गोष्ट तशी पाच डॉलरचीच...

शीला शारंगपाणी
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

आयुष्यात कधी कधी अशा गोष्टी घडतात, की कुठल्या तरी अदृश्‍य शक्तीचे अस्तित्व नाकारायला मन धजावत नाही. अशीच एक गोष्ट. काही वर्षांपूर्वीची. आमचे टोकियोला पोस्टिंग होते. तेथे दोन वर्षे राहून आम्ही अल्जेरियाला गेलो. टोकियो आणि अल्जेरिया सगळ्याच बाबतींत दोन टोके. तेव्हा डॉलर काही आजच्यासारखे मिळत नव्हते. त्याचेही रेशनिंग होते म्हणा ना! सरकारकडून दिवसाला ठराविक डॉलर मिळायचे. ते जपून वापरायला लागायचे. बाकी सर्व व्यवहार स्थानिक चलनातून करावे लागत. अल्जेरियातून एकदा सुटीत अमेरिकेला गेलो. डॉलर वाचवण्यासाठी आम्ही काय काय क्‍लृप्त्या करायचो ते आठवले तरी आता हसू येते. मुले वाढती होती.

आयुष्यात कधी कधी अशा गोष्टी घडतात, की कुठल्या तरी अदृश्‍य शक्तीचे अस्तित्व नाकारायला मन धजावत नाही. अशीच एक गोष्ट. काही वर्षांपूर्वीची. आमचे टोकियोला पोस्टिंग होते. तेथे दोन वर्षे राहून आम्ही अल्जेरियाला गेलो. टोकियो आणि अल्जेरिया सगळ्याच बाबतींत दोन टोके. तेव्हा डॉलर काही आजच्यासारखे मिळत नव्हते. त्याचेही रेशनिंग होते म्हणा ना! सरकारकडून दिवसाला ठराविक डॉलर मिळायचे. ते जपून वापरायला लागायचे. बाकी सर्व व्यवहार स्थानिक चलनातून करावे लागत. अल्जेरियातून एकदा सुटीत अमेरिकेला गेलो. डॉलर वाचवण्यासाठी आम्ही काय काय क्‍लृप्त्या करायचो ते आठवले तरी आता हसू येते. मुले वाढती होती. दर शनिवारी माझा उपास. त्या दिवशी फक्त एकच जेवण. ते आम्ही ‘इंडियन रेस्टॉरंट’मध्ये घ्यायचो, एरवी परवडायचे नाही. कारण, ते फार महाग पडायचे. मुले तेथील पदार्थांची किंमत पाहून बाहेर पळायची. आम्हाला म्हणायची, तुम्ही जेवा, आम्ही बाहेर जेवतो. एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये दिवसभर वणवण करून पुष्कळ गोष्टी घेतल्या. नेहमी लागणाऱ्या आणि अल्जेरियात न मिळणाऱ्या. प्रत्येकाचे ‘शॉपिंग’मध्ये वेगवेगळे स्वारस्य असल्याने आम्ही चौघे कुठल्या तरी मजल्यावर असायचो. किती वाजता आणि स्टोअरमध्ये कुठे भेटायचे हे ठरवून आम्ही दिवसभर हिंडत होतो आणि जेव्हा आम्ही सगळे भेटलो, तेव्हा दोन बॅगा हरवल्या होत्या. स्टोअरच्या बॅगा सगळ्यांच्याच हातात होत्या. सगळ्या एकसारख्या. तरीही एका गोऱ्या बाईच्या हातात आमच्या दोन बॅगा आहेत, असा यांना संशयही आला होता. यांनी तिच्याशी बोलणेही केले; पण ती बाई काही बॅगा उघडून बघायला तयार नव्हती आणि नाही म्हटले तरी गोऱ्या बाईच्या हातातील बॅगा जबरदस्तीने कशा पाहणार! त्या दोन्ही बॅगा आमच्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या. मुख्य म्हणजे मुलाच्या जीन्स, टी शर्टस, माझी पर्स, मंगळसूत्र, पैसे आणि बरेच काही होते. सगळा मूड ऑफ झाला. तिथल्या व्यवस्थापकाकडे हॉटेलचा दूरध्वनी क्रमांक दिला. कोणी सामान परत केल्यास आम्हाला संपर्क करण्याची विनंती करून घरी म्हणजे हॉटेलवर परतलो. रोज सकाळ-संध्याकाळ स्टोअर्सला संपर्क साधत होतो; पण हाती निराशाच पडली होती. दुसरा दिवस स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला भेट देण्याचा होता. आम्ही हे एवढे सुप्रसिद्ध ठिकाण पाहात होतो, म्हणजे त्या परिसरात देहाने हिंडत होतो; पण प्रत्यक्षात काही मनात आत शिरत नव्हते. अजून मूड नव्हताच. पुढे दहा-बारा वर्षांनी जेव्हा अमेरिकेला सॅनफ्रॅन्सिस्कोला गेले, तेव्हा मी माझ्या मुलाला म्हटले, पहिली भेट मला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला द्यायची. माझा मुलगा माझ्याकडे आश्‍चर्याने बघतच राहिला आणि म्हणाला, ‘‘कॅलिफोर्नियाला आली आहेस, इथे अनेक गोष्टी बघण्यास लोक येतात आणि तू एकदा पाहिलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहाण्यासाठी काय उत्सुक आहेस?’’ त्यावर मी म्हणाले ‘‘आपण तो पाहिलाच नाही, मला पाहायचा आहे.’’ आईला काय झालेय? डिमेन्शियाची सुरवात तर नाही ना, या विचाराने घाबरून तो माझ्याकडे पाहातच राहिला! 

तर काय सांगत होते, हं, करता करता परतीच्या आदला दिवस उजाडला. परत स्टोअरमध्ये जाऊन सगळी खरेदी केली. कारण, ही खरेदी चैन नव्हती, गरज होती. अल्जेरियात या वस्तू मिळत नसत. दुष्काळात तेरावा महिना, दुसरे काय. आज निघायची वेळ होत होती. शनिवार होता. यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून स्टोअरशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. उत्तर अर्थातच नेहमीसारखे नकारार्थी आले. थोड्या वेळाने टॅक्‍सी करून विमानतळावर जाण्यासाठी निघालो. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर नाहीच; पण वेगळ्या रस्त्यावरही थोडा दूरच हा मॉल होता. मी यांना विचारले, की ‘शेवटचा प्रयत्न करूया का?’ यांनी सरळ नकार दिला. थोडासा वाद झाला आणि मी हट्टाला पेटून टॅक्‍सीवाल्याला टॅक्‍सी स्टोअर्सपाशी न्यायला सांगितली. 

मारुतीची मनोमन प्रार्थना केली. स्टोअरमध्ये जाऊन व्यवस्थापकाला भेटले. तो आश्‍चर्यचकित. ‘अहो, आत्ताच दहा-पंधरा मिनिटांपूर्वी एक बाई तुमचे सामान घेऊन आल्या होत्या. मी तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला हॉटेलवर; पण तुम्ही त्याआधीच हॉटेल सोडून निघाला होता.’

मी त्या सामानावर झडप घातली. हनुमंताचे आभार मानले आणि पुन्हा खरेदी केल्याने जादा झालेले सामान परत केले. टॅक्‍सीत बसल्यावर पर्समधील पैसे मोजले. पाच डॉलर कमी होते; पण एक चिठ्ठीही होती, ‘टॅक्‍सीचे भाडे.’