आठवणींना नसते वार्धक्‍य (मुक्‍तपीठ)

आठवणींना नसते वार्धक्‍य (मुक्‍तपीठ)

पृथ्वीवर असलेली प्रत्येक गोष्ट जीर्ण होते. पण आठवणींना वार्धक्‍याचा शाप नसतो. आठवणी ययातीसारख्या तरुण होत जातात प्रत्येक दिवशी. हवेत अत्तर तरावे, तसे मनाच्या कुपीत जपलेल्या आठवण गंधाचे होते. 
 

कुठून कसल्या जाग्या होतात आठवणी, पहाटे पडलेल्या स्वप्नासारख्या! आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक आठवते एखादी बालमैत्रीण तिच्या लांबलचक केसांसकट. शाळा सुटल्यानंतर भेटही झालेली नसते तिची, पण खारीच्या दातांनी खाल्लेला आवळा नेमका आठवत राहतो दिवसभर. सकाळीच रेडिओवर ऐकलेल्या गाण्याची ओळ दिवसभर नकळत गुणगुणत राहावी ना, तशी आठवण गुणगुणत राहते मी.    

आयुष्यातील आठवणींच्या क्षणांना कुरवाळून त्याची सुखद अनुभूती आपण घेऊन शकतो. कारण आठवणी जेवढ्या जुन्या तेवढ्या जास्त सुखद किंवा दुःखद असतात. त्या जरा-जर्जर होत नाहीत. आयुष्याच्या संध्याकाळी त्या नवरंगात न्हाऊन निघतात. आठवणींचे इंद्रधनू मनाच्या क्षितिजावर रेंगाळते. जो क्षण मनाच्या कुपीत, मखमली कापडात जपून ठेवलेला असतो- त्या निसटत्या क्षणी- 

‘शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी’.
 त्या सुकलेल्या बकुळीचा वास अजूनही दरवळतो. आयुष्यात उतरणीवर ना सखा, ना सोबती! पण आठवणींना वार्धक्‍याचा शाप नसतो. त्या आपल्या सोबतच असतात. कटू आठवणी मनाभोवती नेहमीच पिंगा घालत असतात. त्या असतात गडद. घनवर्ण ढगासारख्या त्या ओथंबून येतात कधीमधी. कधीही मनाच्या आत सरीवर सरी कोसळू लागण्याचे भयही दाटून येऊ लागते. तोच अचानक बाहेर भुरुभुरु पावसाची सर येते आणि गाण्याचे स्वर दुरून येतात, तंबोऱ्याच्या तारेसारख्या आठवणी जुळून येतात. 

‘रिमझिम के तराने लेके, आयी बरसात
याद आयी किसीसे वो पहली मुलाकात’
भूतकाळातील चांगल्या आठवणी क्वचितच येतात. श्रीकृष्ण म्हणतो, ‘‘पूर्वायुष्यातील आनंदी क्षणाचे स्मरण करून आनंदी राहा, त्या क्षणात रममाण व्हा.’’ कितीही नाकारले तरी, ‘आनंदाचा क्षण’ म्हणजे आठवते ते

‘पहिले प्रेम’. प्रेम कुणी करत नसते.-हो जाता है।
‘परीकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का?’
प्रत्येकाचे गाणे निराळे असेल, पण मतीतार्थ एकच असतो. तो राजकुमार कल्पनेतील घोड्यावरून येऊन आपल्या मनावर ताबा मिळवतो आणि मन सुखावून जाते. तो ‘क्षण’ -त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा असा भासला, तरी ‘मन’ मोराचा पिसारा फुलवतो. जाणता-अजाणता नवथर तारुण्यातील ते प्रेम तळ्यातील सुंदर लाल कमळासारखे नकळत उमलते, सूर्याच्या पहिल्या किरणाने साद घालताच प्रतिसाद दिल्यासारखे.

‘कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी’
वेडे मन सोनेरी, भूतकाळात विहरू लागते. श्रीकृष्णाचे राधेवरील प्रेम- ते पहिले प्रेम कृष्ण कधीच विसरला नाही. ‘प्रेम’ जे ओठावर थरथरते, गालावर रंगते, डोळ्यात तरंगते, फुलपाखरासारखे फुलावर अलगद बसते, गुंजारव करते. 

वि. स. खांडेकर यांनी लिहिले आहे, ‘प्रीती ही कधी उमलणाऱ्या फुलासारखी हसते, तर कधी उफाळणाऱ्या ज्वालेसारखी दिसते. ती कधी चांदणी होते, तर कधी वीज! कधी हरिणी तर कधी नागीण!’

‘हर किसीको, नही मिलता, यहाँ प्यार जिंदगीमे’
पहिले प्रेम हे असफल होण्यासाठीच होत असावे. सुरैय्या-देवआनंद, मधुबाला-दिलीपकुमार, लैला-मजनू. (खरेच, त्यांचे लग्न झाले असते, तर ते सुखी झाले असते?) कुणीतरी म्हटलेच आहे, ‘‘खऱ्या प्रीतीला अपूर्णतेचा शाप नसून वरदान मिळालेले असते. कारण प्रीतीची पूर्तता होते, त्या क्षणी तिचा प्रवास संपतो. मूळाक्षरे गवसली नाहीत. तरी जखमांच्या मुळाशी शब्द थांबतात.’’

‘सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना, त्या पुराण्या गीतीकेचा, अर्थ तू ऐकून जा.’ संसाराच्या रामरगाड्यात ते प्रेम हरवून जाते, वय वाढते, आयुष्य दुसऱ्या अध्यायावरून तिसऱ्या अध्यायाकडे कधी पोचते ते कळतच नाही. सुंदर, गोड आठवणी सुरकुतलेल्या चेहऱ्यावर किंचित लाजरी हास्याची लकेर उठवतात. आठवणींना तिसरा अध्याय नसतो. त्या म्हणजे जीवनाच्या उतरणीवर चुकून उमललेले रानटी गुलाबी फुलं!

‘फिर तुम्हारी याद आयी, ए सनम ए सनम
हम न भुलेंगे तुम्हे, अल्ला कसम’
आठवणींच्या टपोऱ्या मोत्यांच्या माळेचे एक टोक अचानक हातातून निसटते, ओघळते, मोती विखुरतात, भवती पसरतात, तरीही सूर्यास्ताच्या लालीम्यातील किरण सुखावून जातात.

‘शुक्रतारा सोबतीला आणि जागती पहाट
तुझ्या स्मृतीत रंगता युगे युगे संपतात’
‘प्रेम’ पापण्यांच्या बंद शिंपल्यातले आपले, आपुलकीचे प्रेमळ ‘बंध’ ते बंदच ठेवायचे.
‘प्रेम हे माझे तुझे। सांगायचे नाही कधी
भेटलो आता परी। भेटायचे नाही कधी।’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com