बंद दरवाजा

डॉ. संजीव देशपांडे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

गावी गेलो होतो. एका घरासमोर पावले थबकली. आजूबाजूची घरे उघडी होती. पण हे मधलेच घर बंद. जुना लाकडी, रुंद दरवाजा. म्हाताऱ्या माणसासारखा. असंख्य सुरकुत्यांनी भरलेला. चौकटीला मधोमध वर लटकलेले कुलूप. तीन साखळींची कडी. उजव्या कोपऱ्यात ग्रामपंचायतीने ठोकलेला घर नंबराचा तांबटलेला बिल्ला घरातील कोणे एकेकाळच्या अस्तित्वाची साक्ष पटवत होता. बराच काळ लोटला असेल, दरवाजा रस्त्याच्या पातळीत खचलेला वाटला. एकंदरीत अख्खे घरच बसल्यासारखे दिसत होते. दरवाज्यावरती असलेली अर्धवर्तुळाकार कमान, मधल्या विटा काढून स्वस्तिक चिन्हाचा दिलेला आकार उगीच लक्ष वेधून घेत होता.

गावी गेलो होतो. एका घरासमोर पावले थबकली. आजूबाजूची घरे उघडी होती. पण हे मधलेच घर बंद. जुना लाकडी, रुंद दरवाजा. म्हाताऱ्या माणसासारखा. असंख्य सुरकुत्यांनी भरलेला. चौकटीला मधोमध वर लटकलेले कुलूप. तीन साखळींची कडी. उजव्या कोपऱ्यात ग्रामपंचायतीने ठोकलेला घर नंबराचा तांबटलेला बिल्ला घरातील कोणे एकेकाळच्या अस्तित्वाची साक्ष पटवत होता. बराच काळ लोटला असेल, दरवाजा रस्त्याच्या पातळीत खचलेला वाटला. एकंदरीत अख्खे घरच बसल्यासारखे दिसत होते. दरवाज्यावरती असलेली अर्धवर्तुळाकार कमान, मधल्या विटा काढून स्वस्तिक चिन्हाचा दिलेला आकार उगीच लक्ष वेधून घेत होता. त्याच्यावरील माती उघडी पडून त्यावर काँग्रेस गवत, कुसळे अस्ताव्यस्त पसरली होती. कावळे, चिमण्या आणि साळुंख्या छपराच्या छावणीत मुक्त विहरत होत्या.

मोठ्या ऐपतीने आणि तब्येतीने घर बांधलेले होते त्याकाळी. मूळ पुरुष कोणीतरी तालेवार असावा. पण आता हे जीर्ण रूप का बरे यावे? दरवाज्याच्या दोन्ही बाजूंस समान अंतरावर भिंतीत कोरलेल्या देवळ्या सुबक होत्या. पण आतल्या मातीची झड होऊन त्या अधिकच खोल गेल्या होत्या. पिचलेल्या, गांजलेल्या माणसाचे डोळे खोबणीत आत गेलेले दिसावेत, तशा. चौकटीच्या कोपऱ्यात अगदी दगडी भिंतीत, माती दृष्टीस न पडणाऱ्या सांदाडीत पिंपळाची हिरवीकंच काटकी डोलत होती. 

कुणाचे असेल हे घर? कोणी बांधले असेल? नांदती-गाजती घरे अशी कुलूपबंद होताना रोजच्या जगण्याच्या घाईत आपले साफ दुर्लक्ष होते. काळ सरकताना अशी घरे प्रथम आतून कोलमडत, ढासळत जातात. स्वतःची ओळख गुलदस्त्यात ठेवत मातीत मिसळतात. बाहेरचा हा ‘अक्कडबाज’ दरवाजा गतकाळच्या वैभवाची साक्ष देत आतली खळबळ न दाखवता उभा राहण्याचा कसोशीने प्रयत्न करतो.

महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गावात असे एखादे तरी घर असतेच. अशी घरे पाहताना थोडी कालवाकालव झाल्यावाचून राहत नाही. मघाशी थोडी मान वर करून आत पाहिले होते. छप्पर उडालेले, वासे आडवे, उभे तिरके पडलेले. भिंती उघड्या, आतल्या जुन्या मातीच्याच विटा, जराजर्जर माणसाच्या छातीच्या फासळ्या दिसाव्या तशा दिसल्या होत्या. उमेदीच्या काळात घराने काय काय पाहिले, उपभोगले आणि परत भोगले असेल... मी त्या घरात कल्पनेने प्रवेश करतो. मजबूत दरवाजा ओलांडून ढेलजेत. आतून दरवाज्याची मोठी कमान. उंचावर लाल आलवणात कोहळा बांधलेला. वरच्या कडीला बांधलेली पालखी सणा-उत्सवात देवाच्या पालखीचा मान या घराण्याला असलेली निशाणीच. आतून चारी बाजूला मजबूत दगडी बांधकामांवर आधारलेल्या घडीव तुळया. चारी बाजूला सोपे, मस्त शेणाने सारवलेले अंगण. दगडी बांधकामांत ठराविक अंतरावर योजलेल्या लोखंडी कड्या. एखाद्या कडीला शेळी बांधलेली. बाकीची जित्राबं रानांतल्या गोठ्यात. एका सोप्यात भुईमुगांच्या वाळल्या शेंगांनी गच्च भरलेली पोती. ज्वारी, गहू, बाजरी, कडधान्यांनी भरलेली पोती. खात्यापित्या घराची साक्ष देणारे हे सारे वैभव! पायऱ्या चढून सोप्यावर येतो. मागे ढेलजेत आरामखुर्चीवर रेलून बसलेले, दोन्ही हात ताणून खुर्चीच्या मागे नेलेले आणि आल्या गेल्यांशी शिळोप्याच्या गप्पा मारणारे आजोबा. चारी सोप्यात मोठमोठ्या गोल लाकडी खुंट्या, त्यांना अडकवलेले दोरखंड, सदरे, पैरण्या त्यावर ठेवलेला जुना, पण चकाकता कोशा पटका, एखाद्या खुंटीला झळकणारे सर्जा-राजाचे गळ्यातील घुंगरांचे चामडी पट्टे; खास बेंदरांसाठी राखीव म्हणून ठेवलेले. लुगड्यांची वळी असा सर्व उघडावाघडा ऐवज! परत भिंतीतील देवळ्या, त्यात बॅटऱ्या, चंच्या, तंबाखूच्या पितळी डब्या, सुया, दाभणे, शेतीची अवजारे. सोप्याच्या चारी बाजूला खोल्या. मधली मोठी खोली स्वयंपाक घराची. सारवलेली. भिंतींवर चुन्याने रेखलेली शुभचिन्हे! स्वयंपाक घरात कडेला अखंडपणे ढणढणत असलेली चूल. अंधारात सुद्धा पांढऱ्या राखेत निजलेला लालभडक विस्तव डोळे वटारायचा. चुलीचा ताबा विभागून, आलटून पालटून सूनबाईंकडे. वाईलावर चहाचा टोप नित्याचा. मामंजीना घोटभर चहाची तल्लफ सदोदीत. चुलीवर डाळीचे आधण, तर कधी तव्यावर भाकरी चढवलेली, एक भाकरी बाहेर ओढलेल्या निखाऱ्याशी उभी, पार पूर्ण पाफडा सुटेपर्यंत. बरोबर एक काटवटीमध्ये तयार होण्यात दंग.

खरपूसपणाची चव चुलीबरोबर लुप्त होऊन गेली. सैपाक घराला आडोसा म्हणून उभ्या केलेल्या कणग्या, कोथळ्यात रोजच्यासाठी लागणारे धान्य. बुडाशी धान्य काढायला हात जाईल एवढी भोकें, धान्य काढून परत कापडी बोळ्यांनी ती झाकून ठेवता येत. शेती हाच मुख्य धर्म, तोच जगण्याचा मंत्र, कधीतरी, काहीतरी खुट्टं झाले. चालत्या गाडीला खीळ बसली. सलग दुष्काळाचा फेरा येतो. घडी विस्कटली. थोडा शिकलेला भाऊ शहराच्या वाटेने गेला. एका गाफील क्षणी फसगत झाली. माणसे दुरावली.. हळूहळू धूळ, जळमटे साचू लागली आणि घर रुतत गेले.  पिंपळपानांची झुलणारी, हिरवी, तांबूस पाने आशा जागवत राहतात. इतकेच.

Web Title: muktpeeth article dr. sanjeev deshpande