mukta manohar's saptarang article
mukta manohar's saptarang article

गाणारा कावळा (मुक्ता मनोहर)

शहाणा कावळा खुळ्या कावळ्याला म्हणाला ः ‘‘बघ, मी तुझा मित्रच आहे. अरे, तू अगदीच कसा रे खुळा? असं दगडानं अंग घासून कधी रंग बदलतो का कुणाचा? तुला ती जुनी हकीकत माहीत नाही का? खूप खूप वर्षांपूर्वी असंच एका बगळ्याचं ऐकून एका कावळ्यानं आपलं अंग घास घास घासलं आणि शेवटी तो रक्तबंबाळ होऊन मरण पावला.’’

इसापच्या जंगलात राहत असतो एक खुळा कावळा आणि एक शहाणा कावळा. त्या दोघांची अगदी घट्ट मैत्री असते. खुळ्याची आणि शहाण्याची मैत्री कशी होऊ शकते, याचं सगळ्यांनाच आश्‍चर्य वाटत असे. या मैत्रीची सुरवात झाली ती खुळ्या कावळ्याच्या खुळेपणापासूनच. म्हणजे त्याचं असं झालं... एकदा त्याला वाटलं, की त्याचा तो काळा कुळकुळीत रंग जावा आणि त्याला बगळ्यासारखा छान गोरा पांढरा स्वच्छ रंग मिळावा. मग त्याला त्या विचारानं खूपच पछाडलं.

तो ज्याला त्याला विचारत सुटला, की गोरं कसं व्हायचं, गोरं कसं व्हायचं? अर्थात कुणीही त्याच्याकडं लक्ष दिलं नाही. मग त्यानं ठरवलं, की पांढऱ्याशुभ्र बगळ्यालाच विचारलं पाहिजे. मग तो जंगलातल्या तळ्याकाठी आला आणि तिथं एका पायावर उभं राहून ध्यानमग्न बगळ्याला तो म्हणाला ः ‘‘बगळेबुवा, मला तुमच्यासारखा गोरा गोरा रंग कसा काय मिळेल?’’ बगळ्यानं थोडा विचार केला आणि त्याला आठवलं, की त्याच्या पणजोबांच्या पणजोबांनी अशीच एका कावळ्याची थट्टा केली होती. ती आठवून तो किंचित हसला आणि म्हणाला ः ‘‘ते काही इतकं अवघड नाहीये. मीसुद्धा तुमच्यासारखाच काळा कुळकुळीत होतो. मग कावळ्यानं अधीरतेनं विचारलं ः ‘‘तुम्ही काही साबण वापरलात की गोरं व्हायचं क्रीम?’’ त्यावर बगळा म्हणाला ः ‘‘छे...ते कुठलं आलं आपल्याकडं? मी आपला या तलावावर आलो. एक दगड घेतला आणि बसलो की माझं अंग जोराजोरात घासायला. त्यामुळं माझा काळा रंग गेला आणि आतला गोरा रंग चमकायला लागलाय.’’ खुळ्या कावळ्याला त्याचं बोलणं खरच वाटलं. मग त्यानं तळ्याच्या काठची एक जागा निवडली. एक दगड उचलला. कुठून सुरुवात करावी, याचा तो विचार करायला लागला.

‘चला, मान घासण्यापासून सुरवात करावी,’ तो मनात म्हणाला आणि केली त्यानं मान घासायला सुरवात. तेवढ्यात कुणी तरी ओरडलं ः ‘‘मित्रा थांब, हे काय करत आहेस?’’
त्यावर तर खुळा कावळा दचकूनच गेला. तो म्हणाला ‘‘कोण आहे?’’ त्यावर शहाणा कावळा म्हणाला ः ‘‘बघ, मी तुझा मित्रच आहे. अरे, तू अगदीच कसा रे खुळा? असं दगडानं अंग घासून कधी रंग बदलतो का? तुला ती जुनी हकीकत माहीत नाही का? खूप खूप वर्षांपूर्वी असंच एका बगळ्याचं ऐकून एका कावळ्यानं आपलं अंग घास घास घासलं आणि शेवटी तो रक्तबंबाळ होऊन मरण पावला.’’

हे ऐकून खुळा कावळा एकदम घाबरून गेला. त्यानं हातातला दगड फेकून दिला आणि त्या शहाण्या कावळ्याबरोबर तळ्याजवळच्या झाडावर जाऊन बसला. मात्र, ‘आता आपण कधीच गोरे होणार नाही,’ याचं त्याला खूप वाईट वाटायला लागलं. आणि तो रडायलाच लागला. त्यावर शहाणा कावळा त्याला शांत करायचा प्रयत्न करू लागला. ‘‘हे बघ, तुला मी गंमत करून दाखवतो...’’ असं म्हणून शहाणा कावळा दोनदा ‘काव काव’ असं ओरडतो आणि मग चक्क ‘कुहू.. कुहू..’ असा कोकीळ पक्ष्यासारखा आवाज काढतो. आता मात्र खुळ्याला फारच आश्‍चर्य वाटतं. तो रडायचा थांबतो आणि शहाण्याला विचारतो ः ‘‘हे कसं काय? तू कोकीळ पक्षी आहेस की कावळा?’’ त्यावर शहाणा कावळा हसतो आणि म्हणतो ः ‘‘असं ‘कुहू कुहू’ मला अगदी थोडा वेळच करता येतं आणि त्याची हकीकतही फार मजेशीर आहे. म्हणजे ती माझ्या जन्माचीच गोष्ट आहे. कोकिळाबाई म्हणे स्वतःची अंडी इतर पक्ष्यांच्या घरात घालतात. तर तसं माझ्या आईच्या घरात एका कोकिळाबाईंनी स्वतःचं अंडं आणून ठेवलं. माझ्या आईच्या जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा तिला फारच राग आला आणि तिनंही मग एक गंमत केली. जेव्हा कोकीळ आपलं पिल्लू न्यायला आला, तेव्हा माझ्या आईनं मलाच त्याच्याबरोबर दिलं पाठवून! मग काही विचारू नकोस... खूप मजा आली. खूप प्रयत्न करून त्या कोकीळ पक्ष्याकडून मी चक्क ‘कुहू कुहू’ असं थोडंस गायला शिकलो. ही गोष्ट ऐकून खुळ्या कावळ्याला भयंकर आश्‍चर्य वाटलं. ‘‘बाप रे, केवढी मजा आहे... म्हणजे प्रयत्न केला तर मलासुद्धा कधी तरी ‘कुहू कुहू’ असं म्हणता येईल?’’ त्यानं विचारलं.

‘‘हो. येईल करता. म्हणजे जे करता येणं शक्‍य आहे तेच करावं किंवा त्याची नीट माहिती तरी घ्यावी. म्हणून म्हणतो, मला हे नक्की माहीत आहे, की दगडानं अंग घासून कधीही रंग बदलत नाही आणि अंगाचा, पिसांचा रंग बदलण्यासाठी काय करावं लागेल, याची कोणतीही माहिती अजून तरी मला मिळालेली नाही,’’ शहाण्या कावळ्यानं माहिती पुरवली. अशा गप्पा मारता मारता खुळ्या आणि शहाण्या कावळ्याची मैत्री वाढायला लागली. आणि दोघांच्याही असं लक्षात आलं, की खुळा कावळाही कधी कधी शहाण्यासारखा बोलतो-वागतो, तर शहाणा कावळाही कधी कधी खुळ्यासारखा वागतो-बोलतो! त्यामुळंच की काय, ती अजब मैत्री दिवसेंदिवस घट्ट घट्ट व्हायला लागली...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com