पधारो म्हारे देस...

पधारो म्हारे देस...

‘पधारो म्हारे देस...’ असे म्हणत फुलांच्या माळा घालून, कुंकूम तिलक लावून, औक्षण करीत राजस्थानात आमचे जंगी स्वागत झाले. ड्युनमधली उंटावरची सफर, राजेशाही आसनव्यवस्था, समोर नृत्य, त्यात सर्वांचा सहभाग, नंतर शाहीभोजन आणि तंबूतला मुक्काम यामुळे मनात नवचैतन्य निर्माण झाले. गुलाबी वैभवात नटलेली जयपूरची प्रत्येक इमारत डोळ्यांच्या वाटेने मनात कोरली गेली. चित्तोडगडच्या जोहराच्या कथा ऐकून मन विदीर्ण झाले. 

उदयपूरचे प्रस्थ निराळेच! इथल्या उत्तुंग आणि धवल पराक्रमाच्या साक्षीदार असलेल्या वास्तूदेखील पांढऱ्या स्वच्छ संगमरवराने घडवलेल्या. त्यावरची कलाकुसर तर अप्रतिम! महाराणा प्रताप यांचे दर्शन घेऊन स्वातंत्र्याचा प्रकाश दाखवल्याबद्दल त्यांचे मनोमन आभार मानले आणि ‘सहेलियों की बाडी’ जणू आपल्याचसाठी बनवली आहे, अशा आविर्भावात पाहिली. जगतविख्यात पपेट-शोमुळे आमच्यातले लहान मूल जागे झाले. जगप्रसिद्ध दिलवाडा मंदिराची कलाकुसर पाहून त्या कलाकारांना नकळत सलाम केला. गुरुशिखरावरून अनुभवलेला सूर्यास्त आणि त्यानंतर आकाशात दिसणाऱ्या अगणित रंगाच्या छटा ही आनंदाची परिसीमा होती.

माउंट अबूला पोचल्यापासून आमचे परतीच्या प्रवासाचे नियोजन चालू होते. अक्षरधाम मंदिर पाहण्यासाठी वेळ मिळावा म्हणून आम्ही अहमदाबादवरून रात्रीचे फ्लाईट घेतले होते; परंतु सोमवारी अक्षरधाम बंद असते, हे कळल्यावर आमचा विरस झाला; पण आम्ही कुंभळगड व राणकपूरचं मंदिर पाहायचे ठरवले. जीपीएसवरून अंतराचा अंदाज घेतला, तवेरा ठरवली. गाडीवानाच्या सूचनेनुसार सर्वांना टाटा करून सकाळी सात वाजता निघालो.

टूर लीडर निरंजनने नाश्‍ता व जेवण पॅक करून दिले. अकरा वाजता राणकपूरला गाईडबरोबर फिरून सर्व दिशांनी ते नितांत सुंदर मंदिर पाहिले; पण फोटोग्राफीला बारानंतर परवानगी होती. त्यामुळे पुन्हा फोटोसाठी तेवढाच वेळ लागला. कुंभळगडची सत्तावीस किलोमीटरची तटबंदी चीनच्या भिंतीनंतर स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. याच्यावरून एका वेळी चार घोडे धावत. हे सर्व पाहून साधारण अडीच वाजता आम्ही अहमदाबादकडे निघालो. खराब रस्ता, धूळ, खड्डे आणि छोटी खेडी दिसत होती. फारशी वाहनेही नव्हती. आम्हीच हौसेने आडमार्गावरचे ठिकाण पाहायला आलो होतो. वेळ कमी व प्रवास जास्त असल्याने आम्ही गाडीतच पराठे खाल्ले. हायवेला अहमदाबादच्या ऐवजी उलट दिशेला जातोय हे वेळीच लक्षात आल्यामुळे फार बरे झाले. आता ड्रायव्हरला ब्रेक देणे गरजेचे होते, म्हणून चहासाठी थांबलो. एवढ्यात फ्लाईट री-शेड्युल झाल्याचा मेसेज आला. सगळेच थोडे सैलावले. त्या आनंदात की काय कोण जाणे, आम्ही उदयपूरच्या बायपासने जाण्याऐवजी चुकून शहरात घुसलो. त्या रहदारीत अर्धा-पाऊण तास गेला. उदयपूरपासून हायवेवर ट्रकांची रांग असते, हे ड्रायव्हरने आधीच सांगितले होते. अंतर आणि वेळेचा मेळ घालण्याचा आता ताण येऊ लागला; पण ड्रायव्हर मात्र निवांत वाटत होता. त्याचे घड्याळ चक्क एक तास मागे होते, हे जेव्हा त्याला कळले, तेव्हा त्याचेही धाबे दणाणले. ट्रकच्या बाजूच्या कच्च्या रस्त्यावरून तो गाडी पुढे काढत होता. सकाळपासून वाया गेलेल्या वेळेचा हिशेब मांडून झाला; पण आत्ता त्याचा काही उपयोग नव्हता. 

तेवढ्यात एक ट्रक चुकीच्या पद्धतीने समोर आल्यामुळे करकचून ब्रेक दाबून ड्रायव्हरने गाडी जागेवर थांबवली; तसे सगळ्यांचेच ठोके चुकले. दोन मिनिटे गूढ गंभीर शांतता. सगळेच चिडीचूप! कोणी अंतराच्या पाट्या आणि घड्याळाच्या काट्यांचे गणित जुळवण्याचा प्रयत्न करत होते, तर कोणी परमेश्वराची प्रार्थना करत होते.. वातावरण हलके करण्यासाठी मी म्हटले, ‘‘काळजी करू नका. आपण वेळेत पोचू. नाहीच तर जाऊ स्लीपरकोचनी!’’ ड्रायव्हरला आणि एकमेकांना आम्ही चीअर करत होतो. ड्रायव्हरही अतिशय प्रामाणिक होता. तुम्हाला सुखरूप व वेळेत पोचवेन. तुमचे तिकीट वाया जाऊ देणार नाही, असे आम्हाला आश्वस्त करत होता. दहा वाजले तरी अजून चाळीस किलोमीटर प्रवास बाकी होता. वेळेपूर्वी किमान पंधरा मिनिटे पोचलो तर कोणी काय करायचे याचा प्लॅन तयार झाला. गाडीच्या भाड्याची रक्कम तयार ठेवली. तिकिटे हातात काढून ठेवली; पण वेळ संपत चालला. आता समोर विमानतळ दिसत होता. विमान सुटायला दहा मिनिटे होती आणि आम्ही एकदाचे पोचलो. गाडी थांबताच मी व माझा मुलगा उडी मारून पळत सुटलो. बाकीच्यांनी सामान घेऊन शक्‍य तेवढ्या वेगात यायचे ठरले होते.

समोरच आमच्या विमान कंपनीचे काउंटर दिसले. तिथल्या मुलीला चेकइनबद्दल विनंती करू लागलो, तेव्हा ती गोड हसून म्हणाली, ‘‘रिलॅक्‍स, फ्लाइट साडे ग्यारह बजे रिशेड्युल हुई है. आपका बोर्डिंग आराम से हो जाएगा.’’
हुश्‍शऽऽ! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com