आनंदरंग उधळण

मीना जोशी
शुक्रवार, 19 मे 2017

सृष्टीत रंग उमलू लागले की होळी खेळावी. भारतात फाल्गुनात होळी असते, म्हणून त्याचवेळी अमेरिकेतल्या थंडीत होळी खेळण्याची आवश्‍यकता नसते. तेथील होळी अक्षय तृतीयेनंतर रंगत असेल, तर आपण त्या वेळी आनंदरंगांची उधळण करावी.

आपण होळी दरवर्षी साजरी करतो. पहिल्या दिवशी होळी पेटवून आणि दुसऱ्या दिवशी धुळवडीला किंवा रंगपंचमीला रंग खेळून.

सृष्टीत रंग उमलू लागले की होळी खेळावी. भारतात फाल्गुनात होळी असते, म्हणून त्याचवेळी अमेरिकेतल्या थंडीत होळी खेळण्याची आवश्‍यकता नसते. तेथील होळी अक्षय तृतीयेनंतर रंगत असेल, तर आपण त्या वेळी आनंदरंगांची उधळण करावी.

आपण होळी दरवर्षी साजरी करतो. पहिल्या दिवशी होळी पेटवून आणि दुसऱ्या दिवशी धुळवडीला किंवा रंगपंचमीला रंग खेळून.

पण या वर्षी आम्ही एक अनोळखी होळी साजरी केली, तीही चक्क न्यूजर्सी, अमेरिकेत. मोठ्या संख्येने भारतीय लोक अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. त्यांचे भारतात असणारे पालक, तिथला हिवाळा संपला की मुलांकडे जातात. दोन्हीकडे भेटीची ओढ असते आणि त्यांत "समर' पालकांसोबत "एन्जॉय' करायचा असतो. हिवाळ्यात बाहेर फिरायला मिळत नाही. या वर्षी आम्ही एप्रिलमध्ये मुलीकडे गेलो. "चेरी ब्लॉसम'चा आनंद घेतला. एकही पान नसलेली आणि फुलांनी डवरून आलेली झाडे पाहून डोळ्यांचे पारणे फिटले, फुलांचे ढग आसपास विहरत आहेत, असे वाटत होते.

इकडची होळी भारतीय फाल्गुनला असेलच असे नाही. किंबहुना नाहीच. होळीचा कार्यक्रम बघायला जायचे ठरले, म्हणजे चक्क "अक्षय तृतीये'च्या दुसऱ्या दिवशी. इकडे होळीच्या वेळी खूप थंडी असते, त्यामुळे थंडी संपल्यावर जो वीकेंड येईल, त्या वेळी ती साजरी करण्यांत येते. एकंदरीत सण, उत्सव साजरे करणारे भारतीय, कुठेही गेले तरी उत्साह तोच!

होळीचा कार्यक्रम "एक्‍स्चेंज प्लेस' येथे हडसन नदीच्या काठी होता. पलीकडे न्यूयॉर्क शहराचा देखावा अतिशय सुंदर दिसतो. विस्तीर्ण, स्वच्छ आणि सुंदर नदीपात्र, वर मोकळे आकाश आणि त्या पार्श्वभूमीवर लांब अंतरावरील न्यूयॉर्क सिटीतील आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या उंचच उंच इमारती. नदीकाठी प्रवाशांना फिरण्यासाठी रुंद लाकडी डेक, तर काही ठिकाणी छत्र्या लावून खाण्यापिण्याच्या सोयीसाठी ठेवलेले टेबल, खुर्च्या. मुळात अतिशय सुंदर असलेल्या या जागेवर भव्य मंच उभारला होता. "होली है'चा बॅनर दिमाखात झळकत होता. भारतीय लोकांबरोबरच इथले स्थानिक लोकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांत गोरे, काळे, सावळे, पिवळे सगळे प्रकार होते.

दुपारी ठरलेल्या वेळी कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रथम वाद्यवादन झाले. नंतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यांत ओडिसी, भरतनाट्यम, कथ्थक, बॉलिवूड डान्स असे सगळे प्रकार होते. सगळ्यांनी नृत्याला अनुसरून पारंपरिक पोशाख केले होते. मुलांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. दुसरीकडे मंडळी रंग खेळण्यांत दंग होती. रंग कोरडे होते. आणि रंग डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या अशी सूचना दिली जात होती. धर्म, जात, पंथ, देश, वंश सगळ्यांच्या पलीकडे जाऊन लोक आनंद लुटत होते, हे दृश्‍य फार विलोभनीय व सुखावणारे होते. खाद्यपदार्थांचे भरपूर स्टॉल्स होते. विदेशी पदार्थांबरोबर भेळ, वडापाव, दहीवडा असे खास चटकदार भारतीय पदार्थही होते. चहा, कॉफी, बरोबरीने मॅंगो लस्सीपण होती. अशा प्रकारे एकीकडे पोटपूजाही सुरू होती.

मेयर पण कार्यक्रमाला थोडा वेळ हजेरी लावून गेले. त्यांनाही रंगाचा टिळा लावून शोभायमान करण्यात आले. व्यासपीठ आणि ध्वनिक्षेपक यांचा फायदा घेऊन कांही स्वयंसेवी संस्थांचे लोकही त्यांची माहिती देऊन गेले. हा सगळा कार्यक्रम रहदारीला कुठलाही अडथळा न आणता आणि कोणालाही आवाजाचा त्रास होणार नाही अशा प्रकारे साजरा झाला. ज्यांनी युरोप आणि अमेरिकेतील रस्ते आणि चौक बघितले आहेत त्यांना हा प्रश्न पडणार नाही.

रंगीबेरंगी विविध नृत्ये, गाणी, रंग खेळणे आणि खाणेपिणे या सगळ्यांचा मनसोक्त आनंद लोक घेत होते. दुपारी चारनंतर छोटू मंडळी थकली आणि पेंगुळली. आता डीजे सुरू झाला होता. तरुणांच्या उत्साहाला उधाण आले होते. नाच, गाण्यांना ऊत आला होता. हा कार्यक्रम रात्री आठ वाजेपर्यंत चालणार होता, पण आता आम्ही तेथून निघालो, बाहेर दोन पोलिस कर्तव्य म्हणून उभे होते. इतक्‍या निरुपद्रवी कार्यक्रमात आमचे काय काम, असे त्यांना वाटत असणार.
आनंदाची उधळण करायला वय, देश, वंश, धर्म काहीही आड येत नाही हेच खरे !

Web Title: meena joshi write article in muktapeeth