शन्नोनच्या तळावर

शन्नोनच्या तळावर

आम्हाला जायचे होते अमेरिकेत; पण कुवैत व शन्नोन येथेच कसून तपासणी केली गेली. प्रत्यक्षात केनेडी विमानतळावर फारशी तपासणी करण्यात आली नाही. आपल्या देशाच्या सुरक्षेची तपासणी दूर दुसऱ्याच देशात सुरू केल्यासारखे हे वाटले.

न्यूयॉर्कला जाण्यासाठी कुवैत एअरलाइन्सचे तिकीट मिळाल्याचा निरोप आला आणि संबंधित कामांना वेग आला. वैद्यकीय विमा, वाहन चालविण्याचा आंतरराष्ट्रीय परवाना, वेगवेगळी औषधे, शिवाय भारतातून आणावयाच्या वस्तूंची मुलीने पाठविलेली दिवसागणिक वाढणारी यादी.

जाण्याच्या आठ दिवस आधी विमान कंपनीकडून एक मेल आला, की विमानाची न्यूयॉर्कला पोचण्याची वेळ बदलली आहे. दुपारी सव्वातीनला पोचणारे विमान आता रात्री पावणेआठला पोचणार होते. म्हणजे आता कुवैत विमानतळावर थांबण्याची वेळ वाढणार होती. परंतु काहीच इलाज नव्हता. मुलीचा निरोप आला, की "आम्ही विमान येण्याच्या वेळेवर नजर ठेवून आहोत. काळजी करू नये.'

निघण्यापूर्वी दोन दिवस अगोदर सुधारित तिकीट हातात आले. त्या तिकिटातील माहितीनुसार विमान कुवैत ते न्यूयॉर्क थेट न जाता वाटेत आयर्लंडला थांबणार होते. आयर्लंडविषयी मनात उत्सुकता होतीच. इंग्लंडचे हे भावंड स्वतःची स्वतंत्र परंपरा, अस्मिता जपून आहे. आयरीश संस्कृती, तेथील पारंपरिक संगीत याविषयीची उत्सुकता होती. आता विमान आयर्लंडला थांबणारच आहे, तर आयर्लंडचा "ट्रान्झीट व्हिसा' घ्यावा काय? म्हणजे, विमानतळावरच "इमिग्रेशन' विभागातून तात्पुरता व्हिसा घ्यायचा आणि त्या शहरात फिरून यायचे. पुढच्या ठरलेल्या विमानाने पुन्हा पुढे प्रवास सुरू. पाहू त्या वेळी वेळ किती, कसा मिळतो, असा विचार करून पुन्हा कामाला लागलो.

पहाटे साडेपाचला मुंबईहून कुवैतला निघालो. कुवैतला पोहोचलो, तर तेथील वेळेनुसार सकाळचे सात वाजले होते. पुढील विमान दोन तासांनी होते. बोर्डिंग सव्वाआठला सुरू होणार होते. सर्व आटोपून खुर्चीवर बसलो तोच, वेळेआधीच म्हणजे साडेसात वाजताच बोर्डिंग सुरू झाले. रांगेत उभे राहिलो. तपासणी एकदम कडक वाटली. अगदी हाताला, कपड्यांना औषध लावून वगैरे. नंतर कळले की आयर्लंडला अल्पविश्रांतीसाठी विमान थांबणार होते; पण तेथील तपासणीत कोणतीही त्रुटी आढळून येऊ नये म्हणून कुवैतमध्ये ही विशेष काळजी घेण्यात येत होती. सर्वांची तपासणी झाल्यावर "बोर्डिंग लाउंज'मध्ये एकदम गर्दी झाली. सुमारे चारशे प्रवाशांपैकी फक्त दहा टक्के लोकांना बसण्यास जागा होती. बाकी सर्व उभेच होते. विमानातील कर्मचारी आत जाऊनही सुमारे एक तास सगळे जण ताटकळत उभे होते. काही इलाजच नव्हता. बहुधा विमानाचीही कसून तपासणी होत असावी.

शेवटी एकदाचे विमानात बसलो. घोषणा झाली की सुमारे सहा तासांनी विमान आयर्लंडच्या शन्नोन विमानतळावर पोचेल. विमान वेळेत पोहोचले. शन्नोन हा आयरीश संस्कृतीतील खास विभाग आहे. नद्या, सरोवरे, दऱ्या, समुद्रकिनारा यामुळे पर्यटकांचे आकर्षण स्थळ आहे. परंतु आता पुरेसा वेळ नसल्यामुळे "ट्रान्झीट व्हिसा' घेऊन थोडी झलक पाहून येणेही शक्‍य नव्हते. आपल्याला आयर्लंडचे डब्लीन व कॉर्क ही विमानतळं माहीत असतात; पण त्यांच्याइतकाच महत्त्वाचा आणि तेवढ्याच गर्दीचा असा हा शन्नोन विमानतळ आहे. युरोप आणि अमेरिकेसाठी प्रवेशद्वार अशी या विमानतळाची ख्याती आहे. जगातला पहिला ड्युटी फ्री शॉप असलेला विमानतळ अशी त्याची नोंद आहे. हा ड्युटी फ्री शॉप 1947मध्ये सुरू झाला आहे. अत्यंत व्यावसायिक विमानतळ म्हणून लौकिक मिळवणारा हा विमानतळ आधी डब्लीन एअरपोर्ट ऍथॉरिटीच्या कार्यकक्षेत येत होता; पण डब्लीनशी शन्नोनचा वाद झाला आणि जानेवारी 2014पासून डब्लीनशी नाते तोडून हा विमानतळ स्वतंत्र झाला. आता शन्नोन एअरपोर्ट ऍथॉरिटी या विमानतळाची देखभाल करते. वर्षाकाठी पाच लाखांहून अधिक प्रवासी या विमानतळाचा लाभ घेतात.

विमानतळावर उतरल्यावर सर्वांची कसून तपासणी झाली. सगळे जण तपासणी करून लाउंजमध्ये थांबले होते. विमानाची साफसफाई वेगाने पूर्ण करण्यात आली. आता पुन्हा नवे हेडफोन देण्यात आले. विमानात बसल्यावर घोषणा झाली, की विमान सहा तास वीस मिनिटे प्रवास करून न्यूयॉर्कला पोचेल. सुधारित तिकिटावर असलेली वेळ पाळत विमान बरोबर पावणेआठ वाजता केनेडी विमानतळावर उतरले. शन्नोनवरून आलेले विमान असल्याने केनेडी विमानतळावर फारशी तपासणी झाली नाही आणि आम्ही सुखरूप बाहेर आलो. मुलीला जास्त वाट पाहावी लागली नाही.

कोण्या देशाचा कोणावरील विश्‍वास याबाबत अधिकृत असे काही कळले नाही. संपूर्ण प्रवास चार तासांनी वाढला. एका वेळी सलग प्रवासाची वेळ कमी झाली. मधल्या वेळेत विमानतळावर पाय मोकळे करावयास मिळाले. जेटलॅक काही फार वेळ टिकला नाही. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी चेरी ब्लॉसम महोत्सवाचा आनंद घेता आला. ब्रॅंच ब्रुक पार्कमध्ये वेळ छान घालवता आला. आपल्या देशाच्या सुरक्षेकरता काय काय उपाय केले जातात, याचाही चांगला अनुभव आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com