अविस्मरणीय स्नेहसंमेलन...!

रोहिणी भागवत
सोमवार, 28 मे 2018

कधी-कधी कोणाचीही चूक नसताना बिकट प्रसंगाला सामोरे जावे लागते. अशावेळी धैर्याने निर्णय घेत मार्गक्रमण करणे आवश्‍यक असते.

कधी-कधी कोणाचीही चूक नसताना बिकट प्रसंगाला सामोरे जावे लागते. अशावेळी धैर्याने निर्णय घेत मार्गक्रमण करणे आवश्‍यक असते.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आहे. आम्ही तेव्हा तिनसुकीयाला (आसाममध्ये) राहत होतो. मुलांची शाळा तेथून २०-२२ किलोमीटर अंतरावर दिनजान येथे होती. शाळेच्या स्नेहसंमेलनात दोन्ही मुलांनी भाग घेतला होता. मुलगी ४ थीत व मुलगा ५वी मध्ये शिकत होते. यांना वेळ नसल्याने मी एकटीच कार्यक्रमाला जाणार होते व रात्री हे आम्हाला न्यायला येणार होते. आपापल्या मुलांना नेण्याची पालकांची लगबग सुरू झाली. काही पालकांनी लिफ्टबाबत विचारले, पण हे येणार असल्याचे सांगून मी नकार दिला. शाळेचा शिपाई हॉलचे दिवे, पंखे, दारे, खिडक्‍या इत्यादी सर्व बंद करीत बाहेर आला. आम्हाला तिघांनाच बाहेर उभे पाहून त्याने कारण विचारले व अशा एकट्या किती वेळ बाहेर थांबणार असे विचारले. तो घरी जायला निघाला होता. शाळा अगदी निर्जन ठिकाणी जंगलात होती. थोडा विचार करून त्याने पुढे चौकी असल्याचे सांगितले. आम्हाला चौकीवर सोडून शिपाई घरी निघून गेला. त्या वेळी मोबाईलची सोय नव्हती. पहारेकऱ्याला मी सर्व हकिगत सांगितली व हे येईपर्यंत चौकीवर थांबण्याबद्दल विचारले. त्याने आमची अडचण ओळखून हो म्हटले. या बिकट प्रसंगातून मार्ग कसा काढणार कळत नव्हते. मुलंही थकलेली असल्याने भुकेली होती. 

मनात अनेक शंका येत होत्या. थोड्या अंतरावर महामार्ग असल्याचे मला माहिती असल्याने शेवटी मी पुढे जाण्याचे ठरवले. पहारेकऱ्याला यांचे नाव, रंग, रूप, बाईकचा नंबर आदी देऊन आम्ही पुढे महामार्गावर त्यांची वाट पाहत असल्याचे सांगितले. खूप हिमतीने निर्णय घेत आम्ही वाटचाल सुरू केली. मनात देवाचे नाव घेतच चाललो होतो. चिटपाखरूही नसलेल्या एकाकी रस्त्यावरून रात्रीच्या वेळी जाताना लवकरात लवकर घरी पोचण्याचा विचारच फक्त मनात होता. हा संपूर्ण भाग सैन्यदलाच्या ताब्यात असल्याने त्यांच्या गाड्यांची अधून मधून ये-जा होती. त्यांना थांबण्यासाठी हात दाखवला तर न थांबताच ट्रक्‍स, वाहने पुढे निघून जात होती. कारण त्यात सामान भरलेले असायचे. अशीच १५-२० मिनिटे वाट पाहण्यात गेली. शेवटी एक व्हॅन थांबली. त्यातील सैनिकांना मी सर्व परिस्थिती सांगितली. 

माझी अडचण ऐकून त्यांनी आम्हाला व्हॅनमध्ये बसवले. ती व्हॅन आमच्या घराच्या दिशेनेच जात होती. मागच्या बाजूला आम्ही बसल्यावर जरा हुश्‍श वाटले. मधूनच एखादी बाईक वेगाने जाताना दिसली की यांची तर नाही ना? अशी शंका मनात येई. पण अंधारामुळे व आमची व्हॅनपण वेगात असल्याने दिसत नव्हते. कधी घर येते याची वाट बघत होते. अर्धा तासाच्या प्रवासानंतर शहराचे दिवे, आमची वाडी दिसू लागली. मनात हायसे वाटले. सैनिकांना धन्यवाद दिले. आम्ही सुखरूप घरी पोचेपर्यंत रात्रीचे बारा वाजून गेले होते. 

घरी आल्यावर हे न दिसल्याने मला काळजी वाटू लागली. शेवटी १५-२० मिनिटांनंतर हे पण घरी आले. आम्हाला सुखरूप पाहून यांच्या पण जिवात जीव आला. माझे मनही शांत झाले. आम्हाला घेण्यासाठी पती ठरल्याप्रमाणे वेळेवरच घरून निघाले होते. थोडे अंतर जाताच गाडी पंक्‍चर झाली. पंक्‍चर काढून पुढे निघाले. पण त्या दिवशी यांचे ग्रह बरोबर नव्हते. थोड्या वेळाने दुसऱ्यांदा गाडी पंक्‍चर झाली. रात्र झाल्याने पंक्‍चरवाले घरी गेलेले होते.

अंधारात इतर दुकानेही बंद दिसत होती. रस्त्यावर चौकशी तरी कशी करणार. कारण रस्ता निर्मनुष्य होता. शाळेत पोचायला उशीर होत असल्याचे यांच्या पण लक्षात येत होते. शेवटी गाडी ढकलत न्यायची ठरली व ते धूड ढकलत नेताना यांची दमछाक झाली होती. शेवटी एकदाचे दुकान दिसले व पुन्हा दुसऱ्यांदा पंक्‍चर काढल्यानंतर दिनजानला निघाले. तेथील चौकीवर पोचल्यावर यांना पहारेकऱ्याने सर्व सांगितले व तुमचे घरचे सर्वजण पोचले असतील असे म्हणाला. मी पण यांना आम्ही कसे आलोत हे सविस्तर सांगितले. कधी कधी कोणाचीही चूक नसताना विचित्र परिस्थितीला तोंड द्यावे लागते. आपल्या धीराची कसोटी लागते आणि त्यातूनच आपल्याला मार्ग काढावा लागतो. त्या वेळी फोनही सर्वांकडे नसायचे. बरे रात्रीच्या वेळेस सुनसान जंगलात मनुष्यांची वस्ती नाही. अशा वेळी देवावर श्रद्धा ठेवून मार्ग सुचला तसे केले गेले. नशिबाने पहारेकरी आणि व्हॅनमधले सैनिकांची आम्हाला मदत मिळाली. अशा रीतीने एका मोठ्या दिव्यातून आम्ही सुखरूपपणे पार पडलो. त्यामुळे हे स्नेहसंमेलन आमच्यासाठी अगदी अविस्मरणीय ठरले.

Web Title: muktpeeth article rohini bhagwat