जीव वाचला! वाचला!

जीव वाचला! वाचला!

काही आठवड्यांपूर्वीची गोष्ट. अमेरिकेतील एका शहरात संध्याकाळी चालायला बाहेर पडलो. थंडीचे दिवस असल्याने दिवस लवकर मावळतो. उबदार कपडे घालून एका लांब चढण असलेल्या रस्त्याकडेने चालत होतो.

माझ्या मागून एक तरुण त्याच्या हातात साखळीने बांधलेले दोन कुत्रे धरून धावत पुढे निघून गेला. चढ चढून वर पोचल्यावर पुढे गेलेला तरुण रस्त्याकडेला बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याच्यापासून दहा फुटांवर दोन्ही कुत्रे मृतावस्थेत पडले होते. एक उंच सडपातळ तरुण मोटार कडेला लावून उभा होता. गाडीवरील उडालेल्या रक्तावरून बहुदा त्याच्या हातूनच अपघात घडला असावा. अवघ्या चारच मिनिटांत तिथे रुग्णवाहिका आणि पोलिस पोचले. शेजारीच असलेल्या गृहप्रकल्पातून जाणाऱ्या पर्यायी मार्गावरून रहदारी सांभाळण्यात पोलिस गर्क झाले. 

मला जास्तच घुटमळताना पाहून पोलिस अधिकारी माझ्यापाशी आला. मी अपघात पाहिला नव्हता; पण चढावर माझ्याजवळूनच तो तरुण पुढे गेल्याचे मी सांगितले. त्या तरुणाने कुत्र्यांना साखळीने व्यवस्थित बांधले असल्याचेही सांगितले. नंतर मी पर्यायी रस्त्यावरून चालू लागलो. मला खूप मोठी पायपीट पडणार होती. चालत मैलभर अंतर गेलो असेन, तेवढ्यात मागून एक मोटार माझ्याजवळ येऊन थांबली. गाडीत साधारण साठ वर्षांची स्त्री चालक होती. तिने मला मुख्य रस्त्यावर सोडू का? असे विचारले. मीही होकार देत गाडीत बसलो. तिचे नाव किम होते. माझी विचारपूस करत असताना ती मधूनच तोंडाला एक स्प्रे लावून त्यातले औषध ओढत होती. ती दम्याची रुग्ण असल्याचे स्पष्ट होते. थोड्या वेळातच आम्ही एका मोठ्या माळरानावर पोचलो. पुढे जाऊन हाच रस्ता दूरवर फिरून मुख्य रस्त्याला लागताना दिसत होता. 

आम्ही एकमेकांशी व्यवसाय, तंदुरुस्ती यावर गप्पा मारत साधारण दोन मैल पुढे गेलो असू. अचानक गाडीचा वेग कमी होत गाडी रस्ता सोडून माळरानावरच्या गवतात शिरली. मोकळ्या जागेत अडखळत थांबली. किमने हातवारे करत तिच्या छातीत प्रचंड दुखतेय व लगेच ९११ क्रमांकाला (रुग्णवाहिकेला) फोन करण्याचा इशारा केला. खिडकीच्या बाजूस कोसळली.

माझ्या फोनवर रेंजच नव्हती. मी किमच्या प्रथमोपचारासाठी धडपड करू लागलो. श्वास चालू होता; पण शरीर मधूनच झटके देत होते. मी गाडीबाहेर उतरून किमचा कार सेफ्टी बेल्ट काढला. किमचा फोन नजरेस पडला; पण तो स्क्रीन लॉक होता. मी सरळ रस्त्याच्या दिशेने धावत सुटलो. अंधार पडायला सुरवात झाली होती. रस्त्यावरील वाहनांना हातवारे करत होतो; पण एकांतातल्या रस्त्यावर कोणी प्रतिसाद देत नव्हते. शेवटी रस्त्यावर पोचून सरळ समोरून येणारी एक गाडी अडवली. त्यात बसलेले वृद्ध जोडपे घाबरून थांबले. बहुदा त्यांना मी लुटणार असल्याचे वाटले असावे. झालेला प्रकार सांगितल्यावर पटकन त्यांनी ९११ ला संपर्क साधला. अत्यावश्‍यक सेवेची गरज असल्याचे कळवले. त्यांच्या गाडीतून आम्ही किमच्या दिशेने निघालो.

आमच्या पाठोपाठ जोरजोराने सायरन ऐकू येऊ लागले. मिट्ट काळोखात माळरानावर असल्यामुळे गाडीचे दिवे आम्ही चालूच ठेवले. किम त्याच अवस्थेत खिडकीच्या काचेला टेकून होती. ‘डिझास्टर इंटेन्सिव्ह केअर ॲम्ब्युलन्स’ तिथे पोचली. थोड्याच वेळात आकाशात हेलिकॉप्टर आले. वरून प्रकाशझोत सोडण्यात आला. दरम्यान, पॅरामेडिकल्स किमला प्रथमोपचार करू लागले. ॲम्ब्युलन्समध्ये अद्ययावत उपकरणे होती. किमला कृत्रिम श्वास अणि हृदय यंत्रणेवर ठेवून जीवदान मिळाले होते. आम्हा तिघांना अतिदक्षता सेवेच्या कर्मचाऱ्यांनी धन्यवाद दिले.  

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच लांब चढण असलेल्या रस्त्यावर चालायला गेलो, तर काल अपघात झालेल्या ठिकाणी वाहनचालकांसाठी सावधानचिन्ह उभे करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com