कठीण वाटेवरची माणुसकी

कठीण वाटेवरची माणुसकी

अंतिम श्‍वास कुठे घ्यावा, हे आधीच नियोजित असावे; पण त्यानंतरच्या कठीण वाटेवर ज्ञात-अज्ञात माणसे मदतीला उभी राहतात. मदतीचे हात समोर येतात आणि माणुसकीवरचा विश्‍वास दृढ होतो. 
 

एक सुभाषित पुन्हा पुन्हा ऐकत आले होते, ‘कठीण समय येता कोण कामास येते?’ मलाही ते इतके दिवस खरे वाटत होते; पण नुकताच असा अनुभव आला, की ‘कठीण समय येता सर्व धावोनि येती.’ कठीण वाटेवरची माणुसकी मी पाहिली, अनुभवली. सुहास सफई, त्यांची पत्नी सपना, सपनाचा भाऊ चंद्रशेखर कवी आणि त्याची पत्नी दीपा हे चौघे जण राजस्थानच्या सहलीसाठी गेले होते. अहमदाबादला उतरून ते माउंट अबू येथे गुरुशिखरचे दर्शन घेण्यासाठी निघाले. माउंट अबूला पोचल्यावर तेथील तीनशे-साडेतीनशे पायऱ्या भराभर चढून सुहास गिरीशिखरावर पोचले.

दत्तमंदिराला प्रदक्षिणा घालून आसपास पाहत त्यांनी काही फोटो घेतले. दत्तमंदिरासमोरची मोठी घंटा जोरात वाजवली. श्रीदत्तगुरूंची प्रार्थना करून वंदन केले आणि चहाच्या टपरीजवळ शांतपणे बसले. त्यांच्याबरोबरचे बाकीचे तिघेही शिखरावर पोचले होते. सुहास यांच्या चेहऱ्यावर असीम प्रसन्नता पसरलेली होती. त्यांच्याशेजारी सपनाला बसवून चंद्रशेखरने त्या दोघांचा फोटोही घेतला. 

सुहास यांच्या चेहऱ्यावरची ती प्रसन्नता केवळ दोनच मिनिटे टिकली. पाहता पाहता त्यांचा चेहरा निवर्ण झाला. आंतरिक वेदनेने पिळवटून आल्यासारखे त्यांना झाले. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना पसरत गेली आणि जोराची उलटी झाली. सर्व नियंत्रण नाहीसे झाले. गात्रे शिथिल झाली आणि त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा तीव्रतम झटका आला होता. चंद्रशेखरने त्यांना मुखावाटे श्‍वासोपचार करण्याचा प्रयत्न केला.

तेथील पर्यटकांमध्ये दोन डॉक्‍टर होते. त्यांनीही छातीवर दाब देऊन हृदयक्रिया पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. तेथे असलेल्यांपैकी कोणीतरी सॉर्बिट्रेटची गोळी देऊन पाहिली. प्रथमोपचाराचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले. तेथील गाईड भरतने कोठून तरी चादर मिळवली. तिची झोळी करून त्यात सुहासना ठेवून माउंट अबूच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले. हा मधला प्रवास एका अनोळखी व्यक्तीच्या गाडीतून झाला होता. तेथेही आफताब कुरेशी व डॉ. सरोजा यांनी तातडीने सर्व उपचारांची पराकाष्ठा केली; पण सगळे प्रयत्न विफल ठरले. 

ही दुःखद वार्ता पुण्याला कळली. नातेवाईक आले. सुहास यांचा मुलगा तेजस याच्या मित्रांनी पुढील हालचाली त्वरेने सुरू केल्या. प्रथमतः चौघांनाही विमानाने पुण्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. डॉ. सरोजा यांनी मृत्यू प्रमाणपत्र दिले. भरत गाईडच्या मदतीने चंद्रशेखरने पोलिस चौकीतून ना हरकत प्रमाणपत्र घेतले. आफताब कुरेशी यांनी अहमदाबाद विमानतळापर्यंत जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स मिळवून दिली. लेफ्टनंट कर्नल सचिन चैतन्य यांनी लष्करातील आपल्या मित्रांच्या साह्याने विमानाची तातडीची तिकिटे मिळवण्याचा प्रयत्न केला. एका विमानात दोन तिकिटे मिळाली, त्यातून सपना व दीपा पुण्याकडे निघाल्या. पुढच्या विमानातूनही तांत्रिक कारणामुळे सुहासना आणणे शक्‍य झाले नाही. तोवर सुहास यांच्या अहमदाबाद कार्यालयातील काही कर्मचारी विमानतळावर पोचले होते.

त्यांनी ॲम्ब्युलन्स मिळवली. सुहास यांचा मृतदेह घेऊन पुढचा सातशे किलोमीटरचा प्रवास चंद्रशेखर यांने एकट्याने केला. मनावर प्रचंड दडपण आलेले. दुःखाला वाट करून द्यायलाही संधी नाही. आतले कढ आतच गिळत त्याचा प्रवास चालला होता. दुसऱ्या दिवशी दुपारी ते पुण्यात पोचले.  

हा सगळा अनुभव विस्ताराने सांगितला एवढ्याचसाठी की कठीण काळात कितीतरी ओळखीचे आणि कितीतरी अनोळखीही मदतीला धावून आले. कोण कुठले कोणाचे कोण तेही धावून आले. एका गिरीशिखरावर हा अंतिम प्रवास सुरू झाला, तिथे आनंदाने दोन क्षण घालवल्यावर नंतरचा प्रवास काळजीचा, दुःखाचा, घालमेलीचा, चिंतेचा असा होता; पण या प्रत्येक क्षणी कुणी ना कुणी मदतीचा हात दिला. कठीण समयी कोणी मदतीस येत नाही, हा जुना अनुभव यापुरता तरी खोटा ठरला. कठीण वाटेवर माणुसकी भेटली. 
आणखी एक सत्य जाणवले. मनुष्यांचे इहलोकीचे कार्य संपले, की सूर्य जशी आपली किरणे संध्यासमयी आवरून घेतो, तशी निरवानिरव करण्याची बुद्धी त्याला होते. हे सनातन सत्य आहे. जिथे त्याचा अंतिम क्षण आणि शेवटचा श्‍वास नियोजित असतो, तिथे तो स्वेच्छेने नव्हे, तर ईश्‍वरेच्छेने पोचतोच. हत्ती आपली मृत्यूची जागा आधीच ठरवून ठेवतो असे म्हणतात.

माणसाचेही तसेच असावे का? तो आपल्याही नकळत आपल्या अंतिम स्थळी आपसूक पोचतो, जसा सुहास श्रीदत्तगुरूंच्या पायाशी पोचला. ईश्‍वरेच्छा बलियसी।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com