लहानपणी 'तो' म्हणजे गोष्टीतला जादूगारच!

लहानपणी 'तो' गोष्टीतला जादूगारच!
लहानपणी 'तो' गोष्टीतला जादूगारच!

आतापासूनच उन्हाळ्याच्या सुटीचे वेध लागू लागले. शहरातील मुलांसाठी गावी जाणे हे आकर्षण असते. मुलांनी गावी जाण्याचा हट्ट धरला, की मोठ्यांच्या नजरेसमोर लहानपणीच्या गमतींचा अल्बम उलगडू लागतो.

अगदी लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीचे खूप आकर्षण वाटण्याची मुख्यत्वे दोन-तीन कारणे असायची. त्यातले एक म्हणजे आम्हा मुलांना आमच्या गावी कामतीला (जिल्हा - सोलापूर) जायला मिळायचे. दुसरे आकर्षण, कामतीत लक्ष्मीच्या देवळाजवळ दर दिवसाआड येणारा गारेगारवाला. कामतीतल्या चावडीत लक्ष्मीचे देऊळ होते. त्या देवळाभोवती खूप मोठा कट्टा होता. त्याला लक्ष्मीचा कट्टा म्हणत. त्या कट्ट्यावर एका डेरेदार कडुनिंबाची सावली पडायची. आम्ही तेथे खेळत असू.
अन्‌, तेवढ्यात ऐकू यायचे "है गारीऽगाऽर... गारीग्गारऽवाला... आला आला गारीग्गारऽवाला...' पाठोपाठ मोठ्या आवाजात वाजणारी मंजुळ घंटी. या भल्या थोरल्या आरोळीसरशी आम्हा पोरांचे लक्ष खेळातून पार उडून जात असे, नजरेसमोर तो पिवळाधमक, लालबुंद, केशरी गोड रस टपटपत असलेला बर्फाचा गोळा यायचा... अन्‌ आम्ही तो चाखतमाखत खातोय असे दृश्‍य मनात क्षणार्धात तरळून जाई. डोळ्यांसमोर ते रसभरे बर्फाचे रंगीत गोळे नाचायला लागले की अजिबात राहवायचे नाही... अजिबात धीर निघत नसे.

माजघरात असलेल्या आजी, आईपाशी मस्का लावावा लागे. कारण बर्फाचा गोळा आणायला त्यांच्याकडूनच पैसे मिळायचे. हळूच जाऊन आजीला लाडीगोडी लावायची. आमच्या लाडेलाड बोलण्याने आजी पटकन विरघळायची. आजीला प्रेमाने अगदी गुदमरून टाकायचे की झाले काम फत्ते. तिला आमच्या लाडीगोडी लावण्याचे कारण माहिती असायचे, पण ती तसे दाखवायची नाही. ती आमच्याकडून भरपूर लाड करून घेई. मग म्हणायची, "बाहेर गारेगारवाला आलाय ना, माहितीय मला. लबाड पोरांनो, मला फसवता काय? ' मग ती जवळचे पैसे देई.

गारेगारवाला आमची वाटच बघत बसलेला असायचा. त्याचे नेहमीचे गिऱ्हाईक होतो ना आम्ही. गारेगारवाला मध्यम वयाचा, उंच, काटकुळा, हसरा माणूस. दादू सायकलवरून हिंडून सगळीकडे गारेगार विकत असे. तो त्याची सायकल लक्ष्मीच्या कट्ट्याला टेकवून ठेवी. सायकलच्या पाठीमागे एक चौकोनी लाकडी पातळ पट्ट्यापट्ट्यांची पेटी होती. त्यात चौकोनी मोठी बर्फाची लादी. लादीच्या चारी बाजूंनी आणि खाली तळाला लाकडाचा भुस्सा भरून ठेवलेला असे. तिथेच त्या पेटीतच एका बाजूला चार-पाच रंग भरलेल्या काचेच्या उंच बाटल्या असत. पेटीतून खाली रंगीबेरंगी रस टपटपत असे. लाल, केशरी, पिवळा, हिरवा, कालाखट्टा असे त्या बाटल्यांत रंग असत. आपल्याला कसा गारेगार हवाय, ते दादूला सांगायचे म्हणजे एकरंगी की सर्वरंगी. आम्ही आयडिया करून, प्रत्येक जण एकेक रंगाचा गारेगार घेत असू आणि प्रत्येकाने आपल्यातला थोडा थोडा दुसऱ्याला खायला देत असू. त्यामुळे सगळ्या रंगांचे समाधान आम्हाला मिळत असायचे.

दादूचे गारेगार बनवणे खूप कलात्मक, देखणे असायचे. आधी तो त्याच्याजवळच्या विशिष्ट खिसणीने बर्फ खिसत असे. एका हाताने बर्फ खिसताना दुसरा हात लादीच्या त्या बाजूने धरून ठेवत असे. कारण तिकडेही थोडा चुरा पडे. त्यानंतर सगळ्या चुऱ्याचा मिळून एक मध्यम आकाराचा गोळा, तळव्याने दाबून, लाडूसारखा वळून तयार करत असे. मग त्याला एक टणक काडी खोचत असे. इथून पुढचे काम तर फारच बघण्याजोगे असे. दादू ती काडी हातात धरून, दुसऱ्या हाताने त्यावर बाटलीतले रंगीत पाणी शिंपडत असे. काही गोल गोल फिरवत त्याचे तसे बाटलीतून रंग शिंपडणे इतके भारी वाटायचे, की अहाहा... आपल्याला पण असा रंग शिडकवायला मिळाला तर काय बहर येई, असे वाटायचे. त्याचे काम पूर्ण झाले की तो प्रत्येकाच्या हातात एक एक बर्फगोळा देई. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आवडीचा रंग देताना, घ्या ओ ताई, घ्या ओ दादा... तुम्हाला पण बर्फगोळा तयार करून देतोच हां, दोन मिनिटांत... असे मिठ्ठास आवाजात सांगे.

सगळ्यांना गारेगार मिळाला की बर्फगोळ्यातला रस चाखत, अंगाला, कपड्याला माखून घेत घरी जायचो. बर्फगोळा खाताना खूप धमाल यायची. सगळ्यांची तोंडे रंगीबेरंगी होत. कुणाचा गारेगार उशिरा संपतोय यावर आमची शर्यत लागायची. पण बर्फातला रस चाखून झाला की नुसता पांढरा गोळा उरे आणि तोही विरघळू लागलेला असायचा. फारच उशिरा केला तर काडीवरून घरंगळून पडायचा. तेव्हा मग बाकीचे खोखो हसत बसत. ए, तुला गारेगार पण नीट खाता येत नाही, येडा कुठला. पुढचे दोन तास चिडवाचिडवी चालायची. या सगळ्याची खूप मजा वाटायची. त्या दिवशीचा गारेगार खाऊन झाला, की आम्ही "परवा' दिवशीची वाट बघायचो.

हा दादू गारेगारवाला आमच्यासाठी, लहानपणी जणू गोष्टीतला जादूगारच होता. बर्फगोळा खायला देऊन आम्हाला त्याच्या मागे भुलवत, नादावत, झुलवत नेणारा गोष्टीतला जादूगार...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com