चित्कलानंदी लागे टाळी!

- वैशाली पंडित
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016

चित्कलाने निसर्गभान जिव्हाळ्याने जोपासले आहे. त्यात कृत्रिमतेचा लेशही नाही. इतके निष्पाप मन ही चित्कलेला मिळालेली दैवदत्त देणगी आहे. म्हणूनच निसर्गाघरचे हे जीव तिच्या पाहुणचाराला येत असावेत.

मला असोशीने सांगायचे आहे ते, इचलकरंजीतल्या एका मधुरातिमधुर सारणाबद्दल! अर्थात... चित्कला कुलकर्णीबद्दल!

चित्कलाने निसर्गभान जिव्हाळ्याने जोपासले आहे. त्यात कृत्रिमतेचा लेशही नाही. इतके निष्पाप मन ही चित्कलेला मिळालेली दैवदत्त देणगी आहे. म्हणूनच निसर्गाघरचे हे जीव तिच्या पाहुणचाराला येत असावेत.

मला असोशीने सांगायचे आहे ते, इचलकरंजीतल्या एका मधुरातिमधुर सारणाबद्दल! अर्थात... चित्कला कुलकर्णीबद्दल!

सुंठीच्या कुडीसारख्या या बाहुलीसारख्या देहात काय नि किती म्हणून चांगुलगोष्टी वस्तीला असाव्यात! आम्ही गृहिणी जन्म घालवतो भांड्यांच्या सहवासात. चमच्यातसुद्धा आमचा जीव सतत अडकलेला असतो. पंढरीला निघालेली आवाही भांडीकुंडी सुनेच्या ताब्यात असणार या विचाराने कासावीस होऊन वेशीपासून परत आली. चित्कलाने या भांड्यातल्या जिवाला संशोधनात जीवेभावे गुंतवले. पातेली, वाट्या, तसराळी, ओगराळी, डबे, ताटे, कढई, परात, तांबे, पाटा वरवंटा, खलबत्ता, चकलीपात्रं, चमचे, डाव, पळ्या किती नि काय भांड्याची कुलगोत्र! सगळ्याची पाळेमुळे जिज्ञासेच्या कुदळीने खणणारी ही खणखणीत ‘भांडंकुदळ’ बाई अतीव मायेने भांड्यांना शब्दांनी गोंजारते. फुलवते. त्यांना वाङ्‌मयीन संदर्भाची झळाळी देते. 

चित्कला उत्तम गाते. अभिजात संगीताची तिला जाण आहे. चित्कला सहृदयी आहे. तिचे पक्षिप्रेम मातेच्या जातकुळीचे आहे. मी तिच्या घरीच उतरले होते. तिच्या एका खोलीत एक राघूनाना पिंजऱ्यात तिच्याकडून शुश्रुषा घेत होते. ती त्याला भिजली डाळ भरवताना म्हणत होती, ‘‘ए पोपटु, उद्या जायच्ये बरं का घरी! आता मस्त बरे झालात तुमी.’’ माझ्या अचंबित मुद्रेकडे पाहत तिने खुलासा केला. ‘‘अगं, हा पोपट जखमी झालेला सापडला. त्याला औषधपाणी करून बरे केलेय. आता उद्या त्याची पाठवणी करायचीय.’’  

दुसऱ्या दिवशी उठल्यावर लगेच आम्ही गच्चीवर गेलो. तिथे मस्त गार सकाळ पसरली होती. आजूबाजूची घनदाट झाडे हज्जारो पक्ष्यांनी  चिवचिवत होती. तिच्या लेकीने तन्नयीने पोपटुचा पिंजरा गच्चीत आणला. पोपटाला तो जातभाईंचा आवाज साद घालत होता. त्याला दोघींनी मायेने पेरूच्या फोडी भरवल्या आणि पिंजऱ्याचे दार उघडून धरले.

पोपटुभय्या थोडे गोंधळले, इकडे तिकडे नाचले. आणि..... दरवाजा उघडा सापडताच पंख फडकावीत पिंजऱ्याबाहेर झूम्म्म्मकन झेप घेते झाले. आम्ही टाळ्या वाजवीत ती पाठवणी साजरी केली. पोपट त्याच्या दुनियेत जाऊन पोचलाही. त्याला तिथे जाण्यासाठी चित्कलाच्या या भूतलावरच्या हातांनी जीवनदान दिले होते. तिच्या घरातला पिंजरा स्वत:चे पक्षिप्रेम कोंडून ठेवण्यासाठी नाही, त्यांना जीवनात परत पाठविण्यासाठी आहे.

तिच्या घरात आणखी दोन आजारी बाळे आहेत. चिऊताईची दोन पिल्ले. चक्क.... एका झाकणबंद बास्केटात नारळाच्या काथ्या पसरून त्यात ही चिमणुकली ठेवलेली आहेत. जखमी अवस्थेत झाडाखाली मिळाली. अजून पिसेही फुटायचीत. हे इवले गोळे भूक लागली, की चोची वासतात, मग त्यांची ही माणूसमाता त्यांना सीरिंजमधून पेजेचा खाऊ भरवते. ‘‘आता आपण तुमची खोली साफसूफ करूया बरं का.’’ म्हणत ते जीव अलगद एका हातात धरते. दुसऱ्या हाताने काथ्या बदलते.’’ इथे तुम्हाला खेळायला जागा हं ! इथे तुम्ही गाई गाई करायची आणि या कोपऱ्यात शी करायची बरं का रे!’’ अशी मऊ आवाजात शिस्त लावते. त्यांना खाऊ घालायचे काम दर दोन तासांनी करावे लागते. ते चित्कला निरलसपणे करते. अगदी कार्यक्रमातही ‘बाळं भुकेली झाली असतील गं...’ अशी तिची घालमेल चालली होती. बरं, ही बाळं पिसे फुटल्यावर आनंदाने त्यांच्या जगात सोडूनही द्यायची आहेत.

चित्कला ते क्षण जगते. त्यात गुंतून पडत नाही. कर्मयोग याहून काय वेगळा असतो हो? तिच्या कपाटावरच्या परडीत फुलपाखराचा कोश आहे. तो कोश कढीपत्त्याच्या पानांवर जगणाऱ्या अळीचा आहे. स्वयंपाक करताना कढीपत्त्याची पाने आणली तेव्हा चित्कलाला ती दिसली. तिला निसर्गातले ते अनमोल धन दिसले, जे आम्हा सामान्य गृहिणींच्या लक्षातही आले नसते. मेले भाजी, आमटी फोडणीला टाकायच्या जेवणघाईत स्वत:कडे नसते लक्ष, तिथे अळीसारखी क्षुद्र गोष्ट कशाला दिसत्येय? दिसलीच तर शीऽ म्हणून तिला झटकून नाही का टाकायचे? पण न्नाही ना! ती चित्कला आहे बाबा! तिने त्या अळीपोरीला छानशा परडीत ठेवले. तिच्या भोवती कढीपानांची पखरण केली. तर हो! तेच तिचे डोहाळे ना ... गपागप खाते म्हणे अळी कोषाआधी. मग योग्य वेळ येताच त्यातून मोरमॉन नावाचे फुलपाखरू जग बघायला बाहेर येते. 

हे सगळेच चित्कलाने जिव्हाळ्याने जोपासले आहे. तो तिचा स्थायीभाव आहे. त्यात कृत्रिमतेचा लेशही नाही. निष्पाप मन ही चित्कलेला मिळालेली दैवदत्त देणगी. म्हणूनच निसर्गाघरचे हे जीव तिच्या पाहुणचाराला येत असावेत.

टॅग्स