डाइव्ह विथ ‘शार्क’

Jayprakash-Pradhan
Jayprakash-Pradhan

शार्क म्हणजे समुद्री राक्षसच, त्याच्याबरोबर पोहायचे ही कल्पनाही दडपण आणणारी. पण तुम्ही तसे करू शकता.

खऱ्याखुऱ्या शार्क माशांसोबत पाण्यात डाइव्ह मारणे, पोहणे ही कल्पना कशी काय वाटते? ...अशक्‍य! पण स्पेनमधील बॅलेॲटिक आयलंडमधील जगप्रसिद्ध ‘मायोकी’ बेटावर हे शक्‍य झाले आहे. ‘पाल्मा’ हे अतिशय सुंदर शहर मायोकी बेटाचे प्रवेशद्वार मानण्यात येते. पाल्माचे क्षेत्रफळ २१,३५५ हेक्‍टर्स व लोकसंख्या अवघी चार लाख. पण ब्रिटन, युरोप, अमेरिका येथून दरवर्षी निदान एक ते सव्वा कोटी पर्यटक पाल्माला भेट देत असतात. मी व माझी पत्नी जयंती हिने या बेटावर चांगली आठवड्याची भटकंती केली. 

‘पाल्मा ॲक्वोरियम’ हा युरोपमधला सगळ्यात खोल, निळ्याशार पाण्याचा शार्क टॅंक येथे बांधण्यात आलाय. त्याची लांबी तेहतीस मीटर्स, रुंदी पंचवीस मीटर्स व खोली साडेआठ मीटर्स आहे. या टॅंकमध्ये पस्तीस लाख लिटर्स खारे पाणी असून, त्यात प्रत्येकी अडीच मीटर्स लांबीचे सहा ‘सॅंड टायगर’ व चार ‘सॅंडबार’ शार्क्‍स मासे आहेत. तुमच्याजवळ डायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही या टॅंकमध्ये डाइव्ह मारून निळ्याशार पाण्याच्या भव्यदिव्य टॅंकच्या तळाशी जाऊन या शार्क माशांबरोबर चक्क विहार करू शकता. तुम्हाला डाइव्ह मारायला आवडते, पण तुमच्याकडे लायसन नसेल तरी काळजीचे कारण नाही. तुम्हाला डाइव्ह मारण्याचे प्रशिक्षण तिथे दिले जाते आणि मग तज्ज्ञ शिक्षकांच्या साह्याने तुम्ही पोहू शकता. टॅंकमध्ये साडेचार मीटर खोलीपर्यंत तुम्हाला नेण्यात येते. पाल्मा ॲक्वेरियम हा जगातला एक उत्कृष्ट मरिन पार्क म्हणून ओळखला जातो. अनेक महासागर, समुद्र यातील प्राणी, वनस्पती, वैशिष्ट्ये तुम्ही येथे पाहू शकता. या टॅंकमध्ये डाइव्ह मारण्याची इच्छा वयोमानानुसार राहिलेली नव्हती. पण आमच्यासारख्याच दुसराही एक अनोखा अनुभव तेथे अनुभवाला आला. डाइव्ह विथ शार्क ॲक्‍वेरियमला लागूनच एक झकास रेस्टॉरंट आहे. मी व जयंतीने तेथे बसून वाइन व फिशवर मस्त ताव मारला. जणू बाजूलाच असलेल्या शार्क माशांच्या सहवासात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com