाही, तर दिवस सुनासुना जायचा. या सर्व दर्शनी दुकानांमध्ये आमच्या वाड्याचा दिंडी दरवाजा दिमाखात उभा! आत शिरले, तर पुसटशी "526, बुधवार' ही पाटी. कदाचित मला भासही झाला असेल; पण या आकड्यातच बालपण मजेत गेलेले! वाड्यातली सर्व वाट माझ्या पायाखालची. त्यामळे उंबरा, उंचवटा सर्व मी पटपट पुढे पार करत होते. पूर्वी हा सर्व वाडा आलेगावकरांच्याच वास्तव्याचा. अर्थात यथावकाश कामानिमित्ताने सर्व लांब गेले, नवीन बिऱ्हाडे आली. पूर्वी वरती दोन मजले शाळा होती. त्यामुळे शाळेची घंटा, पाढे, कविता सर्व आवाज रोजच्या परिचयाचे. वाड्यात मोठा लाकडी जिना वर शाळेत जायला. त्यामुळे सारखा तो जिन्याचा आवाज घुमायचा.

वाड्यात खाली मोठा चौक, हौद, सारे तसेच. फक्त वाडा थकलेला जरासा म्हणून आधाराचे टेकू लावलेले आणि नंतर दिसले ते माझे घर! त्याच पायऱ्या. एरवी मी सतरंजीवरून उडी मारण्याइतकीच शूर; पण त्या दिवशी कशी या पायऱ्यांवरून उडी मारली आणि मग पडलेली खोक कायमची खूण झाली! मी राहायचे त्या जागेत आता मालकांच्या सुनेने लहान मुलांची शाळा चालू केली आहे. परत "शाळा आणि आलेगावकर' हे नाते चालू पाहून समाधान. शाळेच्या निमित्ताने आतली सजावट जरा बदललेली; पण माझ्या डोळ्यांपुढे माझे लहानपणच अजून तेथे जिवंत झाल्यासारखे वाटत होते. वाड्यातच मैत्रिणी खूप. त्यामुळे खेळायला, भांडायला कोठे लांब जाणे नाही. भोंडल्याच्या वेळी तर गल्लीत प्रत्येक घरी जायचे, ओरडून गाणी म्हणायची, खिरापती ओळखायच्या आणि खायच्या. त्या वेळी टिश्‍यू पेपर नव्हते, पथ्य नव्हते, आवडीनिवडी तर नव्हत्याच. फक्त होते ते प्रत्येक क्षण आनंदात घालवणे.
एकदम माझे लक्ष आमच्या वाड्याच्या खासियत असलेल्या खिडकीकडे गेले. वाड्यातील सर्व खोल्यांना अशा मोठ्या खिडक्‍या आहेत. ताई याच खिडकीत पोथी वाचत बसायची आणि जरा ती बाहेर गेली, की मी येथेच तिची वाट बघत बसायचे. येथेच वेणीवाला मला रोज फुलांची वेणी द्यायचा आणि बर्फाचा गोळा; पण रंगीत रंगीत पाणी घालून येथेच बसून खायचा. वाड्याच्या समोर कार्यालय असल्याने लग्न असले, की रोज वरातीचा आनंद, बत्त्या, बॅंडवाले यायचे. मोटार सजवलेली, छत्रीखाली नवरा-नवरीपेक्षा लहान मुलांचीच गर्दी. ""गंगा यमुना डोळ्यांत' किंवा "लिंब लोण उतरता' अशी ठराविक गाणी. त्या वेळी काय मजा वाटायची हे त्या वयालाच माहिती. त्या माझ्या आवडत्या खिडकीत अगदी समाधानाने मी टेकले आणि नेहाने लगेच फोटो काढत मला परत जागे केले.

गल्लीत आता सर्व लाइटची दुकाने. जुन्या खुणा थोड्याच शिल्लक. तरी पण तेवढ्यात दिसली माझा शाळा. "दगडी वाडा'. या सर्व गर्दीत तो मात्र दीपस्तंभाप्रमाणे तसाच उभा. अ, आ, ई जेथे मी शिकले, ती माझी शाळा. गल्ली संपत आली. मोठ्या तराजूची वखार, छोटेसे मारुतीचे देऊळ, सारे आठवतच होते. मामा खूपच जुन्या आठवणी ऐकवतो आहे आणि मनात गुलजारांच्या ओळी -
"एक एक पल की पूरी डिटेल याद है
शायद उस वक्त तस्वीरें दिल में बनती थी
कैमरोमें नहीं!
मुश्‍किल है, बहुत आसान नहीं
वह घर भुलाना बचपन का!'