शिकवला चांगलाच धडा!

शिकवला चांगलाच धडा!

मी एलआयसीत कोकणातील एका शाखेत काम करीत होतो. कार्यालयांत अजून संगणीकरण व्हायचं होतं. विमा हप्ते भरण्याची वेळ दुपारी साडेतीनपर्यंत होती. जुनी शाखा कचेरी असल्याने विमाधारकांची संख्याही मोठी होती. सकाळी दहाच्या आधीपासूनच हप्ता भरण्यासाठी रांगा लागत असत. हप्ता भरण्याची वेळ संपायला पाचएक मिनिटे राहिली असतील, अशावेळी गावांतील एक प्रतिष्ठित किराणा दुकानदार विम्याचा हप्ता भरायला आले. त्यांच्या मागे अजून तीन-चार ग्राहक होते. त्यांचा नंबर येताच कॅशिअरने पावती फाडली आणि विमाहप्ता ८३८ रुपयांची मागणी केली. एक पॉलिथिनची पिशवी कॅशिअरकडे सरकवत ते शांतपणे म्हणाले, ‘‘यात एक एक रुपयांची ८३८ नाणी आहेत, मोजून घ्या.’’ अखेरच्या दोन-तीन मिनिटांत एवढी नाणी मोजणे, त्यानंतर त्यांच्या मागे असलेल्या दोन-तीन ग्राहकांचे विमाहप्ते स्वीकारणे, दिवसभरातील कॅशबुक लिहून जमा रक्कम त्याबरोबर ताडून कॅशबुक बंद करणे, अशी इतर कामे असल्याने त्याने नाणी स्वीकारायला नकार दिला. विमाधारक ऐकेना. ‘पैसे घ्या आणि मला पावती द्या, नाही तर आताच्या आता पॉलिसी रद्द करतो, आजपर्यंत भरलेले सर्व पैसे परत द्या,’ दुकानदारांने आवाज वाढवून ऑफिस डोक्‍यावर घेतलं. कॅशिअरने त्यांना शांतपणे सांगितले, की ‘एवढी रोकड रक्कम तर आता घेणारच नाही. पलीकडेच शाखाधिकाऱ्यांची केबिन आहे, त्यांना तुम्ही भेटा.’

काउंटरजवळचा गोंधळ ऐकून मी केबिनमधून बाहेर पडतच होतो, तोच त्या दुकानदाराने मला दारापाशीच तक्रार सांगण्यास सुरवात केली. मी त्यांना म्हणालो, ‘तुमचा प्रश्‍न मला कळला आहे. तुम्ही आत या. खुर्चीवर बसा. आपण बोलूया.’ त्यांना आग्रह करून खुर्चीवर बसवले, पाण्याचा ग्लास पुढे केला. ते म्हणाले, ‘मला हे नको आहे, माझा भरणा घ्या आणि मला पावती द्या.’ ते काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत हे पाहून मी त्यांना सांगितलं, ‘‘ तुम्हाला पावती आजच मिळेल, तुमचा माझ्यावर विश्‍वास आहे ना, मग ती पैशाची पॉलिथिनची बॅग माझ्याकडे सोपवा आणि कॅशिअरकडे विजयी मुद्रेने न पाहता तुम्ही ऑफिसबाहेर पडा. तुमची पावती तुमच्या दुकानावर ऑफिसमधील माझा कोणीतरी सहकारी घेऊन येईल.’’ आता ते शांतपणे ऑफिसबाहेर पडले.

सुदैवाने त्यादिवशी माझ्या खिशात शंभराच्या दहा-बारा नोटा होत्या, त्यांतील आठ नोटा व बाकी सुटी नाणी एवढी रक्कम मी शिपायाबरोबर कॅशिअरकडे पाठविली व पावती माझ्याकडे आणून द्यायला सांगितले. कॅशिअरने काहीशा रागानेच हे सर्व केले आणि तो मला म्हणाला, ‘‘साहेब, त्याचे पैसे नाकारून त्याला धडा शिकवायला पाहिजे होता.’’ मी म्हणालो, ‘‘तो धडा शिकेल, पण तुम्ही म्हणता त्या मार्गाने नव्हे.’’

सायंकाळी ऑफिस सुटताच मी घरी गेलो. चहा होताच पत्नीला म्हणालो, ‘‘किराणा सामानाची एक यादी कर. साधारण आठशे-नऊशे बिल झालं पाहिजे. जरा वेळांनं बाहेर पडून एका नव्या दुकानांतून ते सामान घेऊन येऊ.’’ ती म्हणाली, ‘अहो, आठ-दहा दिवसांपूर्वीच सर्व सामान भरलं आहे, आता गरज नाही.’ मी म्हटलं, ‘असू दे, पुढच्या महिन्यांत आपण सामान आणणार नाही.’

आम्ही दोघंही दुकानात आलो. नमस्कार-चमत्कार होताच मी खिशातून त्यांची विमाहप्ता भरल्याची पावती दिली, ते आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले, ‘‘साहेब, तुम्ही पावती घेऊन आलात!’’ मी म्हटलं, ‘‘पावती तुम्हाला वेळेत मिळावी आणि मलाही तुमच्या दुकानांतून सामान घ्यायचं आहे म्हणून आलो.’’ सामानाची यादी घेऊन त्याप्रमाणे त्यांनी नोकरांकरवी सामान काढले व ते गाडीत ठेवण्यास सांगितले. ८६० रुपये बिल झाले, असे त्यांनी सांगताच, पॉलिथिनच्या बॅगमधील ८०० रुपयांची नाणी व दहा रुपयांच्या सहा नोटा दिल्या. ते रागानं मला म्हणाले, ‘‘तुम्ही मला धडा शिकवायला आलात काय?’’ मी म्हटलं, ‘‘ छे हो शेटजी, दुकान बंद करण्याच्या वेळी एवढी मोठ्या संख्येची नाणी मोजणार कधी आणि बाकी सोपस्कार करणार कधी हा जो विचार तुमच्या मनात आला, तोच आमच्या कॅशिअरच्या मनात आला. आणि त्यामुळे उगीचच ऑफिसमध्ये सगळ्यांचा आवाज वाढला. हे तुमच्या लक्षात यावं एवढाच माझा हेतू.’’ शेटजींनी झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करून पुन्हा दुकानात, घरी येण्याचा आग्रह केला.

तीन महिन्यांनी शेटजी पुन्हा विमाहप्ता भरायला आले. प्रथम माझ्या केबिनमध्ये येऊन विचारलं, ‘साहेब, शंभर रुपयांच्या नोटा व बाकी सुटे पैसे कॅशिअर स्वीकारेल ना?’ मी म्हटलं,‘‘ का नाही. तुम्ही पैसे भरून या, तोपर्यंत मी चहा मागवून ठेवतो.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com