Surekha-Jog
Surekha-Jog

घोळ शब्दांचा

अक्षरांचा घोळ झाल्यावर किती फजिती होते, गमतीशीर विनोद घडतात, नाही? आपल्याबाबतीत, आसपास अशा काही गमती-जमती घडून गेल्या असतील. आठवल्या तरी आता हसू फुलवणाऱ्या...

माझे पती, प्रा. सुहास जोग यांचे संपूर्ण आयुष्य त्यांचे विद्यार्थी व पक्षिप्रेम 
 यांच्यामध्ये गुंतले होते. त्यांना अतिशय जलद व शब्दांचे संक्षिप्तीकरण करीत बोलायची सवय होती. विद्यार्थ्यांना मात्र ते सावकाश व पूर्ण शिकवायचे. एकदा काय झाले, जोगसर मयूर कॉलनीतील शाळेत होते.

त्यांचा मला दुपारी एक वाजता घरी फोन आला, की ‘अग, काका-काकू येणार आहेत. त्यांचे व्यवस्थित कर. मी येतोच आहे.’ मी विचार केला, की खूप दिवसांनी काका-काकू जेवायला येणार आहेत, चांगला बेत करू. श्रीखंड-पुरी, वरण-भात, भाजी, चटणी, कोशिंबीर असा झकास बेत केला. दोन वाजले, तीन वाजले तरी काका-काकूंचा पत्ताच नाही. म्हणून मी सरांना फोन लावला. सर म्हणाले, ‘‘अग, ते मगाशीच आले. पिंजऱ्यातसुद्धा सोडले त्यांना !’’ मला एक मिनीट काहीच कळेना. मग त्यांनीच सांगितले, की काकाकुवाची जोडी मगाशीच पोचली. मी डोक्‍याला हात मारला. साधारण सहा महिन्यांनी सरांचा असाच दुपारी दीड वाजता फोन आला, ‘‘अग काका...’’, त्यांचे वाक्‍य पूर्ण व्हायच्या आतच मी सांगून टाकले, ‘‘पुढचे काही बोलू नका. आता मी करीन हो व्यवस्थित !’’ मी मनाशी ठरवले, या खेपेला माझी काही फजिती होणार नाही. मग मी वॉचमनकडून ‘त्यांची’ खाण्या-पिण्याची जय्यत तयारी केली. सर बरोबर दोन वाजता आले. बाहेरून ओरडतच आले, ‘‘अग, झालं का जेवण? काय केलेय आज स्पेशल?’’ आले ते थेट स्वयंपाकघरात. एका ताटात दूध-पाव, दुसऱ्या ताटात चिरलेली फळे पाहून म्हणाले, ‘‘अग, हे जेवण आहे का काका-काकूंसाठी?’’ मी म्हणाले, ‘‘मला वाटले, काकाकुवा आणणार आहात. म्हणून...’’ आज माझी काका-काकूंसमोर पुरती फजिती झाली. 

शाळेचे स्नेहसंमेलन होते. पुष्कर पाच वर्षांचा होता. त्याचा ब्रेकडान्स ठेवला होता. सर संमेलनात होते. मला म्हणाले, ‘‘पुष्करला तयार करून ठेव.’’ मी पुष्करला तयार करून त्यांना फोन लावला, ‘‘पुष्करचा डान्स कधी ठेवलाय?’’ ते म्हणाले, ‘‘भरत नाट्यमध्ये आहे. तू पंधरा मिनिटांनी ये.’’ कार्यक्रमाची सुरवात गणेशवंदना भरतनाट्यमपासून सुरू होते. मला वाटले, पुष्करचा डान्स त्यानंतर पंधरा मिनिटांनी असेल. मी टिळक स्मारकमध्ये गेले.

दारावरच्या वॉचमनने मला व पुष्करला आत सोडले. आत दुसऱ्याच शाळेचे संमेलन चालू होते. मग लक्षात आले, की भरत नाट्य नृत्य नाही, तर भरत नाट्यमंदिर. मग मी पुष्करला घेऊन भरत नाट्यमंदिरात गेले. सर म्हणाले, ‘‘त्याला तयार करायला एवढा उशीर लागतो का ?’’ पुष्करचा डान्स बाजूलाच. इकडून-तिकडून मलाच नाचावे लागले. तिथे पोचेपर्यंत कार्यक्रमही संपला होता. 

सर नेहमी विद्यार्थ्यांसाठी भेळ व चहा मागवायचे. विद्यार्थ्यांचे लाड करायला त्यांना खूप आवडायचे. आम्ही नुकतेच क्‍लासपासून दुसरीकडे राहायला गेलो होतो. माझा तिथे वेळही जायचा नाही. मला लहर आली. बघू यांना फोन करून एखादा. मी म्हटले, ‘अहो, माझा वेळ जात नाही.’ ते अतिशय प्रेमाने म्हणाले, की थांब माने वॉचमनला पाठवतो. मला वाटले, की लेक्‍चर संपल्यावर मला फिरायला घेऊन जाणार; पण माने आले ते चक्क हातात शंभर भेळेचे दोऱ्याने बांधलेले पुडे घेऊन. तो म्हणाला, ‘‘मॅडम, सरांनी सांगितले की सर्व भेळेचे दोरे सोडून डब्यात भरून घ्या. सर्व दोरे एकत्र करून एक मोठे रिळ करायला सांगितले आहे.’’ त्या वेळी सरांचा मला खूप राग आला. मनात आले, की या कामाला वॉचमन नाहीत का ? मला ते दोरे सोडून रीळ करायला दोन तास लागले. घरी आल्यावर सर म्हणाले, ‘‘गेला ना वेळ ? मला कंटाळा आला, माझा वेळ जात नाही, ही वाक्‍ये आपल्या शब्दकोशात असता नयेत.’’ त्या नंतर दोन दिवसांनी सण आला आणि झेंडूची तोरणे सकाळी साडेसहाच्या आतच सर्व शाळेत बांधायची होती. वॉचमन मंडळी सकाळीच एवढे मोठे झेंडूचे पोते घेऊन हार करायला बसली. तेव्हा वॉचमनच्या लक्षात आले, की हार करायला दोराच नाही आणि दुकाने अजून उघडलीच नाहीत. तेव्हा सर म्हणाले, की माझ्या बायकोने दोऱ्याची गुंडी करून ठेवली आहे ती घ्या. 

तेव्हा मला माझ्या कामाची खरी किंमत कळाली. कुठल्याही गोष्टीचे नियोजन ते आठ दिवस आधीच करायचे. आताच्या काळात मोबाईलवर सर्व गोष्टी विसरू नये, म्हणून ‘सेव्ह’ करतो. सर सर्व गोष्टी मनात ‘सेव्ह’ करून ठेवायचे. ते स्वतःच एक संगणक होते. त्यांच्या सहवासात माझे आयुष्य खूप छान गेले. पत्नीपेक्षा विद्यार्थी म्हणून खूप काही शिकायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com