फक्त स्ट्रेस फॅक्‍टर

नंदा सुर्वे
गुरुवार, 20 जुलै 2017

परिचित डॉक्‍टरांनीही ऍन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला आणि हबकूनच गेले. म्हणजे आता ब्लॉकेजेस निघणार, मग ऍन्जिओप्लास्टी करावी लागणार, त्याने भागणार नसेल तर बायपास. मनात हे सारे दाटत गेले आणि सारा जीव गोळा झाला.

परिचित डॉक्‍टरांनीही ऍन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला आणि हबकूनच गेले. म्हणजे आता ब्लॉकेजेस निघणार, मग ऍन्जिओप्लास्टी करावी लागणार, त्याने भागणार नसेल तर बायपास. मनात हे सारे दाटत गेले आणि सारा जीव गोळा झाला.

साधारणतः बारा- तेरा वर्षांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका बसला होता. तो सौम्य होता. मी एवढी चालणारी, भटकणारी बाई..... आणि मला असा कसा "ऍटॅक' आला याचे मला खूप दिवस नवलच वाटत होते. पण असा "ऍटॅक' यायला वेगवेगळी कारणे घडतात, त्यापैकीच एका कारणाने मला ऍटॅक आला होता हे निदान झाल्यावर कळले.
मी डेक्कन जिमखान्यावरच्या एका रुग्णालयात दाखल झालेली असताना मी "ऍन्जिओग्राफी' करून घ्यावी, असे तिथल्या प्रमुख डॉक्‍टरांनी सुचवले. त्या रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या आमच्या एका परिचित डॉक्‍टरांचाही तसा आग्रह होता. ते आमचे खरेखुरे हितचिंतक होते. ते चुकीचा सल्ला देणार नाहीत एवढा विश्‍वास होता. तरीही मी आणि माझी मुले विचारात पडलो. खूप गोंधळून गेलो होतो. एक तर परत मोठा खर्च होणार ही एक धास्ती. शिवाय त्यातून काही निष्पन्न झाले तर पुढच्या मोठ्या उपचाराला सामोरे जावे लागणार ही दुसरी धास्ती. त्यापेक्षा अज्ञानात भले. म्हणजे जे काय असायचे ते असणारच, पण आपल्याला माहित नको. जीव अगदी हबकून गेला होता. कारण अलीकडे या तपासणीतून जास्त कमी "ब्लॉकेजेस्‌' निघण्याचा संभव असतो. खूप मोठ्या टक्केवारीने असेच काहीसे घडत असल्याचे ऐकिवात असते. म्हणजे ऍन्जिओग्राफीच्या निष्कर्षांनंतर एकतर "ऍन्जिओप्लास्टी'ला सामोरे जा, नाही तर "बायपास'ला तरी तयार राहा, असेच वाटते. माझ्या पोटात मोठा गोळा उभा राहिला होता. काय करायचे सुचत नव्हते. काय निघणार, काय नाही हे ताण भयग्रस्त करत होते. मनात पुन्हा पुन्हा नको ते विचार दाटत राहात आणि सारा जीव गोळा होत असे. तरीही एक दिवस आम्ही निर्णय केला. आमच्या परिचित डॉक्‍टरांचा सल्ला मानायचा ठरवला. त्यानुसार वैद्यकीय तयारीला सुरवात करण्याच ठरवले.

ज्या हॉस्पिटलची पुण्यात मोठी साखळी आहे, त्यातल्या डेक्कन जिमखाना शाखेत आम्ही जायचे ठरवले. तिथे गेल्यावर मनावर प्रचंड ताण येऊन शरीर कापतच होते. निःशब्दता आली होती. मुळातली सगळी ऊर्जा विझून गेल्यासारखी झाली होती. मला तिथे ऍन्जिओग्राफीच्या विभागात नेण्यात आलें. तिथल्या बेडवर झोपवले. मन कमालीचे अशांत होते. या डॉक्‍टरांना काय दिसेल? ते ऍन्जिओप्लास्टी करायला सांगतील की बायपास करायला सुचवतील? की पहिला यशस्वी ठरतो का पाहून दुसरा पुढे करू म्हणतील? मनातले प्रश्‍न संपेनात.

ऍन्जिओग्राफीचे तज्ज्ञ डॉक्‍टर तिथे आले. मला "गुड मॉर्निंग' म्हणत तिथल्या वैद्यकीय उपकरणांची जुळवाजुळव करीत सारे "ओके' आहे ना हे त्यांनी बघितले. माझ्याकडे सौम्यसे हसू टाकत त्यांनी तपासणीला सुरवात केली. एक स्वीच ऑन करून ते समोरच्या स्क्रीनवर बारकाईने नजर टाकत राहिले. इकडे मी आपली घाबरून डोळे मिटून पडलेली. आणि दुसरे म्हणजे आपल्याला त्यातले काय कळतेय ही भावना. स्क्रीनवर हृदयाचे चित्र, तिथल्या हालचाली... एकूणच हृदयाचे कार्य तिथल्या स्क्रीनवर दिसत होते. ते पाहून त्या डॉक्‍टरांच्या तोंडून मात्र आनंदाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. फॅन्टास्टिक..... वंडरफूल..... मार्व्हल्स! अशा प्रतिक्रिया ऐकून मी थोडी हालले. त्यांना ब्लॉकेजेस्‌ सापडत आहेत की काय? नसावे बहुधा. म्हणजे नसावेच. डॉक्‍टरांच्या स्वरात उत्साह दिसतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी सकारात्मक घडत असावे असे वाटले. मी सावधपणे डोळे उघडले तर डॉक्‍टर मला उद्देशून त्या प्रतिक्रिया देत होते. ""अहो, बघा बघा... व्हेरी फॅन्टास्टिक... यू आर अ लकी वन.''

""म्हणजे काय डॉक्‍टर?'' मी काहीशी चक्रावून गेले होते, तर ते आणखी उत्साहित होऊन म्हणाले, "नॉट अ सिंगल ब्लॉकेज.'' या वयात एकही ब्लॉकेज नाही, अशी माझ्याकडे आलेली ही पहिली केस आहे. सो, कम ऑन, चिअर अप!''
अन्‌ ते तिथून बाहेर पडले. बाहेर माझा मुलगा हेमंत उभा होता. त्याच्याशी हस्तांदोलन करत पुन्हा तेच उद्‌गार काढले, " कॉंग्रॅट्‌स. गेट रिलॅक्‍स्ड. या वयात एकही ब्लॉकेज नसलेली माझ्याकडची ही पहिली केस आहे.''
आम्ही अपार आनंदात होतो. इतक्‍या वर्षांत जेव्हा जेव्हा हा विषय निघतो, तेव्हा तेव्हा या सगळ्या प्रामाणिक डॉक्‍टरांना मी मनोमन लाख लाख धन्यवाद देत असते. ते मला देवदूतासमानच वाटले होते.

आमच्या प्रमुख डॉक्‍टरांनी ते निष्कर्ष पाहून फक्त "मानसिक ताणतणाव' एवढेच हृदयविकाराचे निदान केले. आम्ही सुटलो!