स्काउट भिनलेले

नरेंद्र धायगुडे
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

एकदा का स्काउटचा स्पर्श झाला, की ते भिनतेच. आयुष्यभर त्याचा उपयोग होतो. आपल्या छोट्या छोट्या गोष्टींतून स्काउट दिसते. समाजहिताची कृती एक सहजकृती होते.

सहा वर्षांपूर्वीचा प्रसंग. कामानिमित्त मी झेलम एक्‍स्प्रेसने भोपाळला जात होतो. माझ्या कंपार्टमेंटमध्ये सहप्रवासी एक डॉक्‍टर होते. रात्री दहाच्या सुमारास गाडी कोपरगावच्या आसपास होती. एवढ्यात तिकीट तपासनीस डॉक्‍टरांकडे आला व म्हणाला, की ‘‘शेवटच्या आर्मी कोचमध्ये एका लष्करी अधिकाऱ्यास उलट्या होत आहेत. काही औषध असेल तर द्या.’’

डॉक्‍टरांनी एका चिठ्ठीवर औषध लिहून दिले. पुढच्या स्टेशनवर औषध काही मिळाले नाही. लष्करी अधिकाऱ्याचा त्रास वाढला व तपासनीस पुन्हा डॉक्‍टरांकडे आला; पण डॉक्‍टरांकडे आवश्‍यक ते औषध नव्हते. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मी ऐकत होतोच. मी तपासनीसाच्या मागे गेलो व त्याला सांगितले, की ‘‘मी रजिस्टर्ड डॉक्‍टर नाही; पण माझा होमिओपॅथीचा अभ्यास आहे व माझ्याकडे काही औषधेही आहेत. त्या रुग्णाला मी औषध दिले तर चालेल का?’’ अर्थातच तपासनीसाने संमती दिली. मी माझ्याजवळील प्रथमोपचाराची, आकाराने छोटी; पण सर्वसमावेशक अशी पेटी घेऊन त्या लष्करी अधिकाऱ्याकडे गेलो. त्यांची चौकशी केली. काय, कशामुळे व केव्हापासून त्रास होतोय ते विचारले व तत्काळ त्यानुसार औषध दिले. दर दहा मिनिटांनी एक असे तीन डोस घेण्यास सांगितले. अर्ध्या-पाऊण तासाने (रात्री बाराच्या सुमारास) मी पुन्हा त्यांची चौकशी करण्यास गेलो. तेव्हा त्यांचा त्रास थांबला होता. तरी मी त्यांना पुढील प्रवासासाठी औषधे व सूचना दिल्या. त्यांनी माझे आभार मानले व लगेच विचारले, ‘‘आप स्काउट है क्‍या?’’

मला कळलेच नाही, की त्यांनी एकदम असे कसे विचारले. तेव्हा तेच म्हणाले, ‘‘यू आर वेल प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग.’’ माझ्याकडील ती सर्वसमावेशक पेटी त्यांनी पाहिली होती. म्हटले तर हा प्रसंग तसा साधा. छोटा; पण स्काउटच्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणारा. खरेच आहे! ‘बी प्रिपेअर्ड - तयार राहा’ हे स्काउटचे घोषवाक्‍य आहे. कोणत्याही प्रसंगी व कोणासही मैत्रीभावाने मदत करण्यास तयार असणे हे स्काउटवरील संस्कार असतात. त्यावरूनच स्काउट निश्‍चितपणे कोठेही ओळखला जातो.

हे संस्कार घडविणारी पुण्यातील संस्था ‘श्री शिवाजी कुल’ पुढील वर्षी शताब्दी पूर्ण करत आहे. या स्काउट पथकात मी १९६९ मध्ये चौथीत असताना दाखल झालो. येथे रोज सायंकाळी विविध खेळ खेळले जातात व स्काउट अभ्यासक्रमावर आधारित प्रशिक्षण असते. आरोग्य व खिलाडूवृत्ती हा पहिला संस्कार. तसेच विविध कामांमधील कौशल्य येथे शिकता येते, त्याची प्रावीण्य पदके मिळवता येतात. प्रथमोपचार, स्वयंपाक, बुडत्यास वाचवणे, खगोल अभ्यास वगैरे शंभरहून अधिक विषयांतील अभ्यासक्रम आहेत. सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांतून भाग घेता येतो. प्रत्येक कामाचे नियोजन व कार्यवाही ही मुलेच लोकशाही पद्धतीने करतात. सत्शील सामाजिक जाणिवा हा दुसरा संस्कार. स्काउट अभ्यासातील महत्त्वाचा भाग म्हणजे ‘खरी कमाई.’ आपल्या आसपासच्या कोणत्याही कुटुंबात जाऊन, ते सांगतील ते काम करणे व त्याचा योग्य तोच मोबदला घेणे आवश्‍यक असते. काही वेळा आम्हास कामाचे जास्त पैसे देऊ केले जात; पण आम्ही ते नाकारत असू. कधीही फुकटचे घेऊ नये, कष्ट करूनच पैसे मिळवावेत, हा तिसरा संस्कार. वर्षभरात विविध ठिकाणी वननिवास, दुर्गभ्रमण, रात्रीनिवास असे उपक्रम असतात. यातून साहस, सहनशक्ती, निसर्ग-पर्यावरण यांचे रक्षण करणे हे रक्तात भिनते. गोळी खाऊन कागद कधीही बाहेर फेकला गेला नाही. तो खिशात किंवा पिशवीतच जात असे.

महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो व स्काउट मैदानावर जाणे थांबले. कंपनीमध्ये शिस्त, कालबद्धता, संवाद कौशल्य, नेतृत्व, संघवृत्ती आदी गुणांसाठी खास प्रशिक्षण घ्यावे लागते. मला यातील कोणतीच गोष्ट अपरिचित नव्हती. सन २००० पासून मी विद्युत यांत्रिकी क्षेत्रात व्यवसाय सुरू केला. तो बहुआयामी होण्यास स्काउट शिक्षण कामी आले. चांगला नागरिक म्हणून यशस्वी होण्यासाठीच्या संस्कारांची मोठी पुंजी मला मिळाली. साने गुरुजी या पथकात असताना मुलांना शिकवत असत. अनेक सनदी अधिकारी, उत्कृष्ट खेळाडू, उद्योजक, कलाकार, लष्करी अधिकारी याच संस्कारांच्या शिदोरीवर उच्चपदावर पोचले आहेत. 

मुलांसाठीची ही स्काउट चळवळ ही जगात २१६ देशांत चालते. ती भारतात १९१३ मध्ये सुरू झाली. पुण्यात ‘श्री शिवाजी कुल’ हे पथक डॉ. आबासाहेब नातू व डी. पी. जोशी यांनी १९१९ मध्ये सुरू केले. तेव्हापासून आजतागायत अनेक उपक्रम उत्साहाने चालू आहेत. कालानुसार त्यात बदलही झाले आहेत. केवळ मुलांनी, मुलांसाठी, मुलांची संस्था शंभर वर्षे स्वयंसेवा भावाने चालवावी, असे उदाहरणच विरळच.

Web Title: mukatpeeth narendra dhaygudhe