‘मुक्तपीठ’ दहा वर्षांचे झाले की!

मीरा दाते
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

वाचकांना लिहिते करणे ही ‘सकाळ’ची परंपरा आहे. त्या परंपरेतीलच ‘मुक्तपीठ’च्या रूपाने वाचकांच्या सुख-दुःखांना, कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध झाले. वाचकांनी आपल्या लेखनाने ‘मुक्तपीठ’ लोकप्रिय  केले.

 

वाचकांना लिहिते करणे ही ‘सकाळ’ची परंपरा आहे. त्या परंपरेतीलच ‘मुक्तपीठ’च्या रूपाने वाचकांच्या सुख-दुःखांना, कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध झाले. वाचकांनी आपल्या लेखनाने ‘मुक्तपीठ’ लोकप्रिय  केले.

 

‘सकाळ’मधील वाचकप्रिय सदर म्हणजे मुक्तपीठ. या सदराला बघता बघता दहा वर्षे पूर्ण झाली. सर्वसामान्यांना आपल्या वेदना, दुःख, आनंद याद्वारे लिहिते करणारे, काही सामाजिक प्रश्‍नांविषयी विचार करायला लावणारे, बोलते करणारे हे सदर. या सदरामुळे सर्वसामान्य वाचक-लेखकांच्या दबलेल्या विचारांना मोकळी वाट करून दिली गेली. काही लेखांनी झुंजण्याची प्रेरणा, जगण्याची ताकद दिली. अनेक जण रोज न चुकता हे सदर वाचतातच. ‘मुक्तपीठ’च्या या व्यासपीठात व्यक्त होऊन त्यातील अनेकांना आता स्वतःची ओळख मिळाली आहे. प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी अंतर्यामी हे सर्वजण मित्ररूपाने जोडले गेलेले आहेत. म्हणून एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा साजरा केलेला वर्धापन दिन आजही स्मरणात आहे. समस्तांच्या भावभावनांशी, भावविश्‍वाशी स्पर्श करणारे अनेक पदर म्हणजेच अनेक विषयांची गुंफण आहे. विषयाचे कोणतेच बंधन नाही हे याचे वैशिष्ट्य. थोडक्‍यात, पण मोठा भावार्थ सांगितला जातो. मनाची कोंडी फोडण्याचे साधन म्हणजे मुक्तपीठ. अनेक प्रकारची माणसे टिपणारे हे व्यासपीठ आहे. आपल्या मनातले विचार व्यक्त करायला हे अगदी योग्य व्यासपीठ आहे असे वाटते. आपणही आपले विचार, मनोगत व्यक्त करावे अशी स्फूर्ती मिळाली. जगण्याची कला आत्मसात करण्याची ताकद अनेकांना मिळाली. यामध्ये आपल्या जीवनाशी निगडित अनेक विषय अनेकांनी मांडले. त्यामध्ये काही लेखांमधून तत्त्वज्ञान, आनंदाचे क्षण, दुःखद घटना, आपले घर, वाडा, वैभव, संस्कृती, संस्कार, परंपरा, समृद्धी, यश-अपयश, सल, कैफियत, मैत्री अशा अनेक विषयांवर लिहिले. कुणी प्रेमात पडतानाचे अनुभव लिहिले तर काहींनी आपली घेतली गेलेली फिरकी कबूल केली. काहींनी आईवडिलांविषयी लिहिले - प्रेम, वात्सल्य, ममता, तर काहींनी आपले जे सणवार, व्रतवैकल्य, श्रावणमास, ऋतू यावर लेखन केले; काहींनी झाडे, फळे, फुले, प्राणी, पक्षी, निसर्ग, प्रवास, परदेशवारी आदींवर आपले विचार मांडले.

 

सल, पुणेरी चिमटा, अनुभव, अल्बम, चला भटकायला, माझ्या नजरेतून, अभिमान आहे मला, कमऑन, सेकंड इनिंग यासंबंधी लिहिलेले लेख वाचनीय, बोधपर आहेत. पूनम कर्वे यांचा ‘आरोग्याचं ऑडिट कधी’ हा लेख अतिशय गाजला. कारण आजकालच्या धकाधकीच्या व गतीमान जीवनात माणूस कामात, व्यापात गुंतला आहे, कशाच्या तरी मागे धावतोय, अशावेळी तो स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, शरीराला यंत्राप्रमाणे वागवतो; पण ते अगदी चुकीचे आहे. आपणच आपलं आयुष्य बरबाद करतो, हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. या लेखावर प्रतिक्रियाही भरपूर आल्या. नोकरी, पैसा याहीपेक्षा माणूस म्हणून स्वतःकडे लक्ष देता आले पाहिजे. वयाच्या पन्नाशीत नाही तर चाळिशीनंतरच आरोग्याचे ऑडिट सुरू करावे.

 

‘पन्नाशीचा उंबरठा ओलांडताना’ हा वर्षा डवले यांचा लेख आता कुटुंबाच्या कोषातून मुक्त होऊन क्रियाशील वानप्रस्थाकडे वाटचाल करायची, स्वच्छंदी जीवन जगायचं, राहून गेलेल्या गोष्टी करायच्या याविषयी भाष्य करतो. चला भटकायला हे लेख नेहमीच आनंद देऊन जातात. सायली पानसे यांचा ‘मोकळं होण्यातलं सुख’ या लेखातून नको असताना महागड्या अनावश्‍यक वस्तूंची खरेदी, हॉटेलिंग हे सर्व टाळले तर खूप मोठे सुख मिळते हा भावार्थ पोचला.

 

‘सूर निरागस होवो’ हा मयूरा पंडित यांचा लेख अंतर्मुख करणारा होता. ‘कट्यार...’ हा संपूर्ण चित्रपट चांगल्या प्रकारे उलगडून दाखवलाच, पण जीवन समरसून जगणं आणि एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम आणि आदर व्यक्त झाला. या जीवन प्रवासात आपले सूर निरागस का असू नयेत? जगण्याच्या सुंदरतेपेक्षा अहंकार निश्‍चितच मोठा नाही. जगण्याचे हे सूर अखंड निरागस होवोत!  एका तरुण मुलीला मूत्रपिंड निकामी झालेला विकार, तरीही ती वाचनात, पुस्तकात रमते. लायब्ररी होईल एवढी पुस्तके तिच्याकडे आहेत. या परिस्थितीतही मोठ्या उमेदीने, आनंदाने ती जगते हा प्र. चिं. शेजवलकरांचा लेख खूप काही सांगून गेला. 

 

सामान्यांच्या परिघातले विषय या पुरवणीने हाताळले. पोस्टमन, रिक्षावाले, कंडक्‍टर, शिपाई, पोलिस हे या सदराचे विषय झाले. यामुळे लेखन, वाचन, संस्कृतीला मोठा आधार मिळाला, नवी ऊर्जा मिळाली. मनात गुंजन करीत असलेल्या कडू-गोड गहिऱ्या व उत्कट आठवणींना प्रकट करण्याचे सामर्थ्य दिले. सुख पचविण्याचे आणि दुःख सोसण्याचे धैर्य दिले. गतीमंद-मतीमंद मुलांना वाढवताना त्यांच्या पालकांना करावे लागलेले श्रम, प्रयत्न हे सर्व सामान्यांना उभारी देणारे आहे.

टॅग्स
फोटो गॅलरी