अजुनी सुरेल आहे..

bhalchandra deo
bhalchandra deo

पं. भालचंद्र देव हे नाव पुण्यातल्या व्हायोलिन प्रेमींसाठी नवीन नाही. विद्यादानाचं काम अव्याहतपणे करणारे, कलेप्रती निष्ठवान असणाऱ्या पंडितजींनी नुकतीच त्यांनी वयाची 80 वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्त शनिवारी 3 डिसेंबरला संध्याकाळी साडेपाचला 'निवारा सभागृह' येथे सांगीतिक सोहोळा आयोजित करण्यात आला आहे.

मला माझ्या लहानपणापासून आठवतात, नाना अजूनही तसेच आहेत. मध्यम उंच बांधा, लांबसडक बोटं, एका बाजूला वळवले केस, जुन्या पद्धतीची टेरीकॉटची पॅन्ट, साधाच पण नीटनेटका इस्त्री केलेला स्वच्छ शर्ट, आणि हातात त्यांची ती नेहमीची पट्टेरी शबनम. साधारण अशाच ठरलेल्या वेशात मी त्यांना बरीच वर्षे पाहतोय. अगदीच त्यांचा स्वतःचा कार्यक्रम असेल तरच एखादा साधा सलवार कुर्ता दिसेल त्यांच्या अंगावर. तो सुद्धा जास्त काही शोभा न करता.

मला आठवते ती गोखले नगरची चाळ. दोन खोल्यांचं घर. मग बरेच वर्षांनी मागची एक खोली वाढवून त्या नावाला दोनाच्या तीन झाल्या एवढंच. पण त्या आधी दोनच खोल्या, पुढे आणि मागे छोटं अंगण. तिकडे आमच्या आजीची दुपारी मॉन्टेसरीची शाळा चालायची. साधारण तीस-बत्तीस वर्ष ही शाळा आमच्या शेजारच्या देशपांडेबाई आणि आमची आजी चालवित होत्या. 'देव बाईंची, देशपांडे बाईंची शाळा' अशी गोखले नगरची खूण झाली होती. आजीची ती चिल्ल्या पिल्ल्यांची शाळा, नानांची पी अँड टी (आताचं BSNL)ची नोकरी, भारत गायन समाजात चालणारी व्हायोलिनची शिकवणी आणि हे सांभाळून पुण्यात-पुण्याबाहेर अनेक कार्यक्रमांमध्ये वादन हे सगळं नाना-आजींचं सुरु होतं.

नाना व्हायोलिन घेऊन सारखे इकडे तिकडे का जातात? आजी रोज दुपारी एवढ्या लहान मुलांना घरात बसवून का शिकवते? नानांची शिकवणी, कार्यक्रम म्हणजे काय हे मला कळायचं नाही तेव्हा. या सगळ्यांच्या जोरावर त्या दोघांनी घर कसं चालवलं असेल याची कल्पना तेव्हा येणं कठीण होतं. आता येतेय...

'संतुलित आहार, संतुलित जीवन'
नानांची दिनचर्या अगदी त्यांच्या वेषभूषे इतकीच साधी सरळ नीटनेटकी. अगदी सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं नेमानं. कधीही ते अगदी जड होईल इतकं जेवले नाही आणि अर्धपोटी राहायची वेळ कधी स्वतःवर येऊ दिली नाही. 'संतुलित आहार, संतुलित जीवन' हेच त्यांच्या निरोगी आणि पौष्टिक दिनचर्येचं रहस्य आहे असं वाटतं. कधी आजारी आहेत म्हणून पडून राहिले नाहीत का कधी एका जागी बसून राहिले नाहीत. नोकरीत होते तेव्हा त्यांच्या व्यस्त दिनमानामुळे वेळ मिळाला नाही तर, रात्री सगळे झोपल्यानंतर हेडफोन लाऊन गाण्यांची नोटेशन्स, तुकडे काढायचं काम करायचे. तेव्हा सुद्धा 'हे आत्ता गाणी का ऐकतायत' हा अगम्य प्रश्न मला पडायचाच, उत्तर काही वर्षांनी मिळालं.

पुण्याच्या 'भारत गायन समाज' या जुन्या आणि प्रसिद्ध संगीत विद्यालयामध्ये त्यांनी संगीत शिक्षकाचं काम केलं. व्हायोलिन जेवढं वाजवायला अवघड त्याहून जास्त ते शिकवायला अवघड आहे असं म्हणतात. यामुळेच फारसं कोणी व्हायोलिनच्या वाट्याला जात नाही. शिकायला जात नाही आणि शिकवायला त्याहून जात नाही. भारतीय शास्त्राप्रमाणे व्हायोलिन शिकवणारे हल्ली खूपच कमी आहेत. जे आहेत ते सगळे जुने लोकच. या अशा परिस्थितीमुळे या संगीत विद्यालयात व्हायोलिनचे शिक्षक टिकत नव्हते त्या परिस्थितीत नानांनी पाच-दहा नाही तर तब्बल सेहेचाळीस वर्षे या संस्थेत विद्यादानाचं काम केलं. संगीत संस्कार केले, अनेक विद्यार्थी घडवले तेही अगदी कमी मोबदल्यात. केवळ संगीताची आवड आणि कलेवरच्या प्रेमाखातर.

आता एखाद्या माणसाचा जसा स्वभाव असतो तोच स्वभाव त्याच्या प्रत्येक गोष्टीत व्यक्त होत असतो नाही का? नानांचं सुद्धा असंच. स्वभावानं प्रेमळ, पण शिस्त म्हणजे शिस्त! चुकीची गोष्ट स्वतः करणार नाहीत आणि कोणाची खपवूनही घेणार नाहीत. मग त्यासाठी कधी कोणाला कडवे बोल सूनवायला लागले तरी मग पुढचा मागचा विचार करणार नाहीत. कातडीबचावू, भिडस्त दृष्टिकोन कधी ठेवला नाही. जे काय आहे ते बोलून मोकळे! मनात काही नाही.

आता नानाच्या वादनाबद्दल मी काय बोलावं? माझी पत नाही तेवढी. पण नानांच्या वादनात त्यांचा स्वभावच झळकतो. शिस्तबद्ध वादन, पक्की लय, न हलणारा स्वर, ही त्यांच्या वादनाची मला जाणवलेली वैशिष्ट्य. मी आईच्या गर्भात असल्यापासून व्हायोलिन खूप जवळनं ऐकत आलोय. त्यामुळेच आईच्या (सौ. चारूशीला गोसावी) व्हायोलिन सुरांशी माझी तार जन्मापासूनच जुळलीये खरी. रेडिओवर किंवा अजून कुठे व्हायोलिनचे स्वर ऐकू आले की ते आईचे आहेत की नाही हे लगेच ओळखता येतं, जसं आईचं आपल्या मुलाबद्दल होतं तसंच. पण अनेकदा असं होतं की आई आणि नाना यांच्या स्वरातला फरक लक्ष देऊनही कळत नाही. दोघांची जुगलबंदी ऐकताना तर एकच व्हायोलिन ऐकतो आहोत असं वाटतं. आठ ऐवजी चारच तारा ऐकू येतात. हेच नानांमधल्या गुरुचं यश आहे. स्वतःइतकंच तयारीचं शिष्येला तयार करणं यातच गुरुचं कसब असतं आणि ते नानांनी केलंय.

शिस्तीचे ऋण
आईकडून बरेच वेळेला मी त्यांच्या शिस्तीचं वर्णन ऐकलंय. तिच्या बोटांतून निघणारे स्वर हे नानांच्याच शिस्तीचं देणं असल्यामुळे तिने मला हे नेहमी अभिमानानंच सांगितलंय. तिनं लहानपणी मांडीवर 'बो'नी खाल्लेल्या फटाक्यांची आठवण तिला आजही आहे. आठवणीपेक्षा त्याचे ऋण अजूनही तिला आहेत असं म्हणावं लागेल. हेच ऋण फेडणं अशक्यच पण ती तिच्या परीनं त्याचा थोडासा प्रयत्न करत असते याचा मला खूप अभिमान वाटतो. सौ. चारूशीला गोसावी म्हणजे माझी आईही त्यामुळे आपल्या वादनातून रसिकांच्या पसंतीला उतरली आहे

नानांचे गुरु 'पं.गजाननबुवा जोशी' यांच्या स्मृतीनिमित्त आवर्जून कार्यक्रम करणं, गुरुपौणिमा नियमित साजरी करणं. नानांची एकसष्टी, एकाहत्तरी आणि आता सहस्त्र चंद्रदर्शन आणि त्यानिमित्त. हा कार्यक्रम.

स्थिर हात, सलग सूर
नानांबरोबर तबला साथ करणं ही काही वेगळीच मजा असते. आता माझ्या सुदैवानं मी त्यांचा नातू आहे म्हणून मला ही संधी वारंवार मिळत असते. मग ती मिळाली की मी सोडत नाही. त्यांच्याबरोबर ख्याल वाजवताना मला जरी सूर, राग, ताना, बंदिश, चीज हे फारसं काळात नसलं तरी सुद्धा मी त्यात रंगत जातो. मधल्या जागा आपोआप माझ्याकडून भरल्या जातात, मात्रा वाजत जातात आणि समेवर येत जातात. त्यांचा ताल इतका पक्का आहे की माझ्यासारखे तबलजी त्यांच्यासाठी ताल धरतात का ते तबलजीसाठी ख्याल धरतात हा प्रश्न आहे. सात, बारा, सोळा या मात्रा त्यांच्या डोक्यात इतक्या पक्क्या बसल्या आहेत की त्यांना तबला साथ फक्त ठेक्यासाठी गरजेची असते, मात्रांसाठी नाही! आत्ता वयाच्या एक्यांशीव्या वर्षी सुद्धा व्हायोलिनवर त्यांचा जो स्थिर हात, सलग सूर, आणि शुद्ध स्वरनिकास आहे तो तर दैवी देणगी, पं गजाननबुवांची कृपा, त्यांनी घेतलेली अपार मेहेनत आणि कलेबद्दल असणारी नितांत निष्ठा यांचा सुरेल मिलापच म्हणावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com