भुतांच्या भीतीचे भूत

भुतांच्या भीतीचे भूत

भुतांच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. भुते भेटल्याचे पैजेवर सांगणारी माणसे भेटतात. मग ही भुते आपल्यालाच का दिसत नाहीत? भुते असतील? नसतील! भुतांच्या भीतीचे भूत मनावर कायम आहे. 

घाटाच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याजवळ भुते आहेत हे ऐकून होतो. घाटातही भुते दिसल्याचे सांगणारी माणसे भेटली होती. भुते नाहीत आणि ती काही आपल्याला दिसणार नाहीत, हे मनात ठाम असतानाही कुठेतरी उत्सुकताही होती. त्यामुळे त्यादिवशी रात्री भुते दिसावीत ही इच्छा कुठेतरी मनात होती आणि ती दिसणार नाहीत याची खात्रीही होती. तर तो किस्सा असा - 

त्यावेळेस मी वालचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमधील कूपर इंजिनिअरिंग, सातारा रोड येथे इंजिनिअर म्हणून कामास लागलो होतो. त्यावेळेस आम्ही कंपनीच्या कॉलनीमध्येच राहात असू. आता सातारा रोड हे ठिकाण मुख्य गावापासून सुमारे वीस किलोमीटर असेल. आम्ही शक्‍यतो शनिवार-रविवारच्या सुट्टीला पुण्यास येत असू किंवा साताऱ्याला मित्राकडे जात असू. सातारा रोडहून साताऱ्याला जाण्यासाठी एस.टी. बसगाड्या होत्या. तसेच साताऱ्याहून पुण्यास येण्यासही खूप गाड्या होत्या. सातारा रोडला करमणुकीसाठी काहीही नव्हते. एका रविवारी आम्ही साताऱ्यात ‘सुभद्रा’ नाटक पाहायला निघालो. साताऱ्याकडे जाणारी शेवटची गाडी गेली होती.

मग माझा मित्र व मी भाड्याच्या सायकली घेऊन साताऱ्याला नाटक बघायला गेलो. नाटक फारच रंगले. पंडित कुमार गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांनी आपल्या गाण्याने रंगवलेले नाटक संपण्यास रात्रीचे दोन वाजले. आम्ही चौकात पोहोचलो, तेव्हा मित्र म्हणाला, ‘‘तू सातारा बस स्टॅण्डवर थांब. मी मावशीच्या घरी निरोप सांगून येतो.’’ मी लगेच बसस्टॅंडवर गेलो. तेथील कॅन्टीन रात्रभर उघडेच असते. त्यामुळे मी थोडेसे खाऊन घेतले. पण मित्राचा पत्ताच नाही. वाट पाहून पुन्हा चौकात गेलो. तेथेही मित्र दिसेना. अर्धा-पाऊण तास वाट पाहिल्यावर मी सातारा रोडला एकटाच निघालो. 

रात्र अंधारी होती. थंडीही बऱ्यापैकी होती. मधून मधून मागे वळून मित्र येतो आहे का याचा अंदाज घेत होतो. परंतु रस्त्यावर मी एकटाच व माझ्या सायकलीच्या दिव्याचा अंधुक प्रकाश. त्या मस्त हवेत नुकत्याच ऐकलेल्या गाण्याची ओळ ओठावर आली. मी मस्त गुणगुणत निघालो. रस्ता खडबडीतच होता, पण तो आता जाणवत नव्हता. काही अंतरावर एक छोटेसे गाव दिसले. काही लोक शेकोटीवर हात शेकत गप्पा मारत बसले होते. ते गाव वाठार. हा सातारा रोडकडे  जाणाराच रस्ता आहे ना, याची त्या लोकांकडे चौकशी करून घेतली. ते म्हणाले, ‘‘रस्ता बरोबर आहे. पण यापुढे जरा जपून जा. एकटेच आहात. पुढे दोन छोटेसे घाट आहेत. ओढ्यावर व घाटात तुम्हाला कदाचित भुते दिसण्याची शक्‍यता आहे.’’ 

मी पुढे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी झाडे दिसत होती. त्यांच्या वेडेवाकड्या फांद्या अतिशय चांगल्या दिसत होत्या. त्यावर कोणी बसले नाही ना यांचा मी विचार करू लागलो. आता कुमार गंधर्वांच्या गाण्यांच्या गुणगुणण्याची जागा नकळत ‘भीमरुपी’ने घेतली होती. झाडांच्या फांद्यांमागे मला तेथील प्रसिद्ध जरंडेश्वर पर्वत दिसू लागला. म्हणजे मी बराच पल्ला गाठला होता. थोड्याच वेळात मी एका छोट्या ओढ्यावरील घाटाजवळ आलो. पुन्हा मनात चलबिचल होऊ लागली. परंतु माझा आत्मविश्‍वास अढळ होता. पाहता पाहता मी तो घाट चढून वरील रस्त्यावर पोहोचलो. आता आमच्या कूपर कंपनीची कॉलनी दिसू लागली. थोड्याच वेळात मी ते छोटेसे अंतर पार करून माझ्या क्वार्टरमध्ये जाऊन पोहचलो. पहाटेचे चार वाजले होते. सायकल घरात ठेवली अन्‌ छोटीसी डुलकी घेतली. सकाळ केव्हा झाली हे कळलेच नाही.

माझ्या रुमचा पार्टनर उठला. कारण त्याची कंपनीत जाण्याची वेळ झाली होती. थोड्यात वेळात रात्री मावशीकडे गेलेला मित्र मला भेटला. मी त्याला काहीही बोललो नाही. त्यांनी त्यांची बाजू मांडली की, त्याला मावशीने ठेवून घेतले होते व त्याने सकाळी लवकर उठून कूपर गाठले होते. मी म्हणालो, ‘‘खोटे बोलू नकोस, तुला त्या भुतांची भीती वाटली म्हणून तू आला नाहीस. मी रात्रीचा सायकलचा प्रवास करून एकटा साताऱ्याहून आलो.’’ ही बातमी संपूर्ण कंपनीमध्ये पसरली. काय सांगू , प्रत्येक जण मला विचारत होता की मला खरेच कोणत्याही प्रकारची भुते दिसली नाहीत का? मी त्यांना संगितले, ‘‘मला तर भुते दिसली नाहीतच, पण त्यांनी मला पाहिले असल्यास तुम्ही त्यांनाच विचारा.’’ 

तर काय, भुते पाहायची इच्छा अजून तशीच राहिलीय. भुतांच्या भीतीचे भूत कधी उतरेल माहीत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com