फास्ट फॉरवर्ड

Mrunalini-Bhanage
Mrunalini-Bhanage

फास्ट फॉरवर्ड जीवनशैलीमुळे असमाधान वाढते आहे. त्यामुळे आपल्यासमोर उभे राहणारे प्रश्‍न उत्तर न शोधता डिलिट करण्यासारखे नाहीत. 

माझा सहा वर्षांचा नातू आयपॅडवर ‘टॉम अँड जेरी’ बघत होता. थोडा भाग बघून झाल्यावर मला म्हणाला, ‘‘आजी, आता याचा कंटाळा आला. आपण आता हे फास्ट फॉरवर्ड करूया.’’ मध्यंतरी आम्ही कुठल्या तरी चित्रपटाला गेलो होतो. माझी मोठी नात बरोबर होती. कुठेतरी तिला कंटाळा यायला लागला. म्हणून ती म्हणाली, ‘‘इथेही फास्ट फॉरवर्ड करायची सोय पाहिजे होती.’’ 

कॅसेट व टेपरेकॉर्डर वापरायला लागल्यापासून न आवडते गाणे किंवा गोष्ट वगळून कॅसेट फास्ट फॉरवर्ड करून पुढे जायची सवयच झाली आहे. काही वेळा आपल्यालाही हे फास्ट फॉरवर्ड झाले तर बरे झाले असते, असे वाटते. उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्या कार्यक्रमातील वक्‍त्याची ओळख किंवा समारोपाचे भाषण, रटाळपणा आला की फास्ट फॉरवर्ड आठवतेच. 

कधी भीती वाटते की आपली सहनशक्ती कमी होत चालली आहे की काय? एखादी घटना ऐकतानाही आपण म्हणतो, पुढे काय शेवट आहे सांगा ना. मन स्थिर ठेवून दुसऱ्याचे ऐकून घेण्याची सवय कमी होत आहे. लहानपणी समज आल्यावर ताईला मिळणाऱ्या सवलती पाहून मलाही वाटायचे की, मी कधी मोठी होईन व ताईसारखी मजा करीन. पुढे शिक्षण कधी संपते व नोकरी कधी लागते. तेथेही पुढची पोस्ट कधी मिळते, असे वाटे. कधी मला वाटते, आयुष्य कधी फास्ट फॉरवर्ड होते, असा वाटण्याचा प्रकार असावा.

भराभर मधले टप्पे उरकताना त्यात कधी त्रुटी राहत असतील. सगळीच घाई. यातूनच एखादी नवीन बांधकाम चालू असलेली इमारत तर कोसळत नसेल? घाईमुळे शिक्षणातही मूलभूत गोष्टी पक्‍क्‍या न रुजवता पुढे जाण्याची घाई. बी जर व्यवस्थित रुजले नाही, तर रोप बळकट कसे होणार? त्याची स्थित्यंतरे पाहण्यासाठी आपली तयारी नाही. फळे-भाज्या लवकर पिकाव्यात म्हणून त्याला घालण्यात येणारी खते-रसायने हा पण फास्ट फॉरवर्डचाच प्रकार नाही का? झाडावर पिकलेल्या आंब्याची चव बळेबळे पिकवलेल्या आंब्याला नाही. 

‘धीर धरी रे, धीरापोटी असती मोठी फळे गोमटी’ हे आपण विसरत चाललो आहोत. पुढे धावण्याच्या नादात बाल्य विसरत चालले आहे. जे अनुभव तरुणपणी आनंदाने घ्यायचे, ते बारा-चौदा वर्षांच्या नकळत्या वयात घेण्याची घाई झाली आहे. विज्ञानाने खूप सुखसोयी दिल्या आहेत; परंतु त्यामुळे आपण व पुढची पिढी त्यात वाहवत जात आहे. अजून पुढे, अजून पुढे काय, अशी ओढ निर्माण झाली आहे. 

पुढे तर जात आहोत; पण त्यात तरी समाधानी आहोत का? शांत चित्ताने विचार करण्याइतकी पण आपल्याला सवड नाही. 

शेवटी हे सारे असेच फास्ट फॉरवर्ड करीत आपण कुठेतरी ठेचकाळणार तर नाही ना? असंख्य प्रश्‍नांचे जाळे समोर उभे राहते ते दुर्लक्ष करून, उत्तरे न शोधता डिलीट करण्यासारखे खासच नाही.

‘मुक्तपीठ’च्या लेखकांसाठी...
आपले विविध क्षेत्रांतील अनुभव ६०० शब्दांत पाठवू शकता. लेखाच्या सुरवातीस किंवा अखेरीस आपले नाव व संपर्क क्रमांक लिहिण्यास विसरू नका.

दोन ओळींमध्ये पुरेसे अंतर सोडून लिहा. 

आपले छायाचित्र पाठवाच. त्यामागे आपले नाव लिहिण्यास विसरू नका. नाव लिहिताना मागची शाई छायाचित्रातील चेहऱ्यावर उमटणार नाही, याची काळजी घ्या. लेख असलेल्या कागदावर छायाचित्र चिकटवू नका. छायाचित्र काढून घेताना कागद फाटतो. छायाचित्रही खराब होते.   

संगणकावर युनिकोडमध्ये लेख लिहिल्यास तो पाठवावा; अन्यथा पीडीएफ करून पाठवा. सोबत जेपीजे प्रकारात छायाचित्र पाठवा. 

पाकिटावर ‘मुक्तपीठ’साठी असे ठळक लिहा. मेल करणार असल्यास ‘सब्जेक्‍ट’च्या जागी ‘मुक्तपीठ’ असे लिहा.

पाकिट चिकटवताना आतील लेखाचे कागद पाकिटाला चिकटणार नाही, याची काळजी घ्या; अन्यथा हे कागद फाटल्याने लेख वाचणे शक्‍य होत नाही. 

ई-मेल -  editor@esakal.com
संपर्क - संपादक ‘सकाळ’, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११ ००२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com