उन्हाची लेक

धनवंती मोहिते
बुधवार, 17 मे 2017

तिचे नुसते घरच उन्हात बांधलेले होते असे नाही, तर सारे जगणेच उन्हाच्या टोकदार भाल्यांखाली होते; पण "पांडुरंगाने दिले ते सोने झाले' या भावनेने ही उन्हाची लेक आयुष्याला सामोरी गेली.

तिचे लग्न झाले तेच मुळात तिच्या पाळण्याला बाशिंग बांधून! शे-शंभर वर्षांपूर्वीची ही गोष्ट. एखाद्याचे घर उन्हात बांधायची शिक्षा आपण लहानपणी दिलेली असते. पण तिचे घर-संसार, सगळे जगणेच उन्हात गेले. उन्हाची लेक होऊन ती आयुष्याला सामोरी गेली.

ती माझी आजी होती. आईची आई. हिराबाई भ्रतार शिवाजी खोत. अतिशय कष्टाचे आयुष्य तिच्या वाट्याला आले; पण "पांडुरंगाने दिले ते सोने झाले' या भावनेने तिने ते स्वीकारले होते. ती मोठी होऊन नवऱ्याघरी आली. पण शिकवायला ना कोणी माहेरचे, ना कोणी सासरचे. आजूबाजूच्या जाणत्या बायकांकडून शिकत शिकत तिच्या संसाराची सुरवात झाली. पुढे जरा मोठेपणी स्वतःची बाळंतपणे स्वतःच करायची आणि लगेच कामाला लागायचे हा प्रकार. ती एक आठवण मला नेहमी सांगे, "तुझ्या आईच्या वेळी बाळंत झाले, पोटात भुकेची आग पडली होती, खायला कोण देणार? पलीकडे कैऱ्यांचा ढीग पडला होता. मी कडाकडा कैऱ्याच फोडून खाल्ल्या बघ.'

माझी मावशी, मामा आणि आई यांचा जन्म झाल्यावर तिने स्पष्टपणे आजोबांना सांगितले, ""या पुढे तुम्ही आणि मी भाऊ-बहीण. या तिघांपेक्षा जास्त मुले नीट मोठी करणे मला जमणार नाही. तुम्हाला वाटले तर खुशाल दुसरे लग्न करा. मी आणि मुले तुम्हाला आड येणार नाही.'' सत्तर- पंचाहत्तर वर्षांपूर्वी असा विचार करणारी माझी आजी खरी स्त्रीमुक्तीवादी वाटते मला आणि त्याकाळी दुसरे लग्न करण्याची सर्रास पद्धत असतानासुद्धा हाच संसार टिकवून ठेवणारे आजोबाही नक्कीच काळाच्या पुढचे.

आजी पूर्ण निरक्षर; पण तिन्ही लेकरांना तिने शिकायला प्रोत्साहन दिले. तिने मामा आणि आईला त्या काळात पदव्युत्तर शिक्षण घ्यायला लावले. पन्नास वर्षांपूर्वीचा खेडेगावातील काळ. लोक आजीला बोलत, "हिराकाकी, लेकीला इतके शिकवून काय मड्डम करणार काय?' त्यावर आजी म्हणे, "मी एक अडाणी राहिले म्हणून उन्हात कष्ट करते. माझी लेक शिकली तर ती सावलीत बसून काम करेल.' माझी आई इंग्रजीची प्राध्यापक झाल्यावर तिचा जीव आभाळाएवढा झाला होता. तिने आईला सांगितले होते, "तुझ्यावानी शंभर पोरीस्नी शिकीव आन्‌ नोकरी लाव, तरच माझा पांग फिटल बग.' कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आजीला फार आदर होता. "भाऊराव मोठा देव माणूस! नाय तर आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या पोरांना कोन साळा दावनार हुतं?' अशी तिची भावना होती.

पैशाची श्रीमंती कधीच नव्हती तिच्याकडे; पण मनात माणुसकीची श्रीमंती ओतप्रोत भरलेली. ढगेवाडी या तिच्या छोट्याशा खेड्यात कितीतरी जणींची बाळंतपणे तिने सुखरूपपणे केली होती. त्या सासुरवाशीण बाळंतिणीला मऊ गरम भाकरी, तूप अन्‌ गुळाचा खडा आजीच पुरवायची. घरी जाच होणाऱ्या सासुरवाशिणीला गुपचुप कोरभर भाजी-भाकरी मिळण्याचे हक्काचे घर म्हणजे हिरा आजीचेच. ज्याला जिथे जशी जमेल तशी मदत करणे हेच तिच्या आयुष्याचे तत्त्व होते.

आम्हा नातवंडावर तर तिचा फार जीव. माझ्या मोठ्या मावशीचा मुलगा एकदम तान्हा होता. तिच्या सासरी बाळाची फार आबाळ होऊ लागली म्हणून आजीने नातवाला स्वतःकडे नेऊन वाढवले. तिच्या वात्स्यल्याचा एक प्रसंग. एके सकाळी सात वाजता आजी आमच्या कराडच्या घरी दारात उभी. "आजी, एकदम कशी काय आलीस सकाळी सकाळी? पत्र नाही, निरोप नाही?' मी विचारले. आजीनं दम घेता घेता विचारले, "आधी सांग, दादा कुठसा हाय?' माझा मोठा भाऊ आदल्या दिवशीच नोकरीच्या ठिकाणी गेला होता. "दादा गेला कालच रत्नागिरीला, का गं?' आजी गप्पच. जरा वेळाने आईला म्हणाली, ""पहाटे वंगाळ सपान पडलं. एक हिरवी पातळ ल्यालेली बाई एका खड्ड्यात पडलेलं मूल उचलत होती. मी तिला ईच्यारले- "बाई, तू कोन? हे मूल कुनाचं?' तर ती बोलली- "तुझंच मूल तुला वळकु यीना का?' माझी झोपच उडाली. पैल्या गाडीनं इकडे आले दादाला बघायला. त्यो ब्येस हाय ना, मग मी जाते आता.'' आई म्हणाली, ""आल्यासारखी दोन दिवस राहा आता.'' चार-पाच तासांनी रत्नागिरीवरून एका स्नेह्यांचा दूरध्वनी आला- "तुमच्या मुलाच्या एसटी बसचा पहाटे आंबा घाटात अपघात झाला आहे. पायाला मार लागला आहे; पण बाकी तो सुरक्षित आहे.' आजीला झालेला दृष्टान्त आठवला की अजूनही अंगावर काटा येतो.

आज आजी नाही; पण तिची साधी, भोळीभाबडी माया अजूनपण आमच्या पाठीशी उभी आहे.

Web Title: Muktapeeth Article of Dhanwanti Mohine