पाच नंबरचा बंगला

सुनंदा कोगेकर
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

दीपांच्या प्रकाशात अंधाराचा पडदा दूर सारायचा आणि दूरवर पाहायचे. त्या प्रकाशात कधी भविष्यातील वाट दिसते; तर कधी भूतकाळातील जग. हातातल्या ज्योतीने ते जग पुन्हा एकदा प्रकाशून टाकायचे असते.

‘मुक्तपीठ’मधील ‘फर्ग्युसनचे मुलींचे वसतिगृह’ 
हा लेख वाचला आणि माझ्या मनात आठवणी 

कारंज्यासारख्या उसळून आल्या. माझे वडील श्री. रा. पारसनीस फर्ग्युसन महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. १९४७ मध्ये त्यांना मुलांच्या वसतिगृहाचे रेक्‍टर म्हणून ‘पाच नंबरचा बंगला’ मिळाला. त्यानंतर सुमारे अकरा वर्षे आम्ही त्या बंगल्यात होतो.

बंगल्याला पाच खोल्या, पुढे-मागे मोठे व्हरांडे, हॉल, स्वयंपाकघर अशी रचना होती. मागे आउट हाउस, तबेला! बंगल्याचे आवार अक्षरशः घनदाट झाडीने झाकलेले होते. सर्व तऱ्हेची फळझाडे, फणस, जांभूळ, पेरू, रामफळ, साधे आवळे होते. आंब्याची तर पंधरा-सोळी झाडे होती. एप्रिल-मे महिन्यांमध्ये आंबे उतरवणे, त्यांची वर्गवारी करणे, अढी लावणे, अढ्या वरचेवर तपासून सडलेले आंबे टाकून देणे, पिकलेले आंबे बाहेर काढून मोजदाद करणे हा एक मोठाच उद्योग असे. एका वेळी पाच-पाच हजार आंबे असत. मग चार-सहा पिशव्या भरून आई मला व एका मोठ्या बंधूंना सायकलवरून नातेवाईक, परिचित, संस्थेशी संबंधित यांच्याकडे आंबे पोचवण्याचे फर्मान सोडी. फणसाची दोन झाडे होती. बंगल्याच्या दर्शनी भागात एका हौदालगत कापा फणस होता. रॅंग्लर परांजपे यांनी तो लावला होता. दरवर्षी शकुंतलाबाई परांजपे भाजीसाठी फणस न्यायला यायच्या. ‘अप्पांना कच्च्या फणसाची भाजी फार आवडते’ असे म्हणायच्या. प्रत्येकवेळी भाजीची रेसिपी सांगून जायच्या. जांभळे तर इतकी टपोरी आणि मधुर होती, की पुन्हा अशी जांभळे पैसे देऊनही खायला मिळाली नाहीत. टोपल्या भरभरून जांभळे निघत. कोणी मधुमेही नातेवाईक, परिचित यांना मुद्दाम आमंत्रण दिले जाई. पेरूही कलमी होते. खारींचे, पक्ष्यांचे देणे देऊन झाले की बाकीचे आमचेच असे.

आम्ही राहायला गेलो तेव्हा मी शाळेतच होते. माझ्या वर्गमैत्रिणींच्या बहिणींचे विवाह झाले, की मंगळगौर तसेच हरताळका यासाठी पत्री न्यायला मैत्रिणी आमच्याकडे येत. तेव्हा मला इतका अभिमान वाटायचा! (जसे काही झाडे मीच लावली होती!) या सर्व झाडांमुळे बंगलाही उन्हाळ्यात गार राही. तरीपण उन्हाळ्याच्या सुटीत मी व माझी मोठी बहीण दुपारी एक चटई घेऊन बागेतल्या एखाद्या झाडाच्या सावलीत निवांत गप्पा मारत बसत असू. याच बंगल्यात आमच्याकडे खूप मोठी माणसे येऊन गेल्याचे मला आठवते. महर्षी कर्वे, माजी संरक्षणमंत्री काटजू, माजी सरन्यायाधीश पी. बी. गजेंद्रगडकर, आचार्य अत्रे, शीलवतीबाई केतकर ही काही नावे स्मरणात आहेत. वडील मराठीचे प्राध्यापक असल्याने साहित्यिकही येत असत. कवी गिरीश, कृ. पां. कुलकर्णी, श्री. म. माटे हेही येऊन गेल्याचे आठवते.

याच बंगल्याच्या समोर मुलींचे वसतिगृह होते. (अद्यापही आहे.) उन्हाळ्याच्या सुटीत मुली आपापल्या घरी गेल्या, की खोल्या रिकाम्या होत. त्यातल्या चार-पाच लोखंडी कॉट्‌स आमच्या मागील अंगणात टाकल्या जात. उन्हाळ्यात बहुतेक जण बाहेर झोपत असू. मोठे बंधू आकाशातील ताऱ्यांची माहिती देत. आम्हां तिन्ही बहिणींच्या विवाहाचे स्वागत समारंभही मुलींच्या वसतिगृहाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झाले. शेजारच्या म्हणजे चार नंबरच्या बंगल्यात वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक व्ही. व्ही. आपटे राहात. त्याही बंगल्यात आंब्याची झाडे होती; परंतु त्यात चिंचेची झाडे जास्त होती. अक्षरशः पोत्यांनी चिंचा निघत. मार्च महिन्यात चिंचा निघाल्या, की एक पोते आमच्याकडेही येई. मग साले, बिया वेगळे काढणे हे काम आई घरातल्या प्रत्येकाच्या मागे लावी.

गावात वेगवेगळ्या वेळी क्षोभ उसळला, जाळपोळ झाली, संचारबंदी लागू झाली, तरी महाविद्यालयाच्या आवारात शांतता असे. कोणीही महाविद्यालयाला त्रास होईल असे वागत नसत. आम्ही संध्याकाळी महाविद्यालयामागच्या टेकडीवर फिरायला जात असू. खूप जण तिकडे फिरायला येत. पुढे माझ्या वडिलांना पहिल्या गेटजवळचा तीन नंबरचा बंगला मिळाला. मला वाटले, आपला आणि पाच नंबरचा बंगला यांचे नाते तुटले; पण तसे घडायचे नव्हते. माझा विवाह प्राचार्य कोगेकर यांच्या पुतण्याशी झाला. प्राचार्य कोगेकर गावातील घर सोडून पाच नंबरच्या बंगल्यात राहायला आले. पूर्वी माहेर ज्या बंगल्यात होते, तेथेच आता सासर झाले, ही वेगळीच गंमत. 

तीन नंबरच्या बंगल्यात राहात असताना वडिलांना निवृत्तीनंतर तो बंगला सोडावा लागला. फर्ग्युसनचे आवार आम्ही सोडले. विवाहानंतर माझेही वास्तव्य अनेक वर्षे उत्तर भारतात झाले. आता दहा वर्षांपूर्वी पुन्हा पुण्यात परतले. ‘मुक्तपीठ’मधला तो लेख वाचला आणि  मलाही पुन्हा एकदा पाच नंबरचा बंगला पाहावा, असे वाटू लागले आहे.