‘निर्मल’ सेवाभाव

महेश सोवनी
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

निर्मलाताईंचे जगणेच दुसऱ्यांसाठी होते. ‘निवारा वृद्धाश्रमा’त सेवाभावाने कार्य करताना त्यांनी या वृद्धाश्रमाचे रूप पालटले. त्यांच्या नावातील ‘निर्मल’ता त्यांच्या कार्यातही दिसून येत असे. 

‘निवारा वृद्धाश्रमा’च्या वहिनींना, निर्मलाताई सोवनी यांना जाऊन वर्ष उलटले. एखाद्याला त्याच्या इच्छेप्रमाणे मृत्यू यावा, यासारखी दुसरी कोणतीही घटना असू शकत नाही. आपल्याला काम करता करता मृत्यू यावा, असे आईला वाटायचे आणि खरेच जाण्याआधी दोन दिवसांपर्यंत ती ‘निवारा’मध्ये जात होती. अखेरपर्यंत ती तिच्या सेवाकार्यात रमली. 

मला कळायला लागल्यापासून मी आईची लगबग, तिचे घरातील सर्वांचे करणे, तिची बाहेरची सेवाकामे बघत आलो. ती रोज सकाळी घरचे स्वयंपाकपाणी आटोपायची. तेव्हा आमचे एकत्र कुटुंब असल्याने अंदाजे पंधरा- वीस माणसांचा स्वयंपाक असे. आजारी आजेसासूची सर्व सेवा तीच करायची. तिची अशी ही सकाळच्या वेळची कामे करून आई बाहेर पडत असे. सूतिका सेवा मंदिरात कुटुंब नियोजनाचे काम करायची. त्यासाठी तिने कुटुंब नियोजनासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांशी संबंधित एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. ते काम करताना तेथील अनेक स्त्रियांचे संसार सावरायला मदत करत असे. दुपारी परत यायची. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ती स्काऊटसाठी जात असे. सामाजिक कार्याची आवड असलेल्या आईने पदवीनंतर ‘कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या डिप्लोमा इन सोशल वर्कच्या पहिल्या तुकडीत प्रवेश घेतला व आपल्या सामाजिक कार्याचा पाया रोवला. डॉ. शरच्चंद्र गोखले, भास्करराव कर्वे आणि तारा शास्त्री यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन तिला मिळाले. सूतिका सेवा मंदिराचे तेवीस वर्षे काम पाहिल्यावर तिने साधारणपणे १९७७ मध्ये ते थांबवले. डॉ. मो. ना. तथा आबासाहेव नातू यांच्या सूचनेवरून ती ‘निवारा’त काम करू लागली. याच दरम्यान आम्ही प्रभात रस्त्यावर राहायला आलो. आता आईने ‘निवारा’ आणि ‘स्काऊट’च्या कामात स्वतःला झोकून दिले. स्काऊटचे ‘स्टेट कमिशनर’ पद अनेक वर्षे भूषविले. ‘निवारा’चा आमूलाग्र कायापालट केला. या सर्वांचे श्रेय आईने स्वतःकडे कधीही घेतले नाही. सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने हे साधल्याचे ती मनापासून सांगत असे.

सन १८६३ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, सरदार किबे, सरदार रास्ते यांच्यासारख्या मान्यवरांनी केली. त्या वेळी इंग्रजांनी या संस्थेच्या स्थापनेबद्दल कौतुक केले होते. दानशूर व्यापारी डेव्हिड ससून यांनी संस्थेला त्याकाळात पन्नास हजारांची देणगी दिली होती. त्यामुळेच ‘डेव्हिड ससून अनाथ पंगूगृह’ या नावाने संस्थेची ओळख निर्माण झाली. आईने संस्थेत प्रवेश केला, त्या वेळी केवळ ५५ निराधार तेथे होते. तेथील बकाल आणि उदास, बेशिस्तीचे वातावरण पाहून कोणीही तेथून पळून गेले असते; परंतु तेथील वातावरणाची पर्वा न करता केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आई काम करू लागली. त्यावेळचे विश्‍वस्त वि. ग. ऊर्फ राजाभाऊ माटे आणि आबासाहेब नातू यांच्या मार्गदर्शनाखाली ती कामांची नव्याने बांधणी करू लागली. कोणत्याही सामाजिक कार्यात येणारा पहिला अडथळा म्हणजे आर्थिक आधार! १९८३ मध्ये एक दिवस तर अन्नाच्या कोठीत धान्याचा दाणा नाही, अशी गंभीर परिस्थिती संस्थेत निर्माण झाली होती. स्वातंत्र्यसैनिक बाळूकाका कानिटकर यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली पाच हजारांची देणगीदेखील संस्थेला भक्कम आधार देणारी ठरली. त्यानंतर आईने केलेल्या पूर्वनियोजनाने, त्यांच्यावरील विश्‍वासामुळे सतत मिळणाऱ्या देणग्यांमुळे अन्नधान्याची कोठी रिकामी राहण्याची वेळ संस्थेवर आली नाही. 

हे सर्व करताना आईने घराकडे दुर्लक्ष केले नाही. सून, मुलगी, नातवंडे आणि पतवंडे सर्वांचीच आई- पणजी आजी फार लाडकी होती. सर्वांच्या आवडी- निवडी जपणे, निरनिराळे पदार्थ करणे, हे तर ती मनापासून करीत असे. सर्व नातेवाइकांमधे आईला फार मान होता. प्रत्येकासाठी धावून धावून करणे हा तिचा स्वभाव होता. आईच्या कामाचा आवाका समजून घेण्याचा आम्ही आजही प्रयत्न करतो आहोत. प्रकृतीचे नैसर्गिक वरदान होते तिला. गणपतीच्या दिवसांत आईच्या हातचे उकडीचे मोदक मिळाले नाहीत, असे कधीच झाले नव्हते गेल्या वर्षापर्यंत. एवढे सामाजिक कार्य करून स्वतः निर्मळ राहणारी आई एकदम विरळाच. उत्तम साड्या, दागिने आणि गजरा घातलेली आईची मूर्ती आजही डोळ्यांपुढून हलत नाही. कोणती जादूची कांडी देवाने आईला दिली होती हे फक्त त्या देवालाच माहीत. तिच्या प्रचंड कार्याला आणि तिच्या प्रसन्न, कणखर व्यक्तिमत्त्वाला कधीच विसरू शकणार नाही.