वेटऽर वेटरऽऽ

वेटऽर वेटरऽऽ

संधी मिळाली, नशिबाची साथ असली की माणूस उच्चपदी पोचतो, पण अशावेळी अहंकार जागा होऊ देऊ नये. आपल्या प्रवासाची सुरवात कुठून झाली, याची आठवण मनात ठेवली की, नम्रताही कायम राहते. 
 

आपल्याला कंपनीत बढती मिळाली, याचा सुशांतला खूप गर्व होता. आपल्या सीनियर्सना सोडून आपल्याला उच्चपद मिळाले, असे त्याला नेहमी वाटत असे. त्याच्या वागण्या-बोलण्यातून अहंकार डोकावत असे. बरेच वेळा बोलता बोलता तो समोरच्या व्यक्तीचा अपमान करत असे. 

कंपनीच्या कामानिमित्त सुशांतला वेगवेगळ्या गावी नेहमीच जावे लागत असे. आजही त्याला महत्त्वाच्या बैठकीला जायचे होते. त्याची सगळी तयारी झाली. एकीकडे मोबाईलवर बोलत आणि दुसरीकडे हातातल्या मोठ्या घड्याळाकडे नजर टाकत तो ज्या हॉटेलमध्ये उतरला होता, त्या हॉटेलच्या ब्रेकफास्ट हॉलमध्ये आला. हॉल मोठा प्रशस्त होता, पण इकडे तिकडे पाहायला त्याला वेळ नव्हता. पटकन समोरच्याच एका टेबलावर तो बसला. वेटरला त्याच्या टेबलजवळ यायला किंचित वेळ लागला. आधीच त्याच्यावर बैठकीचा ताण होता, त्यात वेटरला यायला उशीर झाला.

वेटरच्या हातातून ओढूनच त्याने मेनू कार्ड घेतले आणि घाईघाईत ब्रेकफास्टची ऑर्डर दिली. आता पुन्हा तो मोबाईल वरून कोणाला तरी बैठकीच्या सूचना देऊ लागला. त्याने घड्याळात पाहिले. त्याला ब्रेकफास्ट मिळायला उशीर होत होता. अगदी काही मिनिटांचाच उशीर, पण इकडे तिकडे न पाहता सुशांत समोर उभ्या असलेल्या वेटरवर गरजला, ‘‘मी ऑर्डर देऊन वीस मिनिटे झाली. अजून माझा ब्रेकफास्ट आला नाही! नॉनसेन्स! तुम्हाला वेळेची किंमत नाही! मी कोण आहे माहिती आहे का!’’ वेटर खाली मान घालून उभा होता. आरडाओरडा ऐकून हॉटेलचा बाकीचा सगळा स्टाफ तिथे जमला. सगळे भयभीत होऊन पाहात होते. तेवढ्यात स्टाफमधील त्यातल्या त्यात एक वयस्कर धीर एकवटून म्हणाले, ‘‘माफ करा साहेब, पण आज बस, रिक्षांचा संप असल्याने आमचे बाकीचे काही कामगार वेळेत पोचू शकलेले नाहीत, म्हणून...’’ ‘‘म्हणून काय?’’ सुशांत परत खेकसला. ‘‘म्हणून आमच्या साहेबांनी स्वतः किचनची व्यवस्था पाहिली आणि म्हणून तुम्हाला ब्रेकफास्ट सर्व्ह करायला थोडा उशीर झाला. ’’

‘‘मला काहीही ऐकायचे नाही, मला या वेटरबद्दल तक्रार करायची आहे,’’ सुशांत रागारागाने बोलत होता. सगळे खाली माना घालून उभे होते. कोणीच काही बोलत नव्हते. काय बोलावे, काय करावे कुणालाच काही कळत नव्हते. तेवढ्यात सुशांत पुन्हा ओरडला, ‘‘तुमचे मॅनेजर कुठे आहेत, बोलवा त्यांना. मला त्यांच्याशी बोलायचे आहे.’’ ‘‘ते शक्‍य नाही,’’ परत वयस्कर गृहस्थ म्हणाले. त्यांचे असे बोलणे चालू होते, तेवढ्यात त्या वेटरने सुशांतला ब्रेकफास्ट सर्व्ह केला. नम्रपणे आणि स्मित हास्य करत तो ‘‘सॉरी सर’’ म्हणाला आणि तिथून बाजूला झाला. सुशांतने गडबडीत ब्रेकफास्ट संपवला आणि त्याला जायची गडबड असूनसुद्धा आपल्या स्वभावानुसार मॅनेजरशी भेटून त्या वेटरची तक्रार करण्यासाठी तो मॅनेजरच्या केबीनमध्ये अक्षरशः घुसलाच, बाकीच्या लोकांचा विरोध न जुमानता.

तो आत गेला खरा, पण त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्‍वासच बसेना. मगाशी वेटर म्हणून त्याची बोलणी निमूट सहन करीत, त्याला ब्रेकफास्ट सर्व्ह करणारी व्यक्ती चक्क त्याच्या समोर मॅनेजरच्या खुर्चीत बसली होती. आता मात्र तो जवळ जवळ किंचाळलाच. ‘‘तुम्ही... तुम्ही मॅनेजर!’’ मॅनेजर शेकहॅण्ड करत सुशांतला म्हणाले, ‘‘बसा, बसा आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो.’’ ‘‘अहो, पण तुम्ही एवढ्या मोठ्या हॉटेलचे मालक आणि तुम्ही...’’ त्यांच्या मागोमाग वयस्कर गृहस्थ आत आले होते, ते म्हणाले, ‘‘मी सांगतो, हो मगाचे ते हेच आमच्या हॉटेलचे मॅनेजर आणि मालकसुद्धा. गेली कित्येक वर्षे या हॉटेलमध्ये जो पहिला कस्टमर येतो त्याला हेच सर्व्ह करतात. आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवर असायला हवेत, आपण कोण होतो, कुठून सुरवात केली हे लक्षात राहावे, यासाठी यांचे वडील म्हणजे आमचे आधीचे मालकही स्वतः पहिल्या कस्टमरला सर्व्ह करत. वडिलांची ही शिकवण लक्षात ठेवून आमचे साहेब एवढे मोठे झाले तरी पहिल्या गिऱ्हाईकला स्वतः सर्व्ह करतात. अगदी कस्टमरला न कळऽता. त्यात त्यांना कमीपणा वगैरे अजिबात वाटत नाही. उलट अगदी नम्रपणे आनंदाने ते करतात.’’

हे ऐकले, मात्र सुशांतचा चेहरा खर्रकन पडला. त्याला ओशाळल्यासारखे झाले. त्याने पुन्हा पुन्हा मॅनेजरची माफी मागितली. सगळ्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आणि तो बैठकीसाठी गेला.

आजची बैठक खूपच छान झाली. आज खूपच वेगळे वातावरण सगळ्यांना जाणवले. सुशांतला इतके शांतपणे बोलताना, समजावून सांगताना पाहिल्यावर प्रत्येकाला आश्‍चर्याचा धक्काच बसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com