कोकणातला पाऊस 

कोकणातला पाऊस 

मी  पुण्यातील एका कंपनीमध्ये नोकरी करीत होतो. गोव्यामधील फार्मा कंपनीच्या यंत्रतपासणीसाठी  खूपदा जावे लागत असे. त्या दिवशी मी गोव्यामधील काम संपवून कोल्हापूरकडे येण्यासाठी निघालो. जुलै महिन्यातला मॉन्सूनचा पाऊस धो-धो कोसळत होता. अशा पावसात फोंडा गावामध्ये रात्री साडेदहा वाजता पोचलो. फोंडा घाट सुरू आहे का, याची चौकशी करण्यास ड्रायव्हरला सांगितले. परंतु धो-धो कोसळणाऱ्या पावसामध्ये रस्त्यावर एकही मनुष्य दिसला नाही. आमची कार फोंडा घाटाच्या दिशेने पुढे निघाली. गाव निघून गेले. घाट सुरू झाला. पण पुढून एकही गाडी फोंड्याकडे येताना दिसेना. घाट बंद आहे का? नागमोडी तीव्र वळणे घेत गाडी घाटातून जात असताना गडद धुक्‍याने ड्रायव्हरला गाडीमधून काही दिसेना.

दोघांनी गाडीच्या काचा खाली केल्या. खिडकीतून बाहेर डोकावत डावीकडे वळ, आता उजवीकडे, अशाप्रकारे मी ड्रायव्हरला सांगत होतो. तेवढ्यात माकडांच्या टोळीने आमचा रस्ता अडवला. आम्ही लगेच गाडीच्या काचा वर केल्या. ड्रायव्हरने गाडीचा वेग थोडा वाढवून माकडांना हटकले. माकडे गाडीवरून उड्या मारून पसार झाली. रात्री दीड वाजता फोंडा घाट पार केला. राधानगरी धरण जवळ येऊ लागले. धरणातून कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकत राधानगरीकडून कोल्हापूरकडे चाललो. 

 राधानगरी गाव सोडले आणि त्या अंधाऱ्या रस्त्यावर टक्कल केलेले सात- आठ जण रस्त्यात उभे असलेले दिसले. शेजारी त्यांची गाडी. तेवढ्यात ड्रायव्हरने विचारले, ‘‘आता काय करायचे?’’ रात्रीचे अडीच वाजले होते. मी गाडीचा वेग कमी करण्यास सांगितले. ते लोक गाडी थांबविण्याचा इशारा देत होते. परंतु जसा गाडीचा वेग कमी केला, तेव्हा ते सर्व जण बाजूला झाले आणि मोठ्या शिताफीने माझ्या ड्रायव्हरने गाडी सुसाट पळविण्यास सुरवात केली. मी कारमधून मागे पाहिले, तर सर्व जण त्यांच्या गाडीत बसले आणि त्यांनी आमचा पाठलाग सुरू केला. रस्त्यावर मदतीसाठी एकही गाडी नाही. चित्रपटात पाहतो तसा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत होतो. असा आमचा चित्तथरारक पाठलाग किमान अर्धा तास सुरू होता. इतक्‍यात मला पुढे रस्त्यावर चमकत असलेले पाणी दिसले. मी लगेचच ड्रायव्हरला गाडी थांबविण्याचा सल्ला दिला. आमची अवस्था आता इकडे आड व तिकडे विहीर अशी झाली होती. ड्रायव्हर मला म्हणाला, ‘‘आता मार खायचा का?’’ मी त्याला म्हणालो, ‘‘मार खायचा, पण पाण्यात गाडी घालायची नाही.’’ आमची गाडी थांबली व पाठलाग करणारेही तिथे येऊन पोचले. आम्ही गाडीतून घाबरत- घाबरत उतरलो. ते लोकही उतरले. आम्हाला म्हणाले, ‘‘भोगावती नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कोल्हापूर- फोंडा रस्ता बंद झाला आहे. तुम्ही पाण्यात गाडी घालाल म्हणून आम्ही तुमचा पाठलाग करीत होतो. आम्हालासुद्धा कोल्हापूरला जायचे आहे.’’

तेवढ्यात एक आजोबा जवळच्याच घरातून बाहेर आले होते. त्यांना मी कोल्हापूरला जायचा दुसरा रस्ता विचारला. त्यांनी समोरील डोंगरातील जंगलामधून कच्चा रस्ता आहे, असे सांगितले. ‘‘पण तुम्हाला रात्री वळणे सांगणार कोण? अवघड रस्ता आहे,’’ असेही सांगितले. त्या कुट्ट काळोखात किर्र रानातून कच्च्या अनोळखी रस्त्याने जायचे का, यावर विचारात पडलो. पण त्या पाठलाग करणाऱ्यांनी तो रस्ता नीट विचारून घेतला आणि त्या जंगलाकडे निघालेही. त्यांच्या आधाराने आम्हीही जाऊ असे वाटून आम्हीही त्यांच्यामागे निघालो. ते त्या रस्त्यावरून सुसाट निघून दिसेनासे झाले. पण कच्चा रस्ता असल्याकारणाने आमची गाडी कमी वेगाने चालली होती. बरेच आत गेल्यावर आम्ही जंगलात रस्ता चुकलो. मागे एक गाव लागले होते, त्या गावात परत गेलो. जरा दिसू लागताच पहाटे पुन्हा निघालो. जंगलात एक माणूस आम्हाला भेटला. त्याने आम्हाला कोल्हापूरला जायचा रस्ता दाखवला. त्याच्या घरी मुलगी बाळंतपणासाठी आली होती. तिला तातडीने कोल्हापूरला रुग्णालयात न्यायचे होते. मुसळधार पावसामुळे सर्व रस्ते बंद असल्यामुळे तिला कोल्हापूरला नेणे अवघड झाले होते. त्यांची सर्व परिस्थिती ऐकून त्यांच्या मुलीसहित कुटुंबाला गाडीत घेतले. थेट कोल्हापूरमध्ये रुग्णालयापाशी त्यांना सोडले.

संकटे एकामागून एक येत राहिली. ती रात्र कशी गेली हे समजले नाही. संकटातसुद्धा देव तुमची परीक्षा घेतो याचा प्रत्यक्ष अनुभव आला. फक्त आम्हाला एक चांगले पुण्याचे काम करण्याचा योग आला याचाच आनंद झाला. एका संकटात अडकलेल्या कुटुंबाला मदत करून एका बाळाच्या जन्मासाठी देवाने आम्हाला पाठविले होते जणू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com