उत्तरपूजा

मीनाक्षी मुळे - केंढे
मंगळवार, 28 मार्च 2017

आनंददायी घटनेनंतर सत्यनारायणाची पूजा बांधण्याची प्रथा आहे. त्याच्या उत्तरपूजेतून एखादं घर उभं राहू शकतं. त्या उत्तरपूजेच्या आधाराने त्या घरातील मुलं शिकू शकतात. असे काही पाहिले की उत्तरपूजा सार्थकी लागल्यासारखे आपल्यालाही वाटते.

आनंददायी घटनेनंतर सत्यनारायणाची पूजा बांधण्याची प्रथा आहे. त्याच्या उत्तरपूजेतून एखादं घर उभं राहू शकतं. त्या उत्तरपूजेच्या आधाराने त्या घरातील मुलं शिकू शकतात. असे काही पाहिले की उत्तरपूजा सार्थकी लागल्यासारखे आपल्यालाही वाटते.

मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने केलेल्या सत्यनारायण पूजेची "उत्तरपूजा' गुरुजींकडे देण्यासाठी मी बांधत होते. माझं मन नकळत भूतकाळात गेलं. माझे सासरे भिक्षुकी करीत होते. यजमानांकडून आलेल्या सत्यनारायणाच्या उत्तरपूजेचं माझ्या सासूबाई कसं आणि काय करायच्या, हे मी ऐकलंय-पाहिलंय. त्या उत्तरपूजेमधून या मुलांवर नकळत कसे संस्कार झाले आणि आयुष्य कसं घडत गेलं हेही मी ऐकलंय.

दादा यजमानांकडून सर्व साहित्य घेऊन यायचे. हळदकुंकू वाहून लाल झालेले गहू, तांदूळ तसेच सुपारी, बदाम, खारीक, हळकुंड, विड्याची पाने, सुट्टे पैसे, खोबरं आणि नारळ इत्यादी. मग सासूबाईचं काम सुरू व्हायचं. त्या हे सर्व साहित्य मुलांना वेगळे करायला सांगायच्या. सर्वात प्रथम उत्तरपूजेतील दक्षिणा वेगळी करून मोजायची. हे करताना पैशाला हात लावायचा नाही. म्हणजे पैसे उचलून घ्यायचे नाहीत, असे संस्कार त्यांच्यावर आपोआपच झाले. दहा-वीस पैशांनाही त्या काळात खूपच किंमत होती. हे पैसे वेगवेगळे काढून मोजल्याने मुलांना हिशेब समजायला लागला. लाल झालेले गहू-तांदूळ वेगळे करायचे. हळदी-कुंकवाने माखलेले तांदूळ स्वच्छ धुऊन, वाळवून त्यांपासून घरामध्ये इडली-ढोकळे यांची मेजवानी व्हायची आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांपासून आल्या-गेल्यापर्यंत सर्वांना ती वाटली जायली. विड्याची पाने, सुपारी स्वच्छ धुऊन आमच्या वाड्याच्या घरमालकांना दिली जायची. उत्तरपूजेतील फळे, खारीक, बदाम वाड्यातील मुलांना आणि मित्रांना दिले जायचे.

दहा बाय दहाच्या खोलीत आणि वाडा संस्कृतीत ही चार भावंडं वाढली. दादांकडे "गुरुजी' म्हणून कुणी पंचांग बघायला यायचे किंवा सत्यनारायणाच्या सामानाची यादी मागायला यायचे. तेव्हा ही मुलं दादांच्या सांगण्यावरून अभ्यास करता करता ती यादी करून द्यायचे किंवा पंचांगातल्या तिथी, वार, नक्षत्राचं नातं पत्रिकेतल्या ग्रहांशी किती गुण जुळतं ते सांगायचे. दादांचा स्वतःचा याविषयी खूप अभ्यास होता. तो ऐकून, पाहून ही मुलं तयार झाली होती. आपल्या भिक्षुकीच्या व्यवसायातून आणि उत्तरपूजेतून संसारासाठी, लोकांसाठी जे काही करता येईल, ते आमचे आई-दादा करायचे. असे करता करता ते माणसे जमवत गेले. मुलांचं आयुष्य घडवत गेले. संस्कारांनी तर मुलं समृद्ध झालीच, पण त्याचबरोबर शिक्षणानेही समृद्ध झाली. वाड्यातील नळावरच्या पाण्याची धार बारीक असायची. बादली भरायला बराच वेळ लागत असे. अशावेळी माझे पती हातात पुस्तक धरून वाचत बसायचे. वेळ वाया घालवायचा नाही हेच तर परिस्थितीनं शिकवलं.

आमच्या दादांना नंतर अर्धांगवायू झाला; पण दादांनी शिकवलेलं कामाला आलं. मुलं काही ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेला जात. घरी उत्तरपूजा आणि प्रसाद येत असे. त्यावर गुजराण व्हायची; पण दिवस कुणासाठी थांबून राहात नाहीत. स्वप्नांचे पक्षी अलगद अंगणात उतरतात. माझे पती घरात सर्वांत मोठे. त्यांनी सी.ए. करायचं ठरवलंच होतं. बीएमसीसीतले त्यांचे मित्र संतोष पटवर्धन आणि त्यांचा भाऊ डॉ. संजीव यांच्याबरोबर अभ्यास करीत असत. घराशेजारी भांड्यांचा कारखाना होता. त्या भांड्यांचा सततचा ठकठक आवाज त्यांच्या अभ्यासाला बेताल बनवू शकला नाही. मनात जिद्द असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर परिस्थिती आड येत नाही, याचंच हे उत्तम उदाहरण आहे.

एक दीर नोकरीत वरिष्ठ पदावर आहेत. त्यानंतरच्या दिरांची वाईला फूड प्रॉडक्‍टची फॅक्‍टरी आहे आणि चार नंबरच्या दिराची पुण्यात किचन ट्रॉलीची फॅक्‍टरी आहे. आज माझ्या सासूबाई 83 वर्षांच्या आहेत. दादा आज हयात नाहीत. सर्व मुलं, सुना, नातवंडं आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून आहेत. तरीही निगर्वी, निर्व्यसनी आणि पूर्णपणे शाकाहारी असं, हे आमचं कुटुंब आहे. उत्तरपूजेने उभं केलेलं हे घर आहे. आजही ही माणसं त्या दिवसांची आठवण ठेवून नव्या दिवसाला सामोरी जातात.
हे सगळं पाहिल्यावर मला वाटतं, आकाशात रोज उगवणारा सूर्य आपल्याला हेच तर सांगत असतो, ""भर दुपारचं ऊन अंगावर घेऊन प्रकाशात वाटचाल करून तर बघा. सायंकाळच्या सावल्या तुमच्यासाठीच तर आहेत.''

खरोखरच आई - दादांनी उत्तरपूजेतून साकारलेलं सर्वांचं आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थानं "उत्तरपूजा सार्थकी' लागल्याचे समाधान आहे.