क्षण कसोटीचे

पी. बी. म्हेत्रे
बुधवार, 29 मार्च 2017

दिवसभर काम करून थकल्यानंतरही एखादी रात्र तुमची कसोटी पाहणारी असते. त्या वेळी तुमचे थकलेपण, डोळ्यांवरची अनावर झोप दूर ठेवून कामावर यावे लागते. तुमच्यावर हजारो जणांचे प्राण अवलंबून असतात, तेव्हा तर सावध नजरेने काम करावे लागते.

दिवसभर काम करून थकल्यानंतरही एखादी रात्र तुमची कसोटी पाहणारी असते. त्या वेळी तुमचे थकलेपण, डोळ्यांवरची अनावर झोप दूर ठेवून कामावर यावे लागते. तुमच्यावर हजारो जणांचे प्राण अवलंबून असतात, तेव्हा तर सावध नजरेने काम करावे लागते.

राजकोटला रेल्वेत रुजू झालो. नंतर गुजरातमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली. 1978 मध्ये साधारण मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या सुरवातीस अहमदाबादचे उपनगर असलेल्या गांधी ग्राममध्ये नगर परिषदेतर्फे सहा फूट व्यासाची वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले होते. रेल्वेची रीतसर परवानगी घेऊन लोहमार्ग सहा तास बंद ठेवून (मेगाब्लॉक घेऊन) हे काम पूर्ण करण्यात आले. सहा फूट व्यासाची वाहिनी व कामगारांना काम करण्यासाठी किमान दोन फूट जागा असा आठ फूट खोल खड्डा घेण्यात आला होता. वाहतूक तात्पुरती सुरू ठेवण्यासाठी बावीस फूट लांबीचा गर्डर टाकण्यात आला. त्यासाठी क्रेनचा वापर न करता कामगारांकडूनच गर्डर सरकवण्याचे ठरविले होते. गर्डरला दोरखंड बांधून एका बाजूस तीस-चाळीस व दुसऱ्या बाजूस तेवढीच माणसे लावून गर्डर ओढून जागेवर बसवला. वाहिनी सहा तासांत जोडली. त्यावरून वाहतूक सुरूही केली. अगदी नियोजनानुसार काम पूर्ण झाले होते. सकाळी आठ ते संध्याकाळी सातपर्यंत अखंड काम चालू होते, ते योग्यरीत्या आटोपून मी परत आपल्या हेडक्वॉर्टरला परतलो. हेडक्वॉर्टरपासून ही कामाची जागा साधारण वीस किलोमीटर दूर होती. परतेपर्यंत पुरता थकलो होतो. घरी आल्यावर "फ्रेश' होऊन जेवण केले व साधारण रात्री दहाच्या सुमारास झोपलो. दिवसभर उन्हात काम केल्याने थकवा भरपूर आला. झोप कधी लागली हे समजलेच नाही.

रात्री कधीतरी पाऊस चालू झाला होता. साधारण अडीचच्या सुमारास स्टेशनमास्टरांनी माणूस माझ्या घरी पाठवला. दिवसा ज्या ठिकाणी वाहिनी टाकल्यावर गर्डर बसवून वाहतूक सुरू केली होती, त्या ठिकाणी भरपूर पाणी साठले होते. त्यामुळे माझ्याकडून "ट्रॅक सेफ सर्टिफिकेट' मिळाल्याखेरीज गाड्या पाठवता येणार नव्हत्या. कामाच्या ठिकाणी जायला इंजिनची व्यवस्था केली होती. मी ताबडतोब कपडे घालून तयार झालो. सोबत दोन ट्रॉलीमन घेऊन जागेवर पोचलो. तेथे धो-धो पाऊस चालूच होता. चारी बाजूला पाणीच पाणी! ज्या ठिकाणी काम केले, तेथे रुळाच्या फक्त वरचा गोट दिसत होता. त्याखाली माती, स्लिपर्स आहेत की नाहीत, हे दिसत नव्हते. अशा परिस्थितीत मेल, एक्‍स्प्रेस गाड्या काढायचा तरी कशा, मोठे कसोटीचे क्षण होते.
दरम्यान, कीर्ती एक्‍स्प्रेस पोरबंदरला जाण्यासाठी गांधी ग्रामला येऊन थांबली होती. स्टेशन मास्टर जवळच्या गेटमनला सांगून मला सेफ सर्टिफिकेट मागत होता. रात्रीचा काळाकुट्ट अंधार, पाऊस चालूच, हातातील बॅटरी हाच एक आधार व साधन. दिसत तर काहीच नव्हते; पण हिंमत करून तिथपर्यंत गाडी आणवली. पाईटमनला सांगून इंजिन वेगळे केले. प्रथम लोडविरहित असे गेज व लेबल बॅटरी व इंजिनच्या लाइटमध्ये तपासले. नंतर इंजिन आस्ते आस्ते पुढे घेऊन गेज, लेबल पुन्हा तपासले. दोन्हीतील फरक हा सुरक्षित मर्यादेच्या बाहेर नाही याची खात्री केली. कारण पावसामुळे, पाण्याच्या जोरामुळे रेल्वे लाइनखाली माती, स्लिपर्स वाहून गेले किंवा काय हे माहित नव्हते. म्हणून आधी केवळ इंजिन चालवून पाहिले. कारण समजा काही धोका झालाच असता, तर केवळ इंजिन तेवढेच त्या खड्ड्यात पडले असते. मागचे डबे सुरक्षित राहिले असते. कारण त्या सगळ्या जिवांची काळजी अधिक होती. इंजिन सुरक्षितपणे पुढे गेले, मग ते पुन्हा मागे घेतले. माझी खात्री झाली. आता इंजिन पुन्हा बाकीच्या डब्यांना जोडले व मी स्वतः इंजिनवर चढलो. ड्रायव्हरला गाडी आस्ते आस्ते पुढे घेण्यास सांगितले. याला रेल्वेच्या भाषेत "पायलटिंग' म्हणतात. अशा रीतीने पूर्ण चोवीस डब्यांची एक्‍स्प्रेस गाडी तेथून सुरक्षितपणे पुढे काढली. त्यानंतर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक गाडीला पायलटिंग करीत पूर्ण रात्र जागून काढली. सकाळी घरी गेलो नाही. पुन्हा कामगार व साहित्य मागवून घेतले. ट्रॅक दुरुस्त व मजबूत केला. दिवसभरात पक्का ट्रॅक तयार करून संध्याकाळी निश्‍चिंतपणे घरी गेलो.

ट्रॅकसंबंधित कामे जोखमीची व तत्काळ निर्णय घेऊन त्यावर काम करण्याची असतात. मार्ग नीट न तपासता घाईगडबडीने जर एक्‍स्प्रेस त्या गर्डरच्या जागेवरून घेतली असती आणि रेल्वेलाइन खचली असती तर मोठा अपघात झाला असता. मनुष्यहानी झाली असती. ती टाळण्यासाठी वेळ गेला तरी काटेकोर तपासणी करून काळजीपूर्वक व स्वतः पायलटिंग करीत सगळ्या गाड्या पार केल्या. येथे आज थकलो, उद्या करू, असे म्हणून नाही चालत! जोपर्यंत स्वतःचे समाधान होत नाही, की या ठिकाणावरून रेल्वे सुखरूप जाईल, तोपर्यंत "साईट' सोडता येत नाही. वेळेचे बंधन नाही. त्या कामावर माझी श्रद्धा आहे.