अमजदभाई भेटले; पण...

नितीन चौगुले
शनिवार, 29 जुलै 2017

अमजद खान यांनी या जगातून "एक्‍झिट' घेतली, त्याला नुकतीच पंचवीस वर्षे झाली. इतकी वर्षे गेली, पण गब्बरसिंगचे गारूड ओसरले नाही. त्यांचे एकदाच अगदी समोरून दर्शन झाले, तो क्षण अजूनही ताजा आहे.

अमजद खान यांनी या जगातून "एक्‍झिट' घेतली, त्याला नुकतीच पंचवीस वर्षे झाली. इतकी वर्षे गेली, पण गब्बरसिंगचे गारूड ओसरले नाही. त्यांचे एकदाच अगदी समोरून दर्शन झाले, तो क्षण अजूनही ताजा आहे.

मी विरार येथील एका कंपनीत कामाला होतो. वयाच्या विशीत होतो. वयानुसार साहजिकच मला चित्रपट दुनियेची ओढ होतीच. म्हणून मी रिकाम्या वेळेत वृत्तपत्रामधील, मासिकांमधील चित्रपट कलावंतांच्या बातम्या, त्यांच्या मुलाखती वाचत असे. एक दिवस वृत्तपत्रामध्ये एका ऑर्केस्ट्राची जाहिरात वाचली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते अमजद खान उपस्थित राहणार होते. मनावर गब्बरसिंगचे गारूड होतेच. मी ठरवले, काही पण करून या कार्यक्रमाला जायचेच.

आणि तो दिवस आला, ज्या कार्यक्रमाची मी वाट बघत होतो. रात्री हा कार्यक्रम होणार होता. मी बिर्ला मातोश्री मंदिर येथे पोचलो. कार्यक्रम सुरू झाला. बराच वेळ झाला. अमजद खान काही कुठे दिसेनात. माझे गाण्याकडे बिलकूल लक्ष नव्हते. माझे सारे लक्ष फक्त अमजद खान कधी येतील, याकडे होते आणि बघता बघता मध्यंतर झाले. मी मनाशी पुटपुटत होतो. अमजद खान कदाचित येणारच नसतील. गर्दीसाठी खोटी जाहिरात देऊन अशी लोक फसवणूक करतात, असे पुटपुटत मी पाय मोकळे करायला फिरत होतो. डाव्या बाजूच्या दरवाज्याजवळ खूप गर्दी होती, म्हणून मी उजव्या बाजूच्या दरवाज्याकडून निघालो. तिकडे कुणीच नव्हते. तो दरवाजा थोडासाच उघडा दिसला. मी त्या दरवाज्यामधून बाहेर पडलो. ही वाहनतळाजवळची जागा होती.
तेवढ्यात समोरून मोटार उभी करून दोघे जण माझ्या दिशेने येत होते. त्यातला एक जाड आणि धिप्पाड होता. या बाजूला माझ्याखेरीज दुसरे कोणीच नव्हते आणि समोर अमजद खान. त्यांनी जवळ आल्यावर मला विचारले, ""अरे बेटा, अंदर स्टेजपर जाने के लिए रास्ता कहॉं से है?''

माझ्यासमोर साक्षात्‌ अमजद खान यांना पाहून मला काहीच सुचेना. मी अगदी भांबावून गेलो होतो. मी त्यांना सरळच थिएटरच्या मागे जाण्यास सांगितले. आणि मीही त्यांच्या मागे मागे जाऊ लागलो; पण तेथून जाणारा रस्ता स्वच्छतागृहाजवळून जात होता. त्यामुळे अमजदखान यांना पाहताच लोक स्वच्छतागृहासमोरची रांग सोडून धावत आले; पण तेवढ्यात कुणीतरी त्यांना मंचाकडे घेऊन जायला आले. मीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ मंचाकडे पोचलो. तिथे त्यांच्यासाठी पत्र्याची लोखंडी खुर्ची ठेवली होती. कारण, साध्या खुर्चीमध्ये त्यांना त्यांच्या वजनामुळे बसता येत नव्हते. संयोजकांनी पुढे येऊन त्यांचे स्वागत केले आणि पुढचा कार्यक्रम सुरू झाला.

स्टेजवर एक कलाकार गाणे म्हणत होता. गाणे होते, "ओ दुनिया के रखवाले...' आणि काय सांगू, इकडे अमजद भाईंनीसुद्धा गाणे म्हणायला सुरवात केली. ते इतके या गाण्यात डुंबून गेले, की संपूर्ण गाणे त्यांनी डोळे बंद करून म्हटले. मी त्यांच्याकडेच पाहात होतो. जेव्हा गाणे संपले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो गायक मंचावरून आत आला, तेव्हा अमजदभाईंनी त्याच्या पाठीवर प्रेमाने थाप दिली.
इकडे सूत्रसंचालकाने घोषणा केली, ""भाईयों और बहनों, अभी आप दिल थाम के चूपचाप बैठो, वरना "गब्बरसिंग' आ जाएगा।'' सारे सभागृह शांत श्‍वास रोखून पाहात होते. आणि अमजदभाई उठून मंचावर गेले. सारे प्रेक्षागृह एकदम उत्साहित झाले. "गब्बर सिंग', "गब्बर सिंग' या घोषणांनी प्रेक्षागार अक्षरशः दणाणून गेले. अमजदभाई हसतमुखाने या प्रेमाचा स्वीकार करीत होते. थोड्‌या वेळाने प्रेक्षक शांत झाले. मग अमजदभाईंनी तोच संवाद म्हणून दाखवला, ""अरे ओ सांबा, मेरे सामने कितने आदमी है रे...?'' असा डॉयलॉग मारून पब्लिकला त्यांनी खूष केले. आणखी थोडे मनोरंजन करून अमजदभाई निघाले.

मी ही त्यांच्या पाठोपाठ बाहेर आलो. मला त्यांच्यासोबत एक छायाचित्र काढून घ्यायचे होते. बाहेर त्यांची गाडी त्यांना घ्यायला येत होती. तेवढ्यात मी पळत थिएटरमध्ये गेलो. तिथे असलेल्या छायाचित्रकाराला घेऊन आलो; पण तोवर अमजदभाई एक पाय गाडीत ठेवून कसेबसे बसत होते. त्यांच्या वजनामुळे त्यांना गाडीतसुद्धा नीट बसता येत नव्हते. मी त्यांच्याजवळ जाऊन म्हणालो, ""सर, आपके साथ एक फोटो लेना था!'' पण आता गाडीतून पुन्हा बाहेर येऊन छायाचित्रासाठी उभे राहणे त्यांना अवघड झाले असते. अमजदभाई म्हणाले, ""बेटा, तू थोडी देर कर दी। अभी नहीं, फिर कभी, नेक्‍स्ट टाइम.....''

आणि "नेक्‍स्ट टाइम' आला तो त्यांच्या मृत्यूची बातमी घेऊनच. आपल्या या लाडक्‍या "गब्बरसिंग'ला आपल्यातून जाऊन पंचवीस वर्षे झाली; पण त्यांची ती काही वेळाची भेट माझ्या मनात अजून ताजी आहे.