मी आणि माझं बुजगावणं 

विपुला अभ्यंकर 
मंगळवार, 14 मार्च 2017

नवमाध्यमं ही गरज आहे; पण त्यांच्या आहारी जाणं हे काही योग्य नाही. ही नवमाध्यमं आपल्या संवेदना, विचारशक्ती गोठवून आपली बुजगावणी करीत आहेत. सावधान! 

नवमाध्यमं ही गरज आहे; पण त्यांच्या आहारी जाणं हे काही योग्य नाही. ही नवमाध्यमं आपल्या संवेदना, विचारशक्ती गोठवून आपली बुजगावणी करीत आहेत. सावधान! 

मी डिसेंबरमध्ये चेन्नईला आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी जाणार होते. प्रमुख संयोजकांशी ई-मेलच्या माध्यमातून संपर्कात होते. जाण्यापूर्वी वाटलं, त्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन ठेवूयात. अडचण आली तर असलेला बरा. त्यांचा मेल आला, ते मोबाईल वापरत नसल्याचा आणि मला कोणतीही अडचण येणार नसल्याची खात्री देणारा. मी थोडी अचंबित झाले. एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती, कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी, तरीही मोबाईलची गरज कशी वाटत नाही! 
आज याची आठवण होण्याचं कारण, सध्याचं मोबाईलच्या वापराचं भयंकर रूप ! 
प्रत्यक्षात घडणाऱ्या व न घडणाऱ्या गोष्टींचं तत्काळ आणि सर्वदूर व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून होणारं प्रसारण, त्यावर निर्माण होणारी क्रिया- प्रतिक्रियांची साखळी. नातेवाइकांचा, मित्र-मैत्रिणींचा, एकाच ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप बनतो. निरोपाच्या, माहितीपर, विनोदी पोस्ट टाकल्या जातात. सुरवातीला उत्साहाच्या भरात वाचल्या जातात. नावीन्य लवकरच उतरत जातं. एकच पोस्ट अनेक गटांकडून प्रत्येकाला पोचत राहते. भावनिक, वैचारिक, मानसिक क्षमतेच्या तुलनेत या माहितीचा, प्रतिक्रियांचा किंवा आवाहन संदेशांचा अमर्याद आणि सार्वत्रिक मारा होत राहतो. आकलनशक्तीच संपुष्टात येते. विचार थांबतो. नंतर हळूहळू थोडी मोठी पोस्ट असली तर आशयाचा अंदाज बांधून किंवा कोणाकडून आली आहे हे बघून ती न वाचताच अंगठे, चेहरे उमटवले जातात. सण, वाढदिवस, वेगवेगळे दिन व मरण हे सर्व फक्त पोस्टचे विषय झाल्यानं ते सर्व एकाच "व्हॉट्‌सऍप उत्साहा'ने साजरे केले जातात. फोटोंची देवाणघेवाण करण्यात रमून जातात. पोस्ट इकडून तिकडे ढकलल्या जातात. 
समविचारी किंवा सामाजिक संस्था- संघटनांमध्ये काम करणारे लोक स्वतःचा गट इतरांपेक्षा कसा वेगळा आहे या विचाराने जोरात चर्चा सुरू करतात. शब्दाशब्दांतील फरकाने कुसळाइतक्‍या असणाऱ्या मतभेदाचं मुसळाइतक्‍या भिन्नतेत रूपांतर होतं. गटात उपगट तयार होतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात विषयाला धरून होणाऱ्या तर्कशुद्ध तात्त्विक चर्चा बाजूलाच राहतात. 
कोणी म्हणेल, छान आहे की. लोकांचं कम्युनिकेशन वाढतंय, विचारांची देवाणघेवाण होतेय. एकमेकांशी जोडलेले राहतात; आणि मला मात्र या छान वाटण्याचीच भीती वाटतेय. कारण - 
व्हॉट्‌सऍप गटात फिरत असणारे बरेचसे व्हिडिओज, बातम्या या तसं काहीही घडलेलं नसतानाच तयार झालेल्या असतात. एखाद्या गोष्टीची उपयोगिता किंवा हानिकारकता अतिरंजित पद्धतीनं मांडलेली असते. कसलाही विचार न करता आपण या छोट्या पडद्यावर विश्वास ठेवतो आणि कृतिशील होतो- स्वीकारायला, अमलात आणायला किंवा पुढे ढकलायला. 
धार्मिक, जातीय, सामाजिक, राजकीय विषयांवरील पोस्टनी तर उरात धडकीच भरते. ज्याप्रकारे त्यांचा प्रसार व प्रचार केला जातो, त्याने विचारक्षमता थिजते तरी किंवा विनाकारण द्वेषाने उसळी मारते. अशा प्रकारच्या चुटपुट्या माध्यमांनी सखोल विचाराला, वाचनाला बांध घातलेलाच असतो. त्यातच काही पोस्ट (मुद्दाम तयार करून प्रसारित केलेल्या) भावनिक आवेशाला हात घालतात; आणि मग प्रखर बाजूने किंवा विखारी विरोधाने पोस्टची मालिका सुरू होते. 
सामान्य माणूस अशा व्हर्च्युअल रिऍलिटीमध्ये अडकून पडतो. विचार करण्याचं थांबवतो. आपली तार्किकता कोणाच्या तरी पदरी गहाण टाकतो आणि अधिक खेदाची बाब म्हणजे याची त्याला जाणीवही असत नाही. किंबहुना, या सगळ्याहून त्याची नेट पॅक ही जीवनावश्‍यक गोष्ट बनते. 
दूरचित्रवाणीवरील चर्चांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. 
एका विषयावर चर्चा सुरू होते. सुरवातीला चर्चा बरी चाललेली असते, आपणही त्यावर विचार करायला सुरवात केलेली असते; पण एकमेकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या, कुरघोडी करण्याच्या नादात चर्चा एका शब्दावर अडून राहते. तोडफोड करत मूळ प्रश्नापासून फारकत घेऊन दुसऱ्याच रंगरूपात पुढ्यात येते. केवळ शब्दांची गुंतवळ तयार होते. सामान्य माणूस त्या गुंत्यात फसत जातो. त्या गुंतवळीलाच वैचारिक खोली समजावं, असं मानकदेखील त्यातून निर्माण केलं जातं, तेव्हा आपण हताश होऊन विचाराचा रस्ता सोडून देतो. 
हे सगळं आपल्याला आणि समाजाला कुठं घेऊन चाललंय? 
या माध्यमांच्या निश्‍चितपणे काही जमेच्या बाजू आहेत, त्या कायम ठेवून त्याच्या अतिरेकी आणि गैरवापरामुळे आणि माऱ्यामुळे काय होत चाललं आहे याकडे बघायला आपल्याला सवड तरी नाही किंवा त्याची इतकी झिंग चढलेली आहे, की माध्यमांनी घशात कोंबलेली अफूची गोळी खाऊन घोरत पडून आहोत. दिवस येतो- जातो, तारीख- वार बदलतात, घटना बदलतात, त्यांच्या वेगळ्या बातम्या बनवल्या जातात. आपण आहे तिथेच राहणं पसंत करतो. संवेदनांचं थिजलेपण आपल्याला आल्हाददायक वाटायला लागतं. उत्सुकता संपून जाते. विचाराला दिशा राहत नाही. कशालातरी, कोणालातरी पकडून त्याच्या आधारे बुजगावणं बनून जगणं सुरू ठेवतो आपण. 

Web Title: Muktapeeth